जिथे जाऊ तिथे खाऊ अशी अनेकांची वृत्ती असते. सर्वत्र सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, अगदी भरपेट म्हणतात तसा आनंद लुटणे हा त्यांचा छंदच असतो. खाताना मर्यादा न राहिल्यामुळे, वेळीअवेळी आणि अरबट चरबट खाण्याने परिणाम व्हायचा तोच होतो. पोट बिघडते, अपचन होते. करपट ढेकर येऊ लागतात. बद्धकोष्ठ होतो. हे त्रास अनेकदा अंगावर काढले जातात, त्याकडे दुर्लक्ष केले जाते; किंवा घरीच रेचके घेतली जातात.
वेळीअवेळी पोटात अन्न अक्षरश: ढोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू झाला, की मग सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी सल्ल्याने त्रिफळा चूर्ण घेण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागते. त्यातच आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट्स नसतात हा आपला गैरसमज असतो. मग काय? मग वर्षानुवर्षे ही रेचके आपली सोबती होतात. ( remedy for intestinal gas problems )
रेचकांचा प्रदीर्घ काळ वापर केल्याने आतड्यांना शुष्कता येते आणि त्यांची कार्यक्षमता घटते. नेहमीच्या सवयीमुऴे रेचकांचा प्रभाव कमी होऊ लागतो. रेचकांचा परिणाम होत नाही, हे जाणवले की मग स्वाभाविकपणे आपण त्यांचे अधिक मात्रेत सेवन करू लागतो. सहा-सहा ग्रॅम इतक्या अधिक प्रमाणात रेचक सेवन करूनही पोट साफ न होण्याची तक्रार उरतेच.
बाजारात मिळणाऱ्या जवळपास बहुतेक रेचक चूर्णात सोनामुखी ही वनस्पती वापरलेली असते. या सोनामुखीच्या प्रदीर्घ वापराचे बरेच दुष्परिणाम होतात. विशेषतः सोनामुखी या वनस्पतीमुळे पित्ताचे त्रास वाढतात. शिवाय सोनामुखीसारख्या वनस्पती गरोदर स्त्री व बाळंतीण यांनी घेणेही अपायकारक असते.
पोट साफ न होणे ही तक्रार अनेकांची असली, तरी पोट साफ न होणे हे व्यक्तीच्या प्रकृतीबरोबरच आहार आणि पचनक्रिया यांवरही अवलंबून असते. बऱ्याच लोकांना सारखे ढेकर येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे प्रमाण तुलनेने जास्त आढळते. ( remedy for intestinal gas problems )
वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जीवाणू प्रक्रिया. बध्दकोष्ठता असल्यावर मोठ्या आतड्यात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो. आजकालच्या बैठ्या आणि कमी श्रमाच्या जीवनपध्दतीत पोटात गॅस होणे हे अगदी स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान दररोज चालण्याची सवय असावी.
अति पाणी पिणे, आहारात बटाटा, रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी अशा विशिष्ट पदार्थांशी संबंध टाळावेत. वायू, गुबारा यांचा त्रास होणाऱ्यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात. ( remedy for intestinal gas problems )