महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय एका रुग्णावर यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी मयत डोनरकडून हृदय घेण्यात आले. सदर रुग्णाला झालेल्या आजारामध्ये, हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी झाली होती. त्याच्या हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढल्याने कमकुवत होत होती.
या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पायऱ्या चढताना त्रास होत होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. तेथील डॉक्टरांनी त्यांना नवी मुंबई येथील हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता.
या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट म्हणाले की, डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ 17% काम करत होते आणि त्याला तातडीने हार्ट ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती.
रुग्णासारखाच रक्तगट असणारी 41 वर्षीय महिला डोनर होती. या महिलेला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी 40 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.
सदर रुग्णाचे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करत तो उत्तम उपचारांची प्रतीक्षा करत होता.
– डॉ. संजीव जाधव