– प्रज्ञा पिसोळकर
रजोनिवृत्तीनंतर स्त्रीचे शरीर बेडौल दिसायला लागते. केस पिकतात. आणि याबरोबरच तिची सुंदर दिसण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु होते. ब्युटीपार्लरच्या खेपा वाढतात. कधीकधी तर औषधांसाठी किंवा आरोग्यतपासण्यांसाठी बाजूला ठेवलेले पैसे ती सौन्दर्यप्रसाधनांवर खर्च करते. पण खरंतर वय काही केल्या लपत नाही. फेशियल, हेअर डाय, मसाज, नेलपॉलिश, लिपस्टिक अशा वरवरच्या बेगडी उपायांमुळे ती अधिकच बिचारी दिसू लागते. गॉसिपिंगसाठी कारण ठरते. कपडे, दागिने, घरगुती कार्यक्रमात ती मन रमवू पहाते पण अधिकच एकटी पडत जाते. मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी यासारख्या व्याधींमुळे थकून जाते. त्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्यास या व्याधी नियंत्रणाबाहेर जातात.
तशा तिला मैत्रिणी भरपूर असतात. विविध भिश्या असतात, किटी पार्ट्या असतात. पण व्यक्तिमत्व संपन्न करायला तिथे पुरेसा वाव नसतो. कपडे, दागिने, शॉपिंग यावरच्या गप्पा आणि इतरांची उणीदुणी काढण्यातच वेळ निघून जातो. नवे छंद खुणावत नाहीत, नवी पुस्तके वाचण्यात मन रमवत नाही, नवीन काही शिकत नाही आणि जीवन एकसुरी, कंटाळवाणं होऊन जातं. मुलं मोठी होऊन स्थिरावतात, नवरा त्याच्या उपक्रमांमध्ये आणि मित्रमंडळीत बिझी रहातो. स्त्री मात्र एकाकी होते. रिकामपण तिला खायला उठतं. उदासिनता, चिंता यातून ती ते व्यक्त करते. मग वारंवार घर आवरणे, स्वच्छता करणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेळ घालवणे असे उद्योग सुरु होतात.
यावर पर्याय म्हणजे नियमित व्यायाम, योगासने, ध्यान करणे. आत्मपरीक्षण करणे, आपल्या आवडीचे छंद जोपासणे, बागकाम करणे, निसर्गाच्या सानिध्यात रहाणे. स्त्रियांनी आपली सौंदर्याची व्याख्या तपासून पहायला हवी. आपले शरीर आतूनही सुंदर, निरोगी कसे राहील याकडे लक्ष द्यायला हवे. नियमित आरोग्यतपासणी आणि औषधोपचार यामध्ये हेळसांड करता कामा नये. हेळसांड नको, हितरक्षण हवे! या हेळसांडीच्या मागे काय असते?
1. मानसिकता – पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिची जडणघडण झाली असते. घरातील पुरुषांना आणि इतर कुटुंबियांना सेवा देणे हाच गृहिणीधर्म असे संस्कार तिच्यावर असतात. स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटलं की तिला अपराधी वाटते.
2. दिवसात 24 च तास असतात! या तासात तिला अनेक कामे आणि इतर सर्वांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात! त्यामुळे वेळेअभावी स्वतःच्या गरजा ती मागे टाकते.
3. मल्टीटास्किंगची धडपड – सर्वच पातळ्यांवर स्वतःला सिद्ध करण्याचा ताण स्त्रिया स्वतःवर घेतात. सुपर वुमन बनायच्या तणावाखालीच त्या हळूहळू खचत जातात.
4. स्त्रिया कुटुंबाला प्राधान्य देतात. पण स्त्रियांना कुटुंबात प्राधान्य असतेच असे नाही. कुटुंबियांचे प्राधान्यक्रम वेगळे रहातात, ते घरातील स्त्रिसाठी पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे तिच्या शारिरीक आणि मानसिक अपेक्षा बऱ्याचदा उपेक्षित रहातात. याचा परिणामही तिच्या आरोग्यावर होतो.
यावर उपाय काय?
1. स्त्रीने स्वतःच आपले हितरक्षण करायला हवे. ती ठीकठाक असेल तरच तिचे घर नीट राहील ना? तिने स्वतःसाठी (व्यायाम, छंद, वाचन) वेळ काढायला हवा. कोणी तिची काळजी घेत नसेल तर स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला हवी. स्वतःशी सुद्धा तिने प्रेमाने वागायला हवे.
2. अधिक पैसा, अधिक साड्या आणि दागिने, अधिक सौन्दर्यप्रसाधने, अधिक टाळ्या नाकारण्याचे धैर्य तिने दाखवायला हवे. उत्तम तब्येतीइतका सुंदर दागिना नाही!
3. स्वभावाला औषध असते. स्वतःच्या स्वभावातील व विचारांतील त्रुटींवर प्रयत्नपूर्वक काम करायला हवे.
4. आत्मपरीक्षणाची सवय लावून घ्यायला हवी. वाईट गोष्टींवर काय काम केलं त्याचीही नोंद करून ठेवायला हवी. अनेक दुखण्यांचा उगम नकारात्मक मानसिकता, स्व-उपेक्षा, चुकीच्या सवयी यात असतो.
5. तिने “नाही’ म्हणायला शिकायला हवे. कोणी जर गृहीत धरत असेल, तिच्या वेळेवर अतिक्रमण करत असेल तर तिला स्पष्टपणे पण नम्रपणे नकार देता आला पाहिजे.
6. चाळिशीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे वार्षिक तपासण्या करून घ्यायला हव्या. तिथे काटकसर कामाची नाही. मग भले एखाद-दुसरी साडी किंवा चैनीची वस्तू कमी घेतली तरी चालेल! वार्षिक तपासण्या करून काही आजार प्राथमिक स्थितीत लक्षात आले तर आटोक्यात ठेवणं सोपं जातं.
7. योग्य आहार आणि व्यायामाबद्दल तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. डॉक्टर गुगल, व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी किंवा मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या टिप्सवर अवलंबून राहू नये.
8. जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक जोडावेत. त्यांच्यापाशी आपले मन मोकळे करावे. नकारात्मक व्यक्ती, प्रसंग यांपासून चार हात लांब राहिलेलेच बरे. ते आपल्या ऊर्जेचे शोषण करतात.
9. आपल्याला आरोग्यदायी भविष्य दाखवणाऱ्या मार्गावर त्वरित चालणं सुरु करावं. चालढकल करू नये. सोबतीला कोणी असेल तर उत्तमच! कोणी नसले तरी एकट्यानं का होईना, पण धैर्यानं आणि चिकाटीनं त्या मार्गावर चालून आपलं उद्दिष्ट गाठावं!
– प्रज्ञा पिसोळकर