जनुकसूत्रीय दोष असलेल्या दाम्पत्याची संतती निरोगी जन्मावी आणि त्यांना निर्धोक पालकत्वाचे समाधान लाभावे यासाठी सतत यशस्वी प्रयत्न करणाऱ्या बंगळुरू येथील एका खासगी हॉस्पिटलने आपल्या कीर्तीत यशाचा आणखी एक तुरा खोवला आहे. सिकल सेल ट्रेट या गंभीर समस्येने ग्रस्त मराठी दाम्पत्याला डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे पूर्णतः निरोगी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. दोन महिलांना सिकल सेल ट्रेट ही व्याधी आहे. त्यांच्या विवाहाला चार वर्षे झाली आहेत आणि दोघेही अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक होते; परंतु आपल्या संततीला याच व्याधीचा त्रास होईल का, या चिंतेत होते.
सिकल सेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी प्रौढांमध्येही हा रोग आढळतो. हा रोग अनुवंशिक आहे. पुरातन काळात मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी मानवाच्या जनुकांमध्ये काही बदल झाले. आपल्या पेशींमध्ये गुणसूत्रांची (जनुक ज्यात स्थित असतात असे क्रोमोझोम्स) जोडी असते. एक आईकडून गुणसूत्र येते तर दुसरे पित्याकडून. एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो, परंतु असा बदल झालेला दुसराही गुणसूत्र असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. एक गुणसूत्र बदलले की त्याला ‘ट्रेट’ किंवा ‘कॅरिअर’ म्हणतात.
वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय निवडला. डॉक्टरांनी ही कृत्रिम गर्भधारणा घडवून आणताना प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस हे तंत्र वापरून आठ पैकी एकमेव निर्दोष एम्ब्रायो निवडला आणि महिलेस गर्भधारणा झाली. त्यानंतरच्या गर्भअवस्थेत त्यांची प्रकृती कसलाही त्रास न होता स्थिर राहिली आणि त्यांनी यथावकाश एका सुदृढ बालिकेला जन्म दिला. तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे असा अपत्यजन्म सुरक्षितपणे होण्यास मोठी मदत झाली आहे. प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस ही कृत्रिम गर्भधारणेपूर्वी वापरलेली तंत्रज्ञान पद्धती दांपत्यांमधील जनुकीय दोष संततीमध्ये येऊ न देण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची ठरते. ही तंत्रज्ञान पद्धती वापरून सिस्टिक फायब्रोसिस, बीटा थॅलेसेमिया, सिकल सेल डिसीज, हिमोफिलिया अशा माता-पित्यांमधील दोषांची बाधा संततीला होऊ नये, याची खबरदारी घेता येईल.
– डॉ. देविका गुणशिला
– डॉ. राजशेखर नायक