लहान मुलांचे डोळ्यांचे आजार
भारतातील 5 वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून ही धोक्याची घंटा आहे. भारतातील तरुण मुले बराच वेळ घरातील अनैसर्गिक दिव्यांच्या प्रकाशात आणि विविध स्क्रीनच्या समोर बसूनच घालवतात. मुलांमधील आरोग्याच्या या चिंतेसाठी त्यांच्या पालकांचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. त्यांच्यापैकी केवळ थोडेच पालक त्यांच्या मुलांचे डोळे नियमितपणे तपासून घेतात. मुले दिवसातील निम्म्याहून अधिक काळ घरात व्यतीत करत असल्यामुळे घरातील दिव्यांचा चांगला दर्जा असणे ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरते.
भारतातील नेत्रतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कमी प्रकाश, बराचवेळ स्क्रीनकडे पाहणे आणि हिरव्या पालेभाज्यांचे आहारातील अत्यंत कमी प्रमाण या कारणांमुळे 5 वर्षाहून कमी वयाच्या मुलांच्या दृष्टीवर दुष्परिणाम होत आहे. या वयोगटातील मुलांनी जास्त काळ स्क्रीनकडे पाहिले, तर त्याचा त्यांच्या दृष्टीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. बहुतांश नेत्रतज्ज्ञांनी (80 टक्के) हे मान्य केले की, डोळ्यांच्या आरोग्यात प्रकाश योजना खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच दिव्याचे फ्लिकरिंग, अति प्रखर प्रकाश आणि अयोग्य जागी असलेला दिव्याचा स्रोत यामुळे डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम होतो. लक्ष केंद्रित करण्याच्या मुलांच्या क्षमतेमध्ये प्रकाश योजनेचा थेट वाटा असतो.
स्क्रीन पाहण्याची वेळ कमी करणे, पुरेशी झोप आणि प्रथिनयुक्त आहार या साध्या उपायांचा अवलंब करून पालक त्यांच्या पाल्यांच्या दृष्टीचे रक्षण करू शकतात. जसे की वाचनासाठी पांढरा प्रकाश देणारा दिवा आणि विश्रांतीसाठी पिवळा प्रकाश देणारा दिवा. त्याचबरोबर प्रकाशस्रोत हा योग्य ठिकाणी बसवणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषत: टीव्ही पाहताना आणि वाचताना ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण ज्या पद्धतीचे दिवे वापरतो त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होत असतो आणि विशेषत: मुलांनाच याचा त्रास होऊ शकतो, कारण ते दिवसातील जवळजवळ बराच वेळ घरातच विविध स्क्रीन्सच्या समोर घालवतात. कमी दृष्टी असलेल्या मुलांची अभ्यासातील प्रगती कमी असते तसेच त्यांची अनुपस्थितीही अधिक असते असे बाल सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या निरीक्षण अहवालांतून समोर आले आहे.
त्यामुळेच पालकांनी त्यांच्या घरासाठी सर्वोत्तम प्रकाश देणारी लायटिंगची उत्पादने निवडावीत, जेणेकरून ग्लेअर किंवा फ्लिकरचे प्रमाण कमी होईल. ग्लेअर किंवा फ्लिकरमुळे डोळ्यांना असहजता येते आणि डोकेदुखीसारखे त्रास उद्भवतात. खरेतर नेत्रतज्ज्ञांच्या सल्लयानुसार ग्राहकांनी स्वस्त किंवा अन्ब्रॅंडेड दिव्यांपेक्षा त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या डोळ्यांना सहजता देणाऱ्या बल्बची निवड खरेदी करताना करायला हवी. कारण, स्वस्त दिवे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
ज्येष्ठांमधील डोळ्यांचे आजार
त्यामुळेच वाढत्या वयासोबत येणाऱ्या समस्या समजून घेणे आणि तुम्ही आरोग्यदायी पद्धतीने वृद्धत्वाला सामोरे जावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहेत, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेड लागणे किंवा डिमेंशिया, अल्झायमर, गंभीर संधिवात, पार्किन्सन आणि वयोमानपरत्वे (एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन-एएमडी) यांसारखे डोळ्यांचे आजार ज्येष्ठांमध्ये मोठया प्रमाणावर दिसतात. डोळ्यांच्या विविध आजारांमध्ये एजरिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन (एएमडी) मुळे जगभरात 9 टक्के रुग्णांना अंधत्व येते.
डोळ्यांचे आजार आणि त्यांची लक्षणे याबद्दलच्या अनभिज्ञतेमुळे उपचार घेण्यात विलंब होतो. डोळ्याच्या बुबुळ्याच्या पडद्याशी संबंधित (डोळ्याच्या पुढील भागातील) आजार सहजतेने लक्षात येतात. मात्र, आतील भागाच्या पडद्याशी (डोळ्याच्या मागील किंवा अंतर्गत भागातील) संबंधित आजार रुग्णाच्या किंवा त्यांची काळजी घेणाऱ्यांच्या सहजतेने लक्षात येत नाही. 65 हून अधिक वय असलेल्यांमधील पाचपैकी एका वृद्धाला एएमडीचा धोका असतो.
वेट एएमडी समजून घेताना, एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन (एएमडी)च्या वेट प्रकारात मॅक्युलाच्या (रेटिनाचा म्हणजेच बुब्बुळाच्या आतील पडद्याचा एक भाग) आत असामान्य रक्तवाहिन्या वाढू लागतात. या वाहिन्यांमधून रक्त आणि स्रव रेटिनामध्ये गळू लागते आणि केंद्रीय दृष्टिक्षमतेला हानी पोहोचते. ज्येष्ठांमध्ये दृष्टी जाण्यासाठी हे एक महत्त्वाचे कारण आहे. एएमडीचे निदान झालेल्यांपैकी 10 टक्क्यांना वेट एएमडीचा त्रास असतो. दृष्टीची काळजी
एका डोळ्यात वेट एएमडीचा त्रास असल्यास पुढील वर्षात दुसऱ्या डोळ्यातही ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
आपली दृष्टी वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार.
डोळे आरोग्यदायी ठेवण्यासाठी…
डॉक्टरांनी सांगितलेले उपचार नीट घ्या.
आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली अंगीकारा.
डिजिटल स्क्रीनसमोरचा वेळ कमी करा.
मधुमेह आणि हायपरटेन्शसारखे आजार नियंत्रणात ठेवा.
एएमडी हा वाढत जाणारा आजार असला, तरी योग्य वैद्यकीय मदत आणि जीवनशैलीतील बदल यामुळे तो नियंत्रणात ठेवता येतो.
65 पेक्षा अधिक वय असलेल्या दर पाचपैकी एका व्यक्तीला एएमडीचा धोका जगभरातील अंधत्वातील 9 टक्क्यांमागे एएमडी एएमडीचे निदान झालेल्या रुग्णांपैकी 10 टक्के वेट एएमडी जगाच्या एकूण लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचा वाटा 12 टक्के आहे.
एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन (एएमडी) हा वाढत जाणारा आजार आहे. वेळेत निदान झाले, तरच हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. बऱ्याचदा एएमडीच्या लक्षणांना साधारण वृद्धत्वाची लक्षणे समजून गल्लत होते. एएमडीच्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण दवाखान्यात जाण्यापूर्वीच आजाराच्या पुढच्या टप्प्याला पोहोचलेले असतात. वेळेत निदान झाल्यास, आजाराच्या वाढीचा वेग कमी करता येतो. 50 वर्षांहून अधिक वय असलेल्यांनी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेणे इष्ट.
एएमडी रुग्णांमधील जागरूकता आणि या आजारासाठी उपलब्ध असलेले उपचार यातील कच्चा दुवाच यातून दिसून येतो. तर 60 वर्षांवरील ज्येष्ठांनी दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. याची लक्षणे वयोमानाप्रमाणे दिसतात, असे बरेचदा गृहीत धरले जाते. त्यामुळे, डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो आणि परिस्थिती अधिक बिघडते.
विशेषत: तरुणांनी घ्यावयाची काळजी
बहुतांश लोकांना आपल्या डोळ्यांचं महत्त्व समजतं. महत्त्व कळत असलं तरी कित्येकांना डोळ्यांचं आरोग्य कसं राखायचं याची कल्पना नसते. जी माणसं दृष्टिहीन आहेत त्यांना विचारा डोळ्यांचं महत्त्व किती असतं ते. म्हणूनच आपल्याला असलेल्या डोळ्यांची काळजी आपण वेळीच घेतली तर नंतर नुकसान होणार नाही. त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. आता तर दिवसेंदिवस उष्णता वाढत जात आहे. त्या दिवसांत डोळ्यांचे विविध आजार बळावतात.
म्हणूनच आपण आपल्या डोळ्यांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. कित्येकांना रात्री वाचनाची सवय असते. कमी प्रकाशात किंवा अगदी प्रखर उजेडात वाचणं टाळावंच. तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकावर थेट प्रकाश पडेल, असा प्रकाश खोलीत असला पहिजे. टीव्ही पाहाण्यामुळे डोळ्यांना भिंगाचा चष्मा लागतो हे आपल्याला ठाऊकच आहे. म्हणूनच टीव्ही पाहताना लांब बसावं. ट्रेनमधून किंवा बसमधून प्रवास करताना वाचन टाळावं. ट्रेन किंवा बसच्या हलण्यामुळे आपल्या डोळ्यांसमोरील अक्षरं हलतात त्याचा त्रास आपल्या डोळ्यांना होतो. त्याचप्रमाणे झोपूनही काही वाचू नये. अधिक वेळ टीव्ही पाहू नये किंवा कॉम्प्युटर गेम्स खेळू नये.
आपल्या कुटुंबातील लोकांना काही डोळ्यांचे आजार अथवा काही त्रास होत असल्यास त्याची माहिती स्वत:ला करून घ्यावी. त्याबाबत त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करा. तसंच आजारावर किंवा त्रासावर उपचार झाले आहेत की नाही अथवा कोणते अनुवंशिक आजार आहेत का याचीही खात्री करून घ्यावी. तुमच्या दृष्टीतला दोष कमी होईल, असा आहार घ्यावा. गाजर डोळ्यांसाठी उत्तम आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र त्याचबरोबर ताजी फळं आणि भाज्यांचाही आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या त्यातही पालक, ब्रोकोली अशा भाज्यांचा समावेश करावा.
वजन योग्य राखा. कारण अतिरिक्त वजनामुळे तुम्हाला मधूमेह किंवा अन्य कोणतेही आजार होण्याची शक्यता असते. याचा परिणाम तुमच्या दृष्टीवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्लुकोमासारखे आजार होण्याची शक्यता असते. तुम्हाला वजन कमी करणं शक्य नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.
घरात वावरताना किंवा खेळताना सुरक्षित काचेचा चष्मा किंवा गॉगल वापरा. बहुतांश काचा या पॉलिकाबरेनेटपासून तयार झालेल्या असाव्यात म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या काचांपेक्षा दहा पट अधिक चांगल्या असतात. अशा काचांमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. म्हणून काच निवडताना काळजी घ्यावी.
तुमच्या शरीरासाठी धूम्रपान जसं हानिकारक आहे, तसंच ते डोळ्यांसाठीही आहे. म्हणून धूम्रपान टाळा. वयोमानामुळे होणारे डोळ्यांचे आजार धूम्रपानामुळे वयाच्या आधीच होतात.
आजकाल गॉगल घालणं ही मोठी फॅशनची गोष्ट असते. पण त्यांचं मुख्य काम हे डोळ्यांची काळजी घेणं हे आहे. म्हणून फॅशनपेक्षा तुमच्या डोळ्यांना खरोखरच आराम मिळेल याची काळजी घ्या. अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण होईल असे गॉगल निवडा.
डोळ्यांना काही वेळ आराम द्या. कॉम्प्युटर किंवा एकाच जागी खूप वेळ बघत बसतो. अशा वेळी आपण डोळे मधूनच उघड-बंद करायचं विसरतो.
दर वीस मिनिटांनी 20-20-20 चा नियम पाळा. दर वीस मिनिटांनी तुमच्यापासून आजूबाजूला वीस फुटांच्या अंतरावर असलेल्या गोष्टींकडे वीस सेकंद पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
लेन्स लावताना हात स्वच्छ धुवावेत. कोणत्याही प्रकारचा संसर्ग डोळ्यांना होऊ नये म्हणून डोळ्यात लेन्स घालताना आणि काढताना हात स्वच्छ साबणाने धुवावेत. तसंच खराब झालेल्या लेन्स त्वरित बदलाव्यात.
वर्षातून एकदा डोळे तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. डोळे लाल झाल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावेत. तसंच डोळे लाल झाले असतील तर डोळ्यांत मुळीच लेन्स घालू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज डोळ्यात कोणत्याही प्रकारचं औषध घालू नये.
काचबिंदू :
या आजारात डोळ्यांतील प्रेशर वाढतं. यामध्ये मुख्यत: डोळ्यांतील आंतर दाब वाढतो आणि त्याचे परिणाम डोळ्यांतील विविध भागांवर दिसू लागतात. हा दाब वाढण्याचं मुख्य कारण डोळ्यांच्या आतील द्रवाच्या अभिसरणामध्ये अडथळा येणे हे आहे.
सामान्यत: डोळ्यांतील दाब हा 10 ते 20 मीमी ऑफ मॅक्युरी इतका असतो. काचबिंदू झालेल्या डोळ्यात तो 22 च्या वर आणि 40 ते 60 पर्यंतही जाऊ शकतो. दृष्टीची संवेदना मेंदूकडे नेणारी मज्जा म्हणजे ऑप्टीक नर्व्ह अशा दाबामुळे सुकत जाते. यावर वेळेवर उपचार होऊ न शकल्यास अंधत्व येतं.
खरं तर काचबिंदू कोणालाही होऊ शकतो. मात्र तो होण्यातही आनुवंशिकतेचा मुद्दा आहेच. एखाद्याच्या कुटुंबात आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा भावा-बहिणीला काचबिंदू असल्यास त्यालाही काचबिंदू होण्याची शक्यता 2 ते 4 पटीने जास्त असते. म्हणूनच त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असते.
ठरावीक कालावधीनंतर डोळ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेण्याची गरज असते आणि ज्यांच्याकडे काचबिंदू होण्याची आनुवंशिकता नाही, अशांना
काचबिंदू होण्याची शक्यता 5 ते 10 टक्के इतकी असते. काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षात आलं नाही तर त्यामुळे येणारं अंधत्व स्वीकारण्यावाचून आपल्याला पर्याय राहात नाही. हा काचबिंदूतला सर्वात मोठा धोका आहे. तसंच हाच तर काचबिंदू आणि मोतीबिंदू यातला मूलभूत फरक आहे. मोतीबिंदूवर उपचार केल्यानंतर, त्यासाठीचं ऑपरेशन केल्यानंतर आपली दृष्टी जवळजवळ 90 टक्के पूर्ववत होते, पण काचबिंदूमध्ये 5 टक्के जरी दृष्टी कमी झाली तरी त्यावर काही उपाय करता येत नाही.
90 टक्के रुग्णांना काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षातच येत नाही आणि हे असे रुग्ण निम्न आर्थिक स्तरातले किंवा अल्पशिक्षितच असतात असं नाही; तर अगदी उच्चशिक्षित-अगदी डॉक्टर्सनाही आपल्याला काचबिंदू झाल्याचं लक्षात येत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा बहुतेक वेळा उशीर झालेला असतो. रक्ताच्या प्रवाहाचे जे आजार असतात म्हणजे मधुमेह (डायबेटिस), रक्तदाब (ब्लडप्रेशर) यांसारखे आजार असणाऱ्यांनी डोळ्यांची तपासणी वेळेवर करावी.
कधीकधी प्रेशर नॉर्मल असतं, पण डोळ्यांची आतली नस तपासली असता काचबिंदूची चिन्हं दिसतात. त्यावरून संभाव्य काचबिंदू लक्षात येऊ शकतो. या चाचण्यांमधून अगदी तिशी-चाळिशीच्या उंबरठयावर असलेल्या रुग्णांनाही काचबिंदू होण्याची शक्यता असेल तर वेळेत निदान करता येतं. आणि पुढचा धोका टाळता येतो. आज आपल्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण लोकांमध्ये जागृती झालेली नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
फक्त काचबिंदूसाठी नाही तर डोळ्यांची तपासणी प्रत्येक दोन वर्षांनी करावी. एकदा काचबिंदूचा आजार होऊन डोळे वाचलेल्यांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांचे प्रेशर तपासावं. स्वत:च्या मनाने कुठलंच स्टिरॉइड गटात मोडणारं औषध डोळ्यांसाठी वापरू नये. त्यानेही काचबिंदूचा धोका वाढतो. यावर उपाय एकच, काही वर्षाच्या अंतराने डोळ्यांची तपासणी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही ड्रॉप्स डोळ्यांत घालू नका.
भारतातील 2.6 टक्के लोकांना काचबिंदू होतो. नियमित आणि सखोल नेत्रतपासणीमुळे या डोळ्यांच्या आजाराचं निदान लवकरात लवकर होतं. भारतात काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त आहे.
विशेषत: अँगल क्लोझर ग्लुकोमा ज्यात बुब्बुळ डोळ्यांतील द्रवपदार्थाचं (ऍक्वेयस ह्युमर) वहन होण्यापासून रोखतं.
हा आजार स्त्रियांमध्ये जास्त होतो.
-डॉ. सुरेश पवार