[[{“value”:”
Healthy Relationships: ‘प्रेम’ हा शब्द उच्चारला की आपल्या मनात सर्वात आधी काय चित्र उभं राहतं? बहुतेक वेळा एक मुलगा आणि एक मुलगी. रस्त्यावर, कॉलेजमध्ये किंवा गाडीवर एकत्र दिसले की लगेच आपण त्याला ‘लफडं’ असं लेबल लावतो आणि विषय संपवतो. त्यापलीकडे विचार करायची सवयच आपल्याला उरलेली नाही.
यासाठी फक्त व्यक्तींना दोष देऊन चालणार नाही. बदलत चाललेला समाज, मूल्यांची गोंधळलेली व्याख्या आणि पाश्चात्य संस्कृतीचा अपुरा, अयोग्य प्रभाव यामुळे प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीच संकुचित होत चालली आहे. जी भावना संपूर्ण जगाला जोडणारी आहे, ती आज फक्त स्वतःपुरती आणि अनेकदा विकृत अर्थाने पाहिली जाते.
खरं सांगायचं तर ‘प्रेम’ म्हटलं की ऊर्जा, उत्साह, समाधान, आनंद असे शब्द आज आपल्या मनात येतात का? जसं ‘राग’ ही भावना आयुष्याचा भाग आहे, तसंच किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मूलभूत भावना आहे. प्रेमाशिवाय कोणाचंही आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही.
पण प्रेमाचा अर्थ फक्त रोमँटिक नात्यांपुरता मर्यादित नाही. आईचं बाळावरचं प्रेम, नवरा-बायकोचं एकमेकांवरचं प्रेम, आजी-आजोबांचं नातवंडांवरचं प्रेम, भाऊ-बहिणीचं नातं, मित्र-मैत्रिणींची साथ, अगदी काही लोकांचं प्राणी-पक्ष्यांवरचं प्रेम ही सगळीच प्रेमाची रूपं आहेत.
या सगळ्या नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी भावना म्हणजे प्रेमच. या प्रेमावरच तर अख्खं जग उभं आहे. खरं प्रेम हे जगण्यासाठी बळ देणारं असतं.
कठीण प्रसंगात उभं राहायला शिकवणारं असतं. ‘माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी आहे’ ही भावना माणसाला आतून मजबूत करते.
पण सध्याच्या काळात निर्मळ प्रेम कमी आणि विकृत, स्वार्थी प्रेम अधिक दिसतं. जिथे प्रेमापेक्षा वासना जास्त असते, विश्वासापेक्षा संशय अधिक असतो,
आणि आपलेपणापेक्षा अधिकार गाजवण्याची वृत्ती वाढलेली असते.
प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. त्यात विश्वास आहे, आपलेपणा आहे, हक्क आहे, अनेक संकटांशी लढण्याचं बळ आहे, आणि रोज नव्याने जगण्याची ऊर्जा आहे.
मात्र या प्रेमाच्या अभावामुळेच आज अनेक नाती तुटत आहेत. घटस्फोट वाढत आहेत. माणसं एकटी पडत आहेत. निराशा, नैराश्य आणि भावनिक पोकळी वाढताना दिसते आहे. म्हणूनच समाज काय करतोय, यावर सतत चर्चा करण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करूया.
प्रेमाची संकुचित व्याख्या बाजूला ठेवून, आपण प्रेमाने जग जिंकण्याचा प्रयत्न करूया. आपण कितीही व्यस्त असलो, तरी कुटुंबासाठी वेळ काढूया. घरातल्या माणसांशी प्रेमाने बोलूया. मित्र-मैत्रिणींसोबत मोकळा वेळ घालवूया. आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवरही प्रेम करूया. ज्यांना शक्य असेल, त्यांना आपल्या प्रेमाचा आधार देऊया. आणि आपलं प्रेम संकुचित राहू नये, याची जाणीव ठेवूया.
प्रत्येकाने स्वतःपुरतं जरी हे ठरवलं, तरी अनेक नाती आपोआप सावरतील. दुरावलेली माणसं पुन्हा जवळ येतील. आणि आयुष्य अधिक सकारात्मक, समाधानी आणि आनंदी बनेल. निखळ, निःस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम हेच खरं जगण्याचं बळ आहे.
“}]]
