मेलॅनिनच्या नाशाला सुरुवात आणि पांढरे डाग दिसण्याची सुरुवात प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळी असते. गोऱ्या माणसांमध्ये उन्हाळ्यात त्वचा रापली किंवा काळी पडली म्हणजे पांढरे डाग त्वचेवर उठून दिसतात. काळी त्वचा असलेल्यांना पांढरे डाग लगेच दिसू लागतात. एकदोन ठिकाणी दिसणारे चट्टे संपूर्ण शरीरावर पसरतात. पांढरे डाग काही भागापुरतेच राहणार की संपूर्ण शरीरावर उमटणार हे कधीच सांगता येत नाही. आजारपण आणि मानसिक ताण यामुळे पांढरे डाग लवकर पसरतात.
कधीकधी काही ठराविक भागापुरते पांढरे डाग दिसतात आणि कित्येक दिवस तिथेच राहतात. पण अचानक सगळीकडे पसरू लागतात. कधीकधी शारीरीक किंवा मानसिक ताणामुळेही लवकर पसरतात. काहीवेळा पसरणे आपोआप थांबते. असे थांबणे आणि पसरणे सतत चालूच असते.
एकदा पांढरी झालेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी कधीच होत नाही. पूर्ण शरीरभर पांढरे कोड असेल तर तरी ते अल्बीनेससारखे म्हणजे रंजकहीन सारखे दिसत नाहीत. कारण त्यांच्या डोळ्यात आणि केसांमध्ये काहीच फरक झालेला नसतो.
पांढऱ्या डागांवर मानसिकतेचा प्रभाव
त्वचेवरच्या पांढऱ्या डागांमुळे पेशंटला नेहमीच अस्वस्थ वाटते. सामान्य माणसांना त्यांची मानसिकता कशी असते हे कधीच समजणार नाही. इतर पांढऱ्या डागांचे पेशंट असलेल्यांसोबत बोलण्याने त्यांचे मन बरेच मोकळे होते.