तापात घाम येण्यासाठी – टेटू हे दशमुळ म्हणून आयुर्वेदात प्रसिद्ध आहे. ह्याच्या शेंगा तलवारीसारख्या हुबेहुब असतात. ह्याच्या झाडाचे मुळावरील सालीचा औषधात उपयोग करतात. ही साल आयुर्वेदिक दुकानात विकतही मिळते. तापात घाम आणण्यासाठी या सालीचा उपयोग करतात. टेटूचे मुळावरील साल 20 ग्रॅम चांगली ठेचून 1/2 ग्रॅम पाण्यात एक अष्टमांश काढा करावा व त्या काढ्यात टेटूच्या मुळावरील सालीचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण पाव ग्रॅम घालून तो काढा प्यावा. ताबडतोब घाम सुटून अंग हलके होते, सांधे मोकळे होतात. टेटूच्या मुळावरील सालीचा वाफारा घेतात. त्यानेही घाम निघून जाऊन सांधेदुखी बरी होते.
अतिसार, रक्तातिसारावर – टेटूच्या मुळावरील सालीचा अतिसार-रक्तातिसारावर फार उपयोग होतो. फार वेळ तांबडे परसाकडे होत असेल तर टेटूच्या सालीचा रस पुटपाक करून काढला तर फार चांगला निघतो व तो अत्यंत गुणकारी असतो.
प्रदरावर उत्तम औषध – ह्याच्या सालीचे चूर्ण प्रदरावर उत्तम लागू पडते. हे वस्त्रगाळ केलेले चूर्ण 1 ग्रॅम, तूप 10 ग्रॅम व तेवढीच साखर घालून दिवसातून दोन वेळा घ्यावे, स्त्रियांचे प्रदराचे दुखणे बरे होते.
शक्ती येण्यासाठी – शक्ती येण्यास हेच चूर्ण तूपसाखरेशी खावे. भूक लागते, अन्न पचते व चांगली शक्ती येते.
मुळव्याधीवर उपयुक्त – सुंठ, इंद्रजव व ह्याच्या सालीचे चूर्ण समभाग घेऊन ते रोज 10 ग्रॅम वाटीभर ताकाशी सकाळ, संध्याकाळ घ्यावे. मुळव्याधीस फार फायदा होतो. पुष्कळ दिवस हे घेतल्याने मुळव्याधीचा कोंब (मोड) गळून पडतो.
कानातील ठणक्यावर – कानास ठणका लागला असता टेटूच्या सालीचे चूर्ण तेलात कालवून ते चांगले एकजीव करून मग गाळून घेऊन थोडेसे कोमट करून मग ते तेल कानात घालावे. कानाचा ठणका ताबडतोब थांबतो.
– सुजाता गानू