पुणे – हा शवासना(Shavasana)चाच एक प्रकार आहे. या आसनाला शास्त्रीय आधार आहे. नेहमी उजवा श्वास हा शरीराला शितलता देतो आणि डावा श्वास उष्णता म्हणूनच विरूद्ध कुशींवर विरूद्ध श्वास चालू असतो. जेवणानंतर फार पूर्वीच्याकाळी 15 ते 20 मिनिटे वामकुक्षी घेण्याची परंपरा होती.
हीसुद्धा शास्त्रीय आधारावरच होती. अशा प्रकारे शवासन (Shavasana) करताना एकदा डाव्या कुशीवर झोपावे त्यावेळी डावा हात कोपरात दुमडून डोक्याखाली घ्यावा. दोन्ही पायाचे गुडघे एकमेकांवर येतील अशास्थितीत पाय दुमडून झोपावे. दुसरा हात हा कंबरेपाशी अन् थोडासा मांडीवर सरळ घ्यावा. अशाप्रकारे या स्थितीत डोळे मिटून शरीर शिथिल करावे. अशा स्थितीत एक ते दोन मिनिटे कमीत कमी आणि जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटे झोपावे. एकदा डाव्या कुशीवर आणि एकदा उजव्या कुशीवर अनुक्रमे अशा पद्धतीने शवासन (Shavasana) करावे.
जेवणानंतर थोड्यावेळाने अशा पद्धतीने केलेले शवासन (Shavasana) लाभदायी आहे कारण अशापद्धतीने शवासन (Shavasana) केले असता अन्नपचन चांगले होते. खरं तर शवासन हे दिसायला सोपे पण करायला आणि टिकवायला अवघड असते म्हणूनच शवासन (Shavasana) या विश्रांतीच्या आसनात आपल्या शरीरातील पेशी अन् पेशीला विश्रांती मिळायला पाहिजे त्यासाठी शिथिलीकरण आवश्यक आहे. शिथिलीकरण हा प्रत्येक शवासनाचा गाभा आहे. डाव्या आणि उजव्या कुशीवरच्या या शवासनात शरीर ढिले सोडावे.
मनाने प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचावे. मुख्यतः कंबरेचे सर्व स्नायू तसेच पाठीच्या एकेक कण्यापर्यंत मनाने पोहोचून तिथले स्नायू ढिले सोडावे. “माझी कंबरदुखी थांबलेली आहे तसेच पाठदुखीही पूर्ण बरी झालेली आहे.’ असा सकारात्मक विचार करत संथ श्वसन करावे. ज्या ज्यावेळी आपल्याला पाठदुखी व कंबरदुखी थकल्यासारखे वाटेल त्या त्या वेळी अशा पद्धतीने शवासन करावे. जर का रात्री झोप व्यवस्थित झाली नसेल तरीदेखील हे पाच मिनिटे करायला हरकत नाही. ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांनी रोज झोपण्यापूर्वी पाच मिनिटे डाव्या आणि उजव्या कुशीवरचे शवासन करावे.
या शवासनाचे अनेक फायदे आहे. मुख्य म्हणजे शरीराला नवजीवन मिळते. कडक स्नायू शिथिलतेमुळे कार्यक्षम बनतात. मनाची अस्थिरता आणि अशांतता दूर होते. शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरातील प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचतो तसेच हृदयातील नीला आणि रोहिणीचे कार्य सुधारते. रक्तशुद्धी उत्तमप्रकारे होते. शवासनामुळे अनेक रोग बरे झाल्याची उदाहरणे आहेत.
रक्तदाब, हृदयरोग, मेंदूचे विकार, फिटस् येणे, नाडी दुर्बल होणे, श्वसनाचे विकार यासारखे तसेच मानसिक विकारही बरे करणारे शवासन म्हणूनच प्रत्येकाने नियमित केले पाहिजे. डाव्या आणि उजव्या कुशीवरचे शवासन हे आपला कंबरदुखी व पाठदुखीमुळे आलेला थकवा घालवते. आपल्याला मनःशांती मिळवून देते आणि शारिरीक व मानसिक शक्ती वाढवते कारण डाव्या आणि उजव्या म्हणजेच उष्ण आणि शितल श्वासाने शरीर हे समतोल राखले जाते. शरीराला उत्तमप्रकारे विश्रांती मिळते आणि शरीरात नवचैतन्य संचारते. उत्साह वाढतो. स्फुर्ती येते म्हणूनच प्रत्येक स्त्रीपुरूषाने डाव्या व उजव्या कुशीवरचे शवासन करणे हितावह आहे.
शिथिलीकरण केले असता श्वास आपोआप सुक्ष्म होत जातो श्वसनक्रिया मंदावते, साऱ्या इंद्रियांवरचे लक्ष मन दुसरीकडे वळवते आणि आपोआपच अशा व्यक्तीच्या नखापासून केसांपर्यंतच्या सर्व अवयवांना विश्रांती मिळते व कंबरदुखी व पाठदुखी बरी व्हायला मदत होते. रोज पाच ते दहा मिनिटे करावे.