बाळाची वाढ आणि विकास यामध्ये स्तनपानाचा मोलाचा वाटा असतो. आई जरी बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करत असली तरी त्यात तरबेज होण्यासाठी थोडा काळ जावा लागतो, थोडा धीर ठेवावा लागतो. यादरम्यान…
– बाळाला दूध पुरतेय का?
– बाळ अजून भुकेलेच नाही ना?
– भुकेमुळे बाळ किरकीर करतंय का?
– बाळाला पुरेल इतकं दूध मला येतंय ना?
अशी काळजी स्वाभाविक असते आणि पहिलटकरिणींमध्ये ती जास्त प्रमाणात दिसून येते. नवीन बाळ, नवीन आई म्हटलं की अनेक सल्लेदेखील मिळतात. मला दुग्धवर्धक पदार्थांची आवश्यकता आहे का?
दुग्धवर्धक पदार्थ आईचे दूध वाढविण्यास मदत करतात. जरी सगळ्या आया दुधाच्या प्रमाणाबद्दल चिंता करत असल्या तरी बहुतांश आयांना पुरेशा प्रमाणात दूध येते. अशा आयांना दुग्धजन्य पदार्थांची तशी गरज नसते. जर बाळाची स्तनाची पकड व्यवस्थित असेल आणि जर 2-3 तासांनी तुम्ही बाळाला दूध पाजू शकत असाल तर तुम्हाला पुरेसे दूध येते असे समजायला हरकत नाही. दूध पुरेसे असण्याचे दुसरे चिन्ह म्हणजे बाळाने दिवसातून 6 ते 8 वेळा शू करणे. काही क्वचित वेळा काही आयांना दुग्धवर्धक पदार्थ देण्याची गरज भासते. भारतात पूर्वापारपासून स्तनपान करणाऱ्या मातांच्या आहारात अनेक दुग्धवर्धक पदार्थांची रेलचेल असते. याचे प्रमाण आता हळूहळू कमी होऊ लागले आहे.
दुग्धवर्धक पदार्थांची गरज केव्हा भासू शकते?
– अंगावर दूध न येणे किंवा त्याचे प्रमाण कमी असणे बऱ्याचदा त्रासदायक ठरते पण त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. दुग्धवर्धक पदार्थ खालील कारणांमध्ये उपयुक्त ठरू शकतात…
– जेव्हा अंगावरच्या दुधाचे प्रमाण कमी असते आणि याचे कोणतेही कारण सापडत नाही.
– तुम्ही बाळासाठी पंपने दूध काढता.
– अपुऱ्या दिवसांचे अथवा वजनाचे बाळ झाल्यास, ते दवाखान्यात असल्यास पंपने दूध काढायची वेळ येते.
– स्तनांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्तनपान करायची वेळ येते.
– पाळी पुन्हा सुरू होण्यामुळे अथवा काही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे अंगावरील दुधाचे प्रमाण कमी होते.
– दत्तक घेतलेल्या बाळाला स्तनपान करण्याची तुमची इच्छा असते.
– स्तनपान बंद केले असताना तुम्हाला ते पुन्हा सुरू करावेसे वाटते.
अंगावरील दुधाचे प्रमाण कसे वाढवता येईल?
– बाळाच्या चोखण्यामुळे अथवा ब्रेस्ट पंपच्या सहाय्याने पंप केल्यानंतर अंगावरचे दूध स्त्रवायला सुरुवात होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या अंगावरच्या दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी खालील गोष्टी करता येतील:
– बाळाने स्तनाग्र ओठांमध्ये नीट पकडले आहे याची खात्री करा. ही पकड योग्य असल्यासच दूध नीट स्त्रवते. याबाबत तुम्हाला खात्री नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– स्तनांना नियमितपणे उत्तेजन द्या. नियमित स्तनपान करून अथवा पंपने दूध काढून दुधाचे प्रमाण वाढेल. दोन स्तनपानांमध्ये पंपच्या सहाय्याने दूध काढल्याचाही फायदा होईल. फक्त पंपचा वापर करत असल्यास दर 2 ते 3 तासांनी पंप वापरून दूध काढणे फायदेशीर ठरेल.
अंगावरचे दूध वाढवायला मदत करतील असे काही अन्नपदार्थ आहेत का?
स्तनपानाचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात माहीत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अनेकविध दुग्धजन्य पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना गॅलॅक्टोगॉग्ज अथवा लॅक्टोजेनिक पदार्थ असेही म्हणतात. ओटमिल, बार्ली, आलं, लसूण, पालेभाज्या, यीस्ट, बदाम, बडीशेप, हातसडीचा तांदूळ असे काही पदार्थ. रोजच्या चौरस आहाराबरोबर हे पदार्थ घेतले तरच ते उपयुक्त ठरतात.
मेथी :
अंगावरचे दूध वाढवण्यासाठी मेथी सर्वात उत्तम समजली जाते. दूध सुरू करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी देखील मेथी वापरली जाते. अतिरिक्त प्रमाणात वापरल्यास मेथी रक्तातली साखर कमी करू शकते आणि पोट बिघडण्याची देखील शक्यता असते. यामुळे मेथीचा वापर संभाळून करायला हवा.
शेवगा :
स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये शेवग्याची उपयुक्तता सर्वपरिचीत आहे. शेवग्याला तर जादुई झाड म्हणून संबोधिले जाते. पण गरोदर राहू इच्छिणाऱ्या महिलांनी याचा वापर करू नये कारण फलित बीजाचे गर्भाशयात रोपण होण्याच्या प्रक्रियेत यामुळे अडथळा येण्याची शक्यता असते.
शतावरी :
शतावरीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असून ती दुधाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
फ्रेंच लिलिऍक :
ही औषधी वनस्पतीदेखील दुग्धवर्धक आहे. स्तनांमधील दूध तयार करणाऱ्या ग्रंथींवर याचा परिणाम होऊन दुधाचे प्रमाण आणि प्रवाह सुधारण्यास मदत होते. ज्या मातांमध्ये सुरुवातीपासूनच दुधासंबंधी काही तक्रारी आहेत अथवा ज्यांच्या स्तनांची काही शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांमध्ये दूध तयार करणाऱ्या ग्रंथींची कमतरता आहे, अशांमध्ये ही वनस्पती प्रभावी ठरते. यामुळे जवळपास 50% नी दुधाचे प्रमाण वाढते व दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा विकास होतो असे दिसून आले आहे.
बडीशेप :
दुधाचे प्रमाण वाढवण्याबरोबरच बडीशेप पोटाचे त्रास, वात दूर करते. स्तनपान करणाऱ्या मातांना बऱ्याचदा मेथीबरोबर बडीशेप दिली जाते.
लाल रास्पबेरीची पाने :
यामुळे दूधाचे प्रमाण वाढण्याबरोबरच बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाचा आकार पूर्वपदास येण्यास मदत होते. या पानांमध्ये जीवनसत्वे (उदा. नायसिन – ब गटातील जीवनसत्व) व खनिजद्रव्यांचे प्रमाण लक्षणीय असते. .
निरगुडी :
जरी यामुळे प्रोलॅक्टिनचे प्रमाण कमी होत असले तरी पूर्वापारपासून हा पाला दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी वापरला जातो. ज्या महिलांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन आहे अशांसाठी हा पाला विशेष उपयुक्त ठरतो. पण या पाल्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांची पाळी सुरू होऊ शकते.
अल्फाल्फा :
यातील जीवनसत्वे व खनिजद्रव्यांच्या मुबलक प्रमाणामुळे दुधाचे प्रमाण वाढायला मदत होते. यातील मकेफ जीवनसत्वामुळे रक्तस्त्राव थांबायलाही मदत होते. बऱ्याचदा प्रसूतिआधी 6 आठवडे रक्तस्त्राव टाळण्यासाठी आणि नंतर काही महिने दूध भरपूर येण्यासाठी ही वनस्पती दिली जाते. रक्त पातळ ठेवण्यासाठी जे औषधे घेतात त्यांनी ही वनस्पती घेऊ नये.
ब्लेस्ड थिसल/मिल्क थिसल :
दूध वाढवण्याबरोबरच प्रसूतिनंतरचे नैराश्य कमी करण्यासही यामुळे मदत होते.
ओवा :
दुधाचे प्रमाण सुधारते पण फार काळ घेत राहिल्याने याचा यकृतावर परिणाम होऊ शकतो. यासाठी स्तनपान करणाऱ्या माता व बालकांनी फार काळ याचे सेवन करू नये.
हॉप्स :
काही विदेशी मद्यांमध्ये (जर्मन बिअर) याचा वापर केला जातो. भारतातील मद्यांमधे मात्र याचा वापर केला नसतो. पण दुग्धवर्धक म्हणून याचा वापर करताना काळजीपूर्वक करायला हवा. योग्य प्रकार आणि प्रमाण महत्वाचे. याचा वापर फारसा सुचवला जात नाही कारण यामुळे गुंगी येऊ शकते.
दूध वाढवण्यासाठी काही औषधे आहेत का?
या कशाचाच उपयोग झाला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टर काही औषधे देऊन बघतात. विशेषतः दत्तक घेतलेल्या बाळाला जर स्तनपान करण्याची आईची इच्छा असेल किंवा स्तनपान थांबवले असताना ते पुन्हा सुरु करण्याची इच्छा असेल तर औषधांचा वापर केला जातो. बाळ कमी दिवसांचे, कमी वजनाचे असेल, दवाखान्यात असेल आणि आईचे दूध पंपने काढून कमी पडत असेल तर ते वाढवण्यासाठी औषधे देता येतात.
रेग्लान (ठशसश्रेप रपव ऊोशिीळवेपश) आणि डॉमपेरिडॉन ही दोन नेहमी दिली जाणारी औषधे. आईचे दूध सुरू करण्यासाठी, त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, त्याच्या स्त्राव योग्य प्रकारे होण्यासाठी ही औषधे मदत करतात. ऑक्सिटोसिनचा नाकात मारायचा स्प्रे, आणि ह्युमन ग्रोथ हार्मोन या औषधांचा देखील दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी फायदा होतो; पण ही औषधे फारशी वापरली जात नाहीत.
नेहमी दिले जाणाऱ्या रेग्लान या औषधाचे मात्र काही दुष्परिणाम आहेत. उदा. औदासिन्य. डॉमपेरिडॉनचे असे काही दुष्परिणाम पाहिले गेले नाहीत.
दुग्धवर्धक पदार्थ आहारात घेण्यापूर्वी काही काळजी घ्यायला हवी का?
दुग्धवर्धक पदार्थ आहारात घेत असताना बाळाला नियमितपणे स्तनपान देणे अथवा दूध पंपच्या सहाय्याने काढणे महत्त्वाचे आहे. असे केले तरच या पदार्थांचा चांगला परिणाम दिसून येतो. वर सांगितलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. बाजारात मिळणारे हर्बल टी आणि दुग्धवर्धक सप्लीमेंट्समध्ये दुग्धवर्धक पदार्थांचे सुरक्षित प्रमाण वापरलेले असल्याने ते सुचविलेल्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही. त्याचे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. पण एक लक्षात ठेवले पाहीजे की जास्त म्हणजे चांगले हे चुकीचे आहे. दुग्धवर्धक पदार्थ अति प्रमाणात घेतल्यास त्याचा आई आणि बाळावरदेखील दुष्परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरांना केव्हा दाखवायला हवे?
तुम्ही जर वर सांगितलेले पर्याय करून पाहिले असतील आणि पुरेसे दुग्धजन्य पदार्थ आहारात घेऊन देखील दूधाचे प्रमाण वाढत नसेल, तर डॉक्टरांना भेटायला हवे. डॉक्टर तुम्हाला खरंच पुरेसे दूध येत नाही का आणि तसे असल्यास त्यामागची कारणे याची खातरजमा करतील; ती कारणे दूर करायचा प्रयत्न करतील. बाळाला दूध पुरत नाही असे वाटल्यास बाळालाही डॉक्टरकडे घेऊन जा. ते बाळाच्या देखील काही तपासण्या करतील (उदा. बाळाचे वजन, उंची व वाढ इ.). कोणतीही औषधे सुरु करण्यापूर्वी मात्र डॉक्टर आणि स्तनपानाबाबतीतील तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. ते तुम्हाला औषधांचा योग्य डोस, तुमच्या बाबतीत योग्य ठरेल असे औषधांचे योग्य एकत्रीकरण याबाबतीत मार्गदर्शन करतील आणि तसे लिहून देतील.
दुग्धवर्धक पदार्थ केव्हा काम करत नाहीत?
दुग्धवर्धक पदार्थ नेहमी उपयोगी पडतीलच असे नाही. सर्व प्रयत्न केल्यानंतरही तुमच्या मनाप्रमाणे तुमचे दूध वाढले नाही असे होऊ शकेल. स्तनांची अपुरी वाढ झाली असणे, स्तनांचा कर्करोग झाला असणे अथवा त्यासाठी औषधोपचार घेतलेले असणे यामुळे सर्व उपाययोजना करूनदेखील दूध पुरेसे येणार नाही असे होऊ शकते. क्वचितप्रसंगी बाळाला वरचे अन्नपदार्थ अथवा सप्लिमेंट्स द्यावी लागतील. अशाप्रसंगी त्यात काही वावगे नाही. पण प्रयत्न सोडू नका. स्तनपान करणे सोडू नका. हा तुमच्या आणि तुमच्या बाळातला दुवा तुमच्यातील नाते नक्कीच घट्ट करेल!
– श्रुती कुलकर्णी