
Health awareness : मणक्याची गादी सरकणे
March 9th, 7:00amMarch 8th, 2:26pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एका उच्च पदस्थ निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांच्या आवाजातील एक प्रकारची जरब आणि स्पष्टपणा चांगलाच जाणवत होता. कमरेच्या दुखण्याकरिता त्यांच्या एका हितचिंतकाने आमच्या क्लिनिकमधील पोश्चरल थेरपीबद्दल माहिती देऊन संपर्क करण्यास सांगितले होते.
सर्व माहिती गोळा करून मगच त्यांनी क्लिनिकमध्ये संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी अचानकपणे एक वजनदार वस्तू उचलण्यासाठी ते वाकले होते. ती जड वस्तू उचलताना त्यांच्या कमरेमध्ये अतिशय जोरात उसण भरली आणि ते जवळ जवळ जागेवर कोसळले. पुढच्या तीन दिवसांमध्ये दुखण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, त्यांच्या कमरेपासून खाली पायातील संवेदना मात्र कमी झाल्या होत्या. चालणे तर दूरच थोडी हालचाल करणेदेखील त्यांना अशक्य झाले.
त्यांच्या या अवस्थेवरून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासण्यानुसार हे लक्षात आले की, त्यांच्या कमरेतील मणक्यातील गादी सरकून तेथील नसा मोठ्या प्रमाणात दबल्या गेल्याने शस्त्रक्रियेशिवाय कोणताही पर्याय नाही. परंतु कोणतीही शस्त्रक्रिया नाकारून इतर उपचार पद्धती अवलंबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. स्वत:च्या प्रचंड सकारात्मक ऊर्जेमुळे पुढील दोन महिन्यात अन्य उपचार पद्धतीमुळे ते व्हील चेअरशिवाय काठीच्या आधाराने थोडे अंतर चालू लागले होते. परंतु दोन्ही पायांमध्ये संवेदना कमी होऊन पाय दुखणे मात्र सुरू झाले होते. पायात सुन्नपणा राहून मुंग्या देखील येत होत्या. ते स्वत: अजूनही कोणतीही हालचाल करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी पोश्चरल थेरपी घेण्याचा निर्णय घेतला होता.
पोश्चरल थेरपीच्या निरीक्षणानुसार चालताना त्यांच्या पायातील स्नायूंची आणि खुब्याच्या हाडांमधील ताकद कमी असल्याने चालताना ते कमरेत लपकल्यासारखे दिसत होते. उभे राहिले असता कमरेपासून वरचा भाग किंचित मागे झुकल्यासारखा दिसत होता. त्यांच्यातील हा बदल त्यांच्या नजरेतूनही सुटला नव्हता. त्यांच्या एकंदर परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करून ही उपचार पद्धती कशी असेल याची कल्पना देऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. थेरपीच्या सुरुवातीच्या काळात थोडा वेळ बसणेही त्रासदायक असूनसुद्धा त्यांनी जिद्द न सोडता सांगितलेल्या गोष्टी कसून पूर्ण केल्या.
त्यांनी टिपून ठेवलेल्या तासा गणिक झालेल्या सुधारणांचा आढावा घेऊन काही व्यक्तिसापेक्ष होमिओपॅथीक औषधे त्यांना दिली. औषधांच्या जोडीला काही वैयक्तिक व्यायामही करायला सांगितले. कमालीचा आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर सुरुवातीच्या पंधरा तासांतच त्यांच्यात योग्य अशी सुधारणा दिसून आली. पायातील आणि कमरेमधील ताकद वाढल्याने त्यांचे चालणे सुधारले होते. काठीच्या आधाराने चालणे बंद होऊन इतर कसल्याही आधाराशिवाय ते चालू लागले.
पायातील वेदना कमी झाल्या होत्या. तसेच पायात असणारा सुन्नपणा आणि मुंग्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. वरच्या शरीराचा मागे झुकलेला भाग कमी होऊन आता ते सरळ झालेले स्पष्ट दिसून येत होते. केवळ पंधरा तासांतील हा सकारात्मक बदल असला तरीही पूर्णपणे बरे होण्याकरिता अजून काही महीने त्यांच्यावर उपचारांची आवश्यकता असल्याचा सुज्ञपणा नक्कीच त्यांच्याकडे होता. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी फेरतपासणी करून सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळण्याचा त्यांचा नेम त्यांनी चालू ठेवला होता. साधारणपणे दोन महिन्यानंतर ते न थांबता तीन किलोमीटर चालू लागले. त्यांनी दाखवलेला विश्वास, जिद्द, सातत्य आणि सकारात्मकता यांच्या जोरावर ते पुन्हा छानपैकी पळू देखील लागले आहेत.