
health tips : मूलभूत स्वचतेची गरज मोठी….
March 2nd, 8:01amMarch 2nd, 8:41am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो.
जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. संपर्कात आलेल्या व्यक्तीला जंतुसंसर्ग झाला असेल तर तो निरोगी व्यक्तीकडे येऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी कोणी शिंकला, खोकला तर त्याचाही संसर्ग आपल्याला होऊ शकतो. दुसरं कारण आहे हवेचं प्रदूषण.
या प्रदूषणाचा परिणाम आपला घसा, नाक, फुप्फुसं, श्वसननलिका यांवर होऊ शकतो. बाहेरचं खाणं हेही जंतुसंसर्ग होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. अस्वच्छ ठिकाणी खाल्लं तर जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्याने रुग्णाला ताप येतो. घसा फुलतो. अनेकदा घशात पू सुद्धा होतो. अशा वेळी रुग्णाला प्रतिजैविकं (अँटिबायोटिक्स) द्यावे लागतात.
ऍसिडिटी आणि पोट खराब होणं आणि घसा आणि पोट यांचं फारच जवळचं नातं आहे. झोपेत पोटातील ऍसिड घशात येतं. त्याचा परिणाम घशावर होतो. बद्धकोष्ठतेचा (कॉंस्टिपेशन) त्रास होतो. घसादुखीही वाढते. आवंढा गिळताना त्रास होतो. अशावेळीे ऍसिडिटीची ट्रीटमेंट देता येते.
सिझनल ऍलर्जींना-हायनायटिज म्हणतात. म्हणजे खोकला येणं, नाकातून पाणी येणं, सर्दी होणं, नाक लाल होणं. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी अशा प्रकारचे त्रास डोकं वर काढतात. वातावरणात धुरकं (धूर आणि धुकं) तयार होतं. त्यावेळी लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना याचा त्रास जास्त होतो.
दम्याचे त्रास डोकं वर काढतात. ब्रॉंकायटिससारखे फुप्फुस आणि श्वसनलिकेचे आजरही जडतात. याचं प्रमाण वृद्धमंडळी, लहान मुलांमध्ये सर्वात जास्त असतं. अशा वेळी बाहेरचं खाणं टाळावं. गरम पाणी प्यावं. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवून खावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. रोज मोकळ्या हवेत फिरण्यास जावे.