मधुमेह झालेल्या बहुतांश रुग्णांना दिवसातून तीन ते चार वेळा कधी कधी जास्त वेळाही इन्शुलीनचा डोस इंजेक्शनद्वारे घ्यावा लागतो. यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या त्रासातून त्यांची लवकरच सुटका होणार आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत काम करणाऱ्या केरळ येथील एका संशोधन संस्थेने एक तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याद्वारे तुम्ही मायक्रो नीडल्समध्ये विशिष्ट प्रमाणात इन्शुलीन इंजेक्ट करून ठेवू शकता आणि त्याद्वारे ते इन्शुलीन तुमच्या शरीरात टप्प्याटप्प्याने सोडले जाईल. यामुळे इंजेक्शन घेण्याचा त्रास कमी होईल.
एका चौकटीत काही मायक्रो नीडल्स तयार करण्यात आल्या असून त्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट प्रमाण असलेले इन्शुलिन भरून ठेवले जाते. ही चौकट तुम्ही एकदा हातावर इंजेक्ट करून ठेवली की त्यातील मायक्रो नीडल्सच्या माध्यमातून ठराविक वेळाने तुमच्या शरीरात इन्शुलीन पाठविले जाते. यामुळे प्रत्येकवेळी इंजेक्शन घेण्याची गरज पडणार नाही. या संशोधनाच्या वैद्यकीय तपासण्या सुरू असून लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहे.
भारतामध्ये 67 दशलक्ष मधुमेह रुग्ण असून, यापैकी तीन दशलक्ष रुग्ण इन्शुलिन इंजेक्शनचा वापर करतात. यापैकी बहुतेक रुग्ण हे इन्शुलिन वापराच्या योग्य पद्धतीबद्दल अनभिज्ञ असून, इन्शुलिनच्या अयोग्य वापरामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. इन्शुलिन इंजेक्शनच्या योग्य वापराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने दरावर्षी जानेवारी महिन्यात “इन्शुलिन इंजेक्शन दिन’ही साजरा केला जातो.
मधुमेही रुग्णांना योग्य ठिकाणी इंजेक्शन देण्यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या शरीरातील विविध भागांना सूज येते. एका वैद्यकीय सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, 35 टक्के रुग्णांना इन्शुलिनबाबत पूर्णांशानं माहीती नसल्याचं जाणवलं तर 22 टक्के रुग्णांना इंजेक्शन किती वेळ आत ठेवायचे याची माहिती नव्हती. तर 15 टक्के लोक इंजेक्शन घेताना त्वचा किती फोल्ड करावी याबद्दल अनभिज्ञ असल्याचे उघड झाले. इंजेक्शनच्या अयोग्य वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी इन्शुलीन इंजेक्शनच्या योग्य वापराबद्दल काही शिफारसी केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे :
- इन्शुलिन इंजेक्शन देण्यासाठी मांडी किंवा हाताचा वरचा भाग यांचा वापर केला जाऊ शकतो.
- इंजेक्शन देण्याआधी तो भाग कोमट पाण्याने स्वच्छ करावा.
- लहान मुलांसाठी 6 एमएम सुईचा वापर करावा. लठ्ठ मुलं तसेच वृद्धांसाठी 10 एमएम सुईचा वापर करावा.
आधी वापरलेल्या सुईचा पुनर्वापर टाळावा. दरवेळी नव्या सुईचाच वापर करावा, - इंजेक्शन देण्याचा भाग बदलत राहावा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- इंजेक्शन कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नयेत. ते ठेवण्यासाठी 15 ते 25 अंश तापमानाच्या थंड तसेच अंधाऱ्या (जेथे सूर्यप्रकाश पोहोचणार नाही अशा) जागेचा वापर करावा.
गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी – गर्भवती महिलांमध्ये, त्वचेची घडी वाढवून पोटामध्ये इंजेक्शन द्यायला हवे.
पहिल्या तिमाहीत महिलांनी इन्शुलिनची जागा किंवा तंत्रज्ञान बदलू नये. दुसऱ्या तिमाहीत इन्शुलिनचे इंजेक्शन देण्यासाठी पोटाच्या मागच्या भागाचा वापर केला जाऊ शकतो, तसे करताना गर्भावरील त्वचेपासून लांब इंजेक्शन द्यायला हवे. तिसऱ्या तिमाहीत पोटावर इंजेक्शन देता येऊ शकते. तसे करताना त्वचेची घडी व्यवस्थित करायला हवी.
मधुमेहाचे प्रकार
आयडीडीएम – या प्रकारचा मधुमेह लहान वयात किंवा तरुणपणी होतो. शरीरात इन्शुलीन तयार होत नाही किंवा अत्यल्प होते. यांना इन्शुलीनचे इंजेक्शन अनिवार्य असते. इन्शुलीनअभावी शरीरात किटोन तयार होतो. यातून व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मृत्यूच्या स्थितीकडे जाऊ शकते.
इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह – मधुमेहाच्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांना इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह असतो. हा सहसा चाळिशीनंतर होतो. अधिक वजन आणि बैठी जीवनशैली या आजाराला कारण ठरते. आहार, औषधी आणि योग्य जीवनशैली यांनी या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
गरोदरपणातील मधुमेह – काही महिलांमध्ये दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत मधुमेहाची लक्षणे दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना हा त्रास होतो. जीवनशैलीतील बदल आणि उशिरा होणारी गर्भधारणामुळे हा त्रास होतो. यामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे, बाळाची ग्लुकोज कमी होणे, बाळाला जन्मल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे किंवा कावीळ यांना सामोरे जावे लागते.
औषधामुळे होणारा मधुमेह – अनेक औषधांमुळे शरीरातील इन्शुलीनची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. अशा स्थितीस सेकंडरी मधुमेह म्हणतात. या प्रकारचा मधुमेह औषधे बंद केल्यास बरा होतो.
इन्शुलीन रेजिस्टंस – दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलीन तयार होते, पण पेशी इन्शुलीनला प्रतिसाद देत नाहीत. याला इन्शुलीन रेजिस्टंस म्हणतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये मधुमेह असल्याची जाणीव लगेच होत नाही.
कारणे आणि लक्षणे – एफसीपीडी या मधुमेह विशेष प्रकारात पोटात दुखणे, शौचाला जास्त प्रमाणात व तेलकट होणे आणि अन्नघटकांचे पचन व शोषण अपूर्ण राहिल्यामुळे होणारी लक्षणे दिसून येतात. स्वादुपिंडात तयार होणारी पाचकद्रव्ये कमी झाल्याने अशा रुग्णांची पचनशक्ती मंदावते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील बदल अशा दोन्ही कारणांनी मधुमेह होत असावा. स्थूलपणा मोजण्यासाठी बॉडीमास इंडेक्सचा वापर करतात.
– डॉ. मेधा क्षीरसागर