पुणे – हे दंड स्थितीतील आसन आहे. अर्ध-उभ्या अवस्थेत करतात. प्रथम अर्धउभ्याअवस्थेत उभे रहावे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या जांघेपाशी न्यावा. मग दोन्ही हात जमिनीला टेकवून डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर ठेवलेल्या कापडाच्या पट्टीवर टेकवावा. दोन्ही हात एकमेकात गुंफून त्याची नमस्कार स्थिती करावी व डोळे मिटून आसनाशी तद्रूप व्हावे. हे आसन अनुक्रमे डाव्या आणि उजव्या बाजूने करताना टाच जांघेत किंवा जनेनेंद्रिंयाच्या मुळाशी ठेवावी.
आसनस्थितीत संथ श्वसन चालू ठेवावे. दोन्ही हातांचा विळखा घालून हात जोडून नमस्कार मुद्रा करावी. दुमडलेल्या पायाच्या गुडघ्याला दुसऱ्या पायाच्या टाचेचा स्पर्श व्हायला हवा इतपत पायांची स्थिती ठेवावी. या आसनात हात जोडून हटयोग्यापरी ईश्वराचे तप करीत असल्यासारखी आकृती तयार होते. या आसनाच्या तीन अवस्था म्हणजेच तीन टप्पे आहेत. ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करणे फायद्याचे आहे.
काही योग तज्ञाच्या मते स्त्रियांनी हे आसन करू नये तर काही योग तज्ञांच्या मते ते करावे. दोन्ही पायांनी आलटून पालटून हे आसन केले जाते त्यामुळे दोन्ही पायांच्या व हातांच्या स्नायूंना समान व्यायाम मिळतो. गुडघ्याला जमिन टोचू नये म्हणून हे आसन करताना गुडघ्याखाली कापडाची जाड पट्टी ठेवावी म्हणजे जमीन टोचणार नाही व स्थिरता राखता येईल. शरीरातील वात, पित्त, कफ या त्रिदोषांचा समतोल राखण्यासाठी आसन करणे गरजेचे आहे.
या आसनामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात, गुडघे आणि घोटे यांच्यातील सांधेदुखी कमी होते. फार पुरातन काळी ऋषीमुनी ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी या आसनाचा उपयोग करीत असत. तसे हे आसन टिकवायला अवघड आहे. याचा कालावधी सुरुवातीला पंधरा सेकंदापर्यंतच आहे.
पण नियमित सरावाने हे आसन दीड ते दोन मिनिटांपर्यंत टिकवता येते. आसन सोडताना पायात गोळा येण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाश व नियंत्रित हालचालीने हे आसन सोडावे. वातायासनाने हातापायांचे सांधे मजबूत होतात. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते म्हणून ते प्रत्येकाने जरूर करावे. फक्त योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.