आजकाल टी.व्ही.वर एक जाहिरात येत आहे. दोन मैत्री गप्पा मारत आहेत. त्यातली पहिली मैत्रिण दुसऱ्या मैत्रिणीला सांगते. “मै मेरे बच्चों को कॅल्शियम के लिये रोज दो ग्लास दूध देती हूँ।’
दुसरी मैत्रिण- दूध? और कॅल्शियम के लिए?
पहिली मैत्रिण- दूध देती हूँ।
दुसरी मैत्रिण- अच्छा, अच्छा और कॅल्शियम के लिए क्या देती हो?
पहिली मैत्रिण- अभी तो बताया। दूध देती हूँ।
दुसरी मैत्रिण- दुध तो देती हूँ पर उसका कॅल्शियम मिलता है क्या?
पहिली मैत्रिण- मतलब?
कॅल्शियमचे शरीरात शोषण होण्यास ड जीवनसत्वाची गरज असते. हे सत्य तरी सामान्य माणसांना या जाहिरातीमुळे कळले. लहान मुलांच्या वाढीसाठी हाडांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी कॅल्शियमची गरज असते. हे आता सर्वसामान्यांना देखील कळते, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास काय होईल हे देखील आता सामान्य जनता ओळखून आहे. पण कॅल्शियमची कमतरता फक्त लहान बाळांमध्येच किंवा लहान मुला-मुलींमध्येच होते असे नाही.
तर अगदी तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होते. वाढीच्या वयात, वयात येणाऱ्या मुली, गरोदर स्त्रिया आमि स्तनपान करणाऱ्या माता यांच्यात मात्र नेहमीपेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात लागते किंवा यांच्या शरीरात कॅल्शियमची मागणी वाढलेली असते. सर्वसाधारणपणे शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची कारणे कोणती ते जाणून घेऊत.
- शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता
- आहारात ड जीवनसत्वयुक्त पदार्थांचा, प्रथिनांचा अभाव
- पोषणदृष्ट्या असंतुलित आहार
- उतारवयात काही आजारांच्या परिणामामुळे आतड्यांची शोषणशक्ती कमी झाल्यावर आमाशयाची ऑपरेशन झाली असल्यास
- पौंगडावस्थेत किंवा वयात येताना ड जीवनसत्व कमी पडल्यास
- सूर्यप्रकाशाचा पूर्णपणे अभाव असलेल्या जागी किंवा अंधाऱ्या कोठडीत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅल्शियमची कमतरता असते.
- वारंवार बाळंतपण आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये
- गरोदर स्त्रीच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर तिला होणाऱ्या बाळामध्येदेखील कॅल्शियमची कमतरता असते.
- स्त्रियांमध्ये वयाच्या 45 ते 50 दरम्यान पाळी गेल्यानंतर शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते
- दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, कॉफी यांच अतिसेवन करण्याने शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यास अडथळे येतात. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते.
- वारंवार आणि दीर्घकाळ उपोषण करणाऱ्या व्यक्तींमध्ये
- काही विशिष्ट प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतल्याने कॅल्शियमची कमतरता जाणवते. उदा. फिटेसाठीची औषधे, स्टिरॉईड्स
- किडनीची कार्यक्षमता खालावणे, काही वेळा किडनीचं कामकाज योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे किडनीमार्फत उत्सर्जन झाले नाही तर रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढू लागते. त्यामुळे कॅल्शियमची पातळी खालावते आणि जर फॉस्फरसचे अतिप्रमाणात उत्सर्जन झाले तर हाडांमधील कॅल्शियम रक्तात येते. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होते.
- काही व्यक्तींना गव्हाच्या अन्नाची ऍलर्जी असते. गव्हाचे पदार्थ खाल्ले की या व्यक्तींना जुलाब सुरू होतात. त्या जुलाबामुळे त्यांच्या आतड्यातून कॅल्शियम व फॉस्फरस शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे हाडे कमकुवत बनतात.
अगदीच तान्हुल्या बाळात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास होणाऱ्या आजारास रिकेट्स किंवा मुडदूस म्हणतात. तर प्रौढ व्यक्तींमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास होणाऱ्या आजारास ऑस्टिओमलॉरीया म्हणतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जर हाडे ठिसूळ झाली तर त्यास ऑस्टिओपोरॅसिस असे म्हणतात.
हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे –
थोड्याशा कामानेही किंवा नुसत्या चालण्या-फिरण्यानेही पेशंट थकून जातो. शरीरातील सर्व स्नायूंना थकवा जाणवतो. स्नायू दुखू लागतात. कंबरदुखी, पाठदुखी जाणवते. हाडे दुखू लागतात. वेदना हाडांपर्यंत जाणवतात. चालताना किंवा जिने चढताना त्रास होतो. जमिनीवर बसलेल्या स्थितीतून उठता कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. चालणे डुलतडुलत होते. दातांमध्ये फटी दिसू लागतात. दातांच्या वरील आवरण कमकुवत बनते. त्यामुळे दात किडू लागतात. रिकेट्स किंवा मुडदूसमध्ये ड जीवनसत्वाची म्हणजेच व्हिटामीन डी ची कमतरता असल्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचय प्रक्रियेमध्ये अडथळे येतात. हा आजार साधारणतः सहाव्या महिन्यापासून सुरू होतो. आणि पुढे बरेच वर्षे सुरू राहतो.
पहिल्या दोन वर्षात या आजाराचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. तरी पण उर्वरीत आयुष्यावर या आजाराचे परिणाम दिसून येतात. मुडदूस झालेले बाळ आजारी, अशक्त आणि हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा से दिसू लागते. बाळाचे स्नायू शिथिल पडू लागतात.
6 ते 12 महिन्याच्या बालकांमध्ये डोक्याच्या कवटीची हाडे मऊ होतात. डोक्याचा आडवा व्यास वाढतो. कपाळ फुगीर होते. मागच्या बाजूचे डोके चपटे होते. कपाळावर खूप प्रमाणात घाम येतो. एक वर्षानंतरच्या बाळात छातीचा पिंजरा फुगीर बनतो. वारंवार सर्दी होते. घसा बसतो. टॉन्सिल वाढतात. स्वरयंत्राला सूज येते. फुफ्फुसातील वायूकोशांना सूज येते. न्यूमोनियाचे इन्पेक्शन वारंवार होते. पाठीच्या कण्यामध्ये बदल होतात. कुबड आल्याप्रमाणे दिसते. पोटाचे स्नायू सैल पडल्यामुळे पोट थुलथुलीत दिसते. बाळ रात्रीच्या वेळी अस्वस्थ होते.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे. या आजाराचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त प्रमाणात असते. या आजारातही पाठीच्या कण्यात बाक निर्माण झाल्याने काही प्रमाणात उंची कमी होते. किरकोळ आघातानेदेखील फ्रॅक्चर हे विशेषकरून खुब्याच्या सांध्यात दंडातील हाडाच्या वरच्या टोकाला पाठीच्या मणक्यामध्ये आणि मनगटाच्या ठिकाणी आढळतात. एक्स-रे मध्ये देखील हाडांमदील घनता कमी झालेली दिसून येते. काही स्त्रियांमध्ये विशेषतः ज्यांचे उंचीच्या प्रमामात वजन खूप कमी आहे, पाळीच्या वेळी खूप प्रमाणात रक्तस्त्राव होतो, आहारात दूध-तुपाचा समावेश नसतो आणि आहारही फार कमी प्रमाणात घेतात, वारंवार उपवास करतात अशा स्त्रियांमध्ये चानक स्नायू आंकुचित होतात.
हे स्नायू आकुंचित होत असताना त्यात एक विशिष्ट प्रकारचा ताठरपणा असतो. हाताची पाचही बोटे एकमेकाच्या जवळ येतात, अंगठा ताठ होऊन जास्तीत जास्त करंगळीच्या दिशेने वळतो. हात मनगटामध्ये आतल्या बाजूस वाकतो. हे अशा प्रकारे जे क्रॅम्स येतात त्यात वेदना फार प्रचंड प्रमाणात होतात. हे हातामध्ये असा प्रकारे क्रॅम्प्स येत असताना पाहणाऱ्यास ही आकडी आहे की काय? अशी शंका मनात येते. काही पेशंटमध्ये पायाच्या बोटांमध्ये विशेषतः पायाच्या अंगठ्यामध्ये असा प्रकारे अचानक क्रॅम्प्स येतात तर काही पेशंटमध्ये पायाचे गोळे अचानक वर चढतात.
हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यास…
ज्यांच्या हाडामधील कॅल्शियम कमी झाले आहे अशा पेशंटने किंबहुना आरोग्याची निरोगी, सुदृढ आयुष्याची इच्छा करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे. या कोवळ्या उन्हामुळे आपल्या शरीरात ड जीवनसत्वाची निर्मिती होते. दूध, दही, ताक, लोणी, तूप, पनीर, मासे यामधून व्हिटामीन डी आणि कॅल्शियम मिळते. आहार हा संतुलित आणि पुरेसा असावा. हिरव्या पालेभाज्या, उसळी, फळे, मांसाहार अंडी, स्निग्ध पदार्थ प्रोटीन्स असे सर्व काही योग्य प्रमाणात असावे.
या सर्व पदार्थांचा आहारात समावेश असताना पचनसंस्था उत्तम असावी. अन्यथा सोन्याचा घास खावूनही अंगी लागत नाही. अशी अवस्था व्हायची. वारंवार जुलाब होणे, शौचात आव-शेम पडणे, अपचन, भूक न लागणे, जेवणाविषयी अनिच्छा असा तक्रारीकडे प्रथम लक्ष द्यावयास हवे आहे. सोबत सर्व अंगाला औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाचे मालिश करणे जरुरीचे आहे. अश्वगंधा, गुडुची शतावरी, प्रवालपिष्टि, शंखभस्म, कपर्दिकभस्म, कुक्कुटांडत्वक् भस्म, अभ्रकभस्म, माक्षिक भस्म, रौप्यभस्म, या औषधींचा या आजारात फार चांगला उपयोग होतो.
या औषधींमधून मिळणारे कॅल्शियम शरीरास मानवते आणि कोणतेही दुष्परिणाम न होता मांसधातू, अस्थिधातू यांना ताकद मिळकते. कॅल्शियमची कमतरता असणाऱ्या पेशंटनी किंबहुना आरोग्य संपन्न शरीर प्राप्त करू इच्छिणाऱ्या सर्व आबालवृद्धांनी नियमितपणे दुधातून चांगल्या प्रतीच् शतावरी कल्प घ्यावा. रोज सकाळी अनुश्यापोटी केशरयुक्त स्पेशल च्यवनप्राश नियमाने घ्यावा. (लेखिका आयुर्वेदाचार्य आहेत)
– डॉ. वैशाली माने