[[{“value”:”
Health & Fitness: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२६ मधील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना मिलेट्सच महत्त्व अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी विशेषतः बाजरीचे आरोग्यदायी फायदे सांगत बाजरीला ‘सुपरफूड’ असं संबोधलं.
पंतप्रधान म्हणाले की, मिलेट्सकडे देशातील लोकांचा ओढा सातत्याने वाढताना पाहून समाधान वाटतं. जरी २०२३ हे वर्ष ‘मिलेट इयर’ म्हणून साजरं केलं गेलं असलं, तरी आजही देशात आणि जगभरात बाजरी व इतर मिलेट्सबद्दल उत्साह कायम आहे.
तमिळनाडू आणि राजस्थानमधील प्रेरणादायी उपक्रम
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी तमिळनाडू आणि राजस्थानमधील शेतकरी व महिलांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. तमिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात सुमारे ८०० महिला शेतकरी बाजरी आणि इतर मिलेट्सवर आधारित उद्योगांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी बाजरी प्रक्रिया युनिट सुरू करून थेट बाजारात उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
राजस्थानमधील रामसर भागात ९०० पेक्षा अधिक शेतकरी बाजरीची शेती करत असून, बाजरीपासून तयार होणाऱ्या रेडी-टू-ईट लाडूंना मोठी मागणी आहे. आज अनेक मंदिरांमध्येही प्रसादासाठी बाजरीचा वापर केला जात असून, यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत आहे आणि लोकांच्या आरोग्यालाही फायदा होत आहे.
बाजरी का मानली जाते सुपरफूड?
बाजरी ही भारतातील अत्यंत जुनी आणि पौष्टिक धान्यप्रकार आहे.
बाजरीमध्ये
फायबर
प्रोटीन
लोह
कॅल्शियम
मॅग्नेशियम
अँटीऑक्सिडंट्स
हे सर्व पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. १०० ग्रॅम बाजरीत सुमारे ११–१२ ग्रॅम प्रोटीन आणि ८–९ ग्रॅम फायबर आढळतं.
पचन, वजन आणि आरोग्यासाठी फायदेशीर
बाजरी पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिच्यातील जास्त फायबरमुळे
बद्धकोष्ठता
गॅस
अॅसिडिटी
यांसारख्या तक्रारी कमी होतात. बाजरी खाल्ल्याने पोट लवकर भरतं आणि जास्त वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे अती खाणं टळतं व वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
मधुमेह, हृदय आणि हाडांसाठी लाभदायक
बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती योग्य ठरते.
रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
बाजरीतील मॅग्नेशियममुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
कॅल्शियम व फॉस्फरसामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.
लोहामुळे अॅनिमियापासून बचाव होण्यास मदत होते.
तसंच बाजरीमध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ग्लूटेन अॅलर्जी असलेल्या लोकांसाठीही ती सुरक्षित आहे.
पंतप्रधान मोदींनी दिलेला संदेश स्पष्ट आहे, बाजरी आणि इतर मिलेट्स केवळ पारंपरिक अन्न नाहीत, तर उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहेत. दैनंदिन आहारात बाजरीचा समावेश केल्यास आरोग्यात सकारात्मक बदल निश्चितच दिसून येतील.
“}]]
