राग हा माणसाचा शत्रू आहे,’ हा सुविचार आपण अगदी लहानपणापासून शाळेत फळ्यावर लिहित आलेलो आहोत. हा शत्रू सगळ्यात जास्त नुकसान करणारा असतो, हे ही आपल्याला माहित असतं. कुठल्याही मोठ्या आर्थिक नुकसानापेक्षा, ह्या रागामुळेच अनेक नाती, अनेक संबंध अगदी कायमचे नष्ट होतात.
अविचाराच्या हातात हात घालून येणारा हा शत्रू माणसाची सद्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवण्यास भाग पाडतो. मनासह शरीरावरही वाईट परिणाम करणारा हा राग ( anger management ) का येतो माणसाला इतका? “कळतं पण वळत नाही’ असेही घडते, पण राग काही शांत होत नाही माणसाचा.
काही गोष्टी कारणीभूत असतात हा न दिसणारा शत्रू निर्माण होण्यासाठी. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, सततचे अपयश, सतत होणारा अपमान आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला साथ न देणारं आपलं नशिब. अनेकजण म्हणतीलही की, आपलं नशीब आपणच घडवायचं असतं, पण हातावरील रेषाही तितक्याच महत्वाच्या असतात.
अचानक येणारा वा अगदी स्वाभाविक असणारा हा राग आपण कसा हाताळतो किंवा काबूत आणतो हेही आपल्याच हातात असते. अनेक वेळा या राग मुळे आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचे व्यक्त होतो, अपशब्द बोलतो, हमरातुमरीवर येऊन रागा च्या भरात समोर कोण आहे, हे विसरून परिस्थिती हातातून घालवण्यास कारणीभूत ठरतो. याचा परिणाम अगदी खोल होतो, हेही आपल्याला कळत नाही.
राग ( anger management ) निवळल्यावर कळते की आपण चुकलो! पण धनुष्यातून सोडलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. तलवारीसारखे मनावर घाव करणारे शब्द रागा च्या भरात एखाद्याकडून उच्चारले गेले तर ते घाव कधीही न भरण्यासारखे असतात. मग हे टाळण्यासाठी, ही नाती तुटू नयेत म्हणून आपण काय करू शकतो?
तर सगळ्यात महत्वाचा असतो संयम आणि तो राखणं असतं सगळ्यात कठीण. दोन किंवा अधिक वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र राहतात, नात्यात गुंफली जातात तर कधीतरी भांड्याला भांडं लागतंच, किंवा थोडेफार वाद होतातच. पण ह्यातून मनं तुटणं, नाती दुभंगणं, असं होऊन नये म्हणून आपणच प्रयत्न करायचे असतात.
हो मलाही येतो राग कारण मीही साधारण माणूसच आहे. मनाला एखादी घटना नाही पटली, कोणीतरी उगाचच कारण नसताना आपल्याला काही बोललं, तेव्हा वाईट तर वाटतंच. मग मी काय करते? तर शांत बसते, हो… राग येतो, मनाला दुखतं, त्रासही होतो, पण हीच वेळ असते संयम राखण्याची. समोर आपलाच माणूस असतो, तो आपल्याला रागाच्या भरात काहीही बोलतो, तेव्हाही नाही पटलं तरी एका क्षमतेपलीकडे जाऊन मी त्याला काहीही बोलत नाही.
अगदी त्रयस्थ माणूसही जेव्हा माझ्या विरोधात जातो किंवा त्याचीच चूक असते हेही मला कळत असतंच, तर ते कळूनही मी तिथेही शांत बसते. तुम्ही म्हणाल की, शांत बसण्याने आपण बरोबर नाही ठरणार, किंवा समोरच्याला वाटेल हिचीच चूक आहे. पण मी नाही याचा विचार करत. उलट मला तर असा अनेक वेळा अनुभव आला आहे की, आपण बरोबर असताना आपल्या बाजूने अनेकजण उभे राहतात, कारण आपण खरे असतो.
मग मी चुकतच नाही का? नेहमीच बरोबर असते का? तर असेही नाही. माझा राग शांत झाला आणि मला माझी चूक उमगली की, मी समोरच्या माणसाची माफी मागते; मनातील किल्मिषे दूर करते. माझ्यासाठी नातं महत्वाचं असतं, आपल्या स्वभिमानाहून. पण चूक असेन तेव्हाच, उगाच चुकीची नातीही मला जोपासायला आवडत नाहीत. कुठलाही आरोप, चुकीचे शब्द मी तरी खपवून घेणार नाही आणि तुम्हीही घेऊ नका, कारण चुकीच्या नात्यात अडकणे, स्वाभिमान गहाण टाकणे मूर्खपणाचे ठरेल. तेव्हा संयम आणि माफी योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या नात्यातच जपा.
– मानसी चापेकर