पुणे – आहारामध्ये शेंगावर्गीय भाज्या, फळे, दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, मोडाची धान्ये, मका इत्यादी अधिक प्रमाणात घ्यावे. यातून शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे मिळतात.
खजूर भिजवून, वाटून- गूळ, मीठ व जिरे घालून केलेली चटणी रोज आहारात घ्यावी.
आहारात कडीपत्त्याचा जास्तीत जास्त समावेश करावा त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.
आहारात हिरव्या भाज्या, रंगीत फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थ, डाळी, उसळी, दूध, दही, आवळा इत्यादी गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा केसांचा पोत सुधारण्यास फायदा होतो.
4 चमचे खोबरेल तेल आणि बाजारात मिळणारे ई जीवनसत्त्वाचे तेल एक चमचा एकत्र करून रात्री केसांच्या मुळांना लावावे. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावे. त्यामुळे केसांचा पोत सुधारतो.
कोरफड हा केस आणि त्वचा या दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे. कोरफडीच्या गरात लिंबू पिळून तो केसांना लावल्यास केसांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो.
मानसिक ताण असल्यासही केस गळणे, कोरडे होणे, पांढरे होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दररोज ध्यान करणे, श्वसनाचे व्यायाम करणे, मन रमविण्यासाठी काही छंद जोपासणे आणि राग व चिडचिड यावर नियंत्रण मिळवणे याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट करावी. त्यात लिंबूरस घालून केसांना अर्धा तास लावून ठेवावे. यामुळे कोंडा कमी होतो व त्वचेला आराम मिळतो.
अपुरी झोप हेही केसांचे आरोग्य चांगले न राहण्याचे एक मुख्य कारण आहे. 7 ते 8 तासांची पूर्ण झोप मिळाल्यास केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.