आहारामध्ये दुधाचे महत्त्व मोठे आहे. लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वांच्याच आहारामध्ये दुधाचा समावेश असणे अगत्याचे असते. कधी जेवण्याइतपत भूक नसल्यास, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एक ग्लास दुधाचे सेवन हा उत्तम आणि पोषक पर्याय आहे. दुधामध्ये प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असतात. यामध्ये असलेल्या अमिनो ऍसिड्समुळे शरीरातील अवयवांना पोषण मिळत असते. दुधाच्या नियमित सेवनाने शरीराची चयापचय शक्ती उत्तम राहात असून, रोगप्रतिकारशक्तीही वाढते. म्हणूनच दुधाचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून केला जावा.
आपल्यासाठी आणि आपल्या परिवारजनांसाठी दुधाची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा लहान मुले किंवा घरातील इतर मंडळींपैकी कोणी लॅक्टोज इन्टॉलरंट असतात, म्हणजेच अशा व्यक्तींना दूध सहज पचत नाही. अशा वेळी या व्यक्तींसाठी दुधाचे इतर पर्याय आजमावून पहावे लागतात. तसेच अनेक परिवारांनी आजकाल व्हेगन जीवनशैलीचा अवलंब केला असल्याने त्यांच्यासाठीही दुधाचे इतर पर्याय लक्षात घेणे आवश्यक ठरते.
ज्या दुधातून फॅट्स, म्हणजेच “क्रीम काढून घेतलेले नसेल अशा दुधाला फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध म्हटले जाते. दुधातील फॅट्स, म्हणजेच स्निग्ध पदार्थ मेंदूच्या योग्य वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात. आपल्या मेंदूच्या निर्मितीमध्ये सुमारे साठ टक्के प्रमाण हे फॅट्सचे असते. फुल क्रीम दुधामध्ये स्निग्ध पदार्थांच्या सोबतच अ, ड, बी जीवनसत्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, आणि रिबोफ्लाविन इत्यादी पोषक तत्वे असतात. अशा प्रकारचे दूध वाढत्या वयातील मुले, गर्भवती आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिला आणि बॉडी बिल्डींग करणाऱ्या, फिटनेस प्रिय व्यक्तींसाठी योग्य ठरते. ज्या दुधामध्ये स्निग्धपदार्थ नगण्य असतात त्या दुधाला स्किम्ड मिल्क म्हटले जाते.
या दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असून, इतर पोषणमूल्य मात्र, मुबलक मात्रेमध्ये असतात. त्यामुळे ज्यांना आपल्या आहारातून दुधाचे पोषण कमी न करता केवळ फॅट्सचे प्रमाण कमी करायचे असेल, त्यांनी आपल्या आहारामध्ये स्किम्ड दुधाचा समावेश करावा. ज्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश, फुल क्रीम दुधाच्या मानाने कमी असतो, त्याला मटोन्ड दूध म्हटले जाते. फुल क्रीम दुधामध्ये पाणी आणि स्किम्ड मिल्क पावडर घालून हे दूध तयार केले जाते. ज्यांना फुल क्रीम दूध पचण्यास त्रास होतो अशा व्यक्तींकरिता हे दूध पर्याय ठरू शकते. ज्यांना वजन घटवायाचे आहे, किंवा फुल क्रीम दूध पचण्यास अवघड होत असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये या दुधाचा समावेश करावा. ज्यांना आपल्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश अगदी कमी हवा असेल त्यांच्यासाठी डबल टोन्ड दुधाचा पर्याय उपलब्ध आहे.
लॅक्टोज इन्टॉलरन्स ही स्थिती अनेक व्यक्तींमध्ये आढळून येत असते. अशा व्यक्तींना दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पचत नाहीत. शरीरामध्ये दूध पचण्यास सहायक असलेल्या लॅक्टेज नामक एन्झाइमची कमतरता असल्याने हे स्थिती उद्भवत असते. तर कधी दुधामध्ये भेसळ असल्यानेही दूध पचण्यास त्रास उद्भवू शकतो. भारतामध्ये दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून, यामध्ये साबणचुरा, कॉस्टिक सोडा, युरिया, पांढरा पेंट आणि तेलाची भेसळ दुधामध्ये केली जात असते. त्यामुळे दुधामध्ये भेसळ नसल्याची खात्री करून घेण्यासाठी टेस्ट किट्सचा वापर करावा. आल्मंड मिल्क, म्हणजेच बदामांपासून तयार केलेले दूध आणि सोयाबीनपासून तयार करण्यात आलेल्या दुधाचे पर्याय आता बाजारांमध्ये सहज उपलब्ध आहेत.