धूम्रपान करणे अतिशय घातक सवय तर आहेच; परंतु स्वत: धूम्रपान न करणाऱ्यांसाठी देखील धूम्रपान तेवढेच धोकादायक ठरू शकते. दुसरा एखादा धूम्रपान करत असताना, तिथे उभे राहून जर तो धूर आपल्या नाकावाटे शरीरात गेला, तर फुप्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका असतो, हे आता उघड सत्य आहे. तथापि, एक गोष्ट अद्याप उघड झालेली नाही आणि लोकांच्या लक्षातही आलेली नाही; ती म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्याने धूम्रपान करून सोडलेला धूर सिगारेट न ओढणाऱ्या लोकांतही हृदयविकाराचा धोका निर्माण करणारा ठरतो.
आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई लागू झालेली असली, तरी लोक ती जुमानताना दिसत नाहीत. त्यामुळे निर्व्यसनी लोकांना सक्तीने हा धूर सहन करावा लागतो (पॅसिव्ह स्मोकींग) आणि विशेषत: पालक जर धूम्रपान करत असतील, तर त्याचा मोठा गंभीर धोका त्यांच्या मुलांना पोहोचतो. तंबाखूमध्ये जवळपास चार हजार धोकादायक रासायनिक पदार्थ असतात. दुसऱ्याच्या धूम्रपानाचा धूर आपल्या फुफ्फुसात गेल्याने काही विशिष्ट आजार होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी बळावते.
सिगरेट जळताना कार्बन मोनोक्साईड निर्माण होतो आणि तो आपल्या रक्तातील तांबडया पेशींमध्ये ऑक्सिजनपेक्षा कितीतरी जास्त वेगाने शोषला जातो. शरीरात ऑक्सिजनचे वाहन करण्यासाठी असलेल्या रक्तपेशींमध्ये हा कार्बन मोनोक्साईड चिकटून बसतो आणि त्यामुळे हृदयाला कार्य करताना निष्कारण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त श्रम पडतात.
जेव्हा हे विषारी द्रव्य तुमच्या शरीरातील यंत्रणेत शिरते, तेव्हा पुढील गोष्टी घडून येतात.
1. रक्त चिकट होते.
2. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
3. रक्तवाहिन्यांच्या कडा खराब होतात.
4. रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर थर जमा होतो.
5. रक्तवाहिन्या कठोर होतात आणि आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही.
6. हृदयाकडून शरीराच्या अवयवांकडे रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांच्या आत देखील थर जमतो. त्यामुळे धमन्या आणि रक्तवाहिन्यांशी निगडित विकार होतात.
7. वेदना होते आणि खूप थकवा येतो.
8. रक्तदाब वाढू शकतो
9. शरीराच्या अंत:स्तरीय कार्यप्रणालीत बिघाड होऊ शकतो. ही एक अशी अवस्था असते, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांचा आकार विस्तारतो आणि तोच बहुतांश हृदयविकारांच्या मागील कारण ठरतो.
दुसऱ्याने धूम्रपान केलेला धूर आपल्या श्वसनात गेल्यामुळे धूम्रपान न करणा-या व्यक्तीला केवळ हृदयविकाराशी निगडित नव्हे, तर एकूणच आरोग्याशी संबंधित अन्य कित्येक धोक्यांना सामोरे जावे लागते.
दुसऱ्याने धूम्रपान केलेला धूर आपल्या श्वसनात जाऊ नये, यासाठी काय करावे?
पॅसिव्ह स्मोकिंग टाळायचे असेल, तर खालील गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
1. आपल्या घरात कोणी धूम्रपान करत असेल, तर त्यांना बाहेर जाऊन धूम्रपान करायला सांगा.
2. कार, छोटया खोल्या अशा बंदिस्त ठिकाणी जर कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या साचून राहिलेल्या धुराचा खूप जास्त त्रास होतो, तेव्हा अशा जागा आवर्जून टाळा.
3. जर तुम्हाला पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असेल किंवा हृदयविकाराचे निदान झालेले असेल, तर दुसऱ्याने धूम्रपान केलेला धूर आपल्या श्वसनात जाऊ नये यासाठी अतिशय काटेकोर काळजी घ्यायलाच हवी.