काहीजणी सांगतात आम्ही रोज व्यायाम केले पण तरीही वजन वाढलेच. मग आम्ही योगाचा क्लास लावला. काहींनी जिम लावली, काही पोहण्याचा क्लास करायला लागातात तर काही रमत-गमत फिरायला जातात आणि हाच व्यायाम असेही समजतात. पण बायांनो एक लक्षात ठेवा, केवळ व्यायाम करणं इतकंच पुरेसं नाही.
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ही महत्त्वाचं असतं. खरं तर आहार, व्यायाम, मन:शांती आणि आवडीच्या छंदातून मिळणारा आनंद या चतु:सुत्रीचा एकत्रित अवलंब केला तरंच वजन आपल्या अपेक्षेनुसार नियंत्रित राहू शकते. यामुळे रजोनिवृत्तीच्या काळातील अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळही मिळेल.
तर या चतु:सूत्रीची माहिती घेताना सुरूवातंच व्यायामाने करता येईल.
व्यायाम – व्यायामाचे खरं तर चार प्रकार आहेत.
शक्ती वाढवविणारे व्यायाम
लवचिकपणा वाढवणारे व्यायाम
दमश्वास वाढवणारे व्यायाम
चिवटपणा वाढवणारे व्यायाम
व्यायाम हे नियमितपणे आणि रोजच करायला हवेत. ज्याप्रमाणे शरीराला मिळालेल्या जीवनसत्वांची शक्ती दररोज शरीराकडून वापरली जाते, तशीच व्यायामाने मिळवलेली शक्तीही वापरली जाते. शिवाय या वयात व्यायाम केल्याने भावनांचे विरेचन करणेही सोयीचे होते. ते सुयोग्य प्रकारे होते.