पुणे – विमान, हेलिकॉप्टर या वाहनांमधून प्रवास करताना अनेकांना प्रचंड भीती वाटत असते. अशा प्रवासामध्ये काही जणांच्या मनावर प्रचंड दडपण येते. असे लोक या प्रवासात खूप घाबरलेले असतात. प्रवासाची भीती प्रमाणाबाहेर वाढल्यास त्याचे शरीरावर लगेच दुष्परीणाम होतात. काही जणांना उलट्या होणे सुरु होते. खरे तर मनाच्या या अवस्थेवर थोड्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येऊ शकते.
काही वेळा ही भीती प्रमाणाबाहेर वाढते आणि माणसाचे जगणे असह्य होऊन जाते. हवेतून नियमित प्रवास करावा लागणाऱ्या मंडळींना अशा प्रकारच्या भीतीने पछाडलेले असेल तर त्यांची अवस्था मोठी कठीण होऊन जाते. काही जणांना हवाई प्रवास चालू होण्यापूर्वी कोणीतरी विमान अपघाताची अथवा अन्य दुर्घटनेची आठवण करून दिल्यास मोठी भीती वाटू लागते.
काही जणांना त्यांच्या आयुष्यात हवाई प्रवासात घडलेली एखादी दुर्घटना किंवा अपघात आठवू लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचे मन भयभीत होऊ लागते. काही जणांना विमान अपहरणाची घटना आठवते आणि आपल्या बाबतीत या प्रवासात असे घडू शकते या जाणीवेने त्यांचे मन घाबरून जाते.अशा व्यक्ती विमान प्रवासाला नकारच देतात. त्यांच्यावर विमान प्रवासासाठी बळजबरी केली तर ते प्रसंगी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात.अशा व्याधीतून प्रयत्नपूर्वक बाहेर येणे गरजेचे असते.
आपण या व्याधीचे शिकार झालेलो आहोत, हे लक्षात आल्यावर या व्याधीला कोणत्या प्रकारे तोंड देता येईल याचा विचार करायला शिका. अशा प्रकारच्या मानसिक भीतीतून बाहेर काढण्यासाठी कोणता डॉक्टर अथवा मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक मार्गदर्शन करू शकतो याची माहिती मिळवा. या मंडळींकडून जे मार्गदर्शन दिले जाईल त्याप्रमाणे उपाय केल्यास आपल्या मनातील भीतीची भावना दूर होऊ शकते. विमान प्रवासाबाबत जर पूर्वीच्या अपघातांची आठवण होत असेल तर त्या व्यक्तीला विमान प्रवासा संदर्भात तांत्रिक माहिती द्यावी. त्याबरोबर समुपदेशकाच्या सहाय्याने मनातील भीती दूर करता येऊ शकते.
प्रवास चालू होण्या पूर्वी दीर्घ श्वास घ्यावा. डोक्यातून नकारात्मक गोष्टी काढून टाकाव्यात. मनातल्या भीतीच्या भावना दूर करण्यासाठी औषधोपचारही उपलब्ध आहेत. प्रवास चालू होण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. मात्र चहा, कॉफी सारखी पेये घेऊ नका. विमान कर्मचाऱ्यांना आपल्याला वाटत असलेल्या भीतीबाबत कल्पना द्या. तसेच आपल्या शेजारच्या प्रवाशालाही आपल्या मानसिकतेची कल्पना द्या. विमानातील कर्मचारी तुमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मदत करू शकतात.
भीतीची ही भावना दूर करण्यासाठी आरोमा थेरपी उपयुक्त ठरू शकते. मात्र ही थेरपी योग्य त्या मार्गदर्शनाखालीच घेतली पाहिजे. विमान प्रवासाची भीती वाटणाऱ्या मंडळींची थट्टा केली तर त्यांची भीती आणखी वाढते. तसेच त्यांच्यावर अशा प्रवासाची सक्ती केली तर त्याचे परिणाम उलटे होतात. त्यामुळे अशा लोकांना सक्ती न करता, त्यांच्या मनातील विमान प्रवासाविषयीचे गैरसमज दूर करावेत.
– सुचित्रा श्रीकांत