– डॉ. रमेश गोडबोले
आजी-आजोबांच्या वयाला म्हणजे सर्वसाधारण साठीच्या पुढे सर्व शरीरिक क्षमतांच्या ऱ्हासाला सुरवात झालेली असते. तरुण वयापर्यंत शरीरातील पेशींच्या दररोज मृत होण्याच्या वेगापेक्षा त्याच प्रकारच्या नवीन पेशी तयार होण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे शरीरातील सर्व इंद्रिये वाढत असतात, विकसित होत असतात. परंतु वृद्धत्वामध्ये या उलट प्रक्रिया होत असल्याने प्रत्येक इंद्रियाच्या क्षमतांचा ऱ्हास होत असतो. रक्तवाहिन्यांच्या आतील मुलायम आवरणावर कॅल्शियम व कोलेस्टेरॉलचे पुंजके तयार होतात. तसेच त्यातील लवचिकता कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येतात. या गोष्टी अपरिहार्य व नैसर्गिक आहेत. त्यामुळे कोणीही चिरंजीव होऊ शकत नाही. परंतु या वयपरत्वे होणाऱ्या बदलांचा वेग लिंग, आनुवंशिकता (जेनेटिक ), आहार, व्यायाम , मनःशांती इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने त्या आरोग्याला पोषक होतील असा प्रयत्न केल्यास आजी-आजोबांच्या वयालाही जीवनात स्वास्थ्य लाभू शकते. त्यासाठी खालील सूचनांचा विचार करावा.
प्रतिबंधात्मक उपाय
१) पन्नास ते साठ वयात आपल्याला काही व्याधींच्या पूर्वसूचना मिळू लागतात.
उदा. गुढघे दुखणे, पचनाच्या तक्रारी ( गॅसेस होणे , बद्धकोष्ठता, दात पडणे-किडणे , दम लागणे, वजन वाढणे , चिडचिड होणे इ . ) वरील तक्रारींकडे दुर्लक्ष न करता खाण्याच्या सवयी बदलणे, नियमित व्यायामाची सवय करणे, पडलेले दात बसविणे, अध्यात्मिक वाचन इ . केल्यास या व्याधी नियंत्रणात राहतात.
२) आहार :
आहारातून लोह कमी पडल्यास अँनिमिया , कॅल्शियम व व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसूळ होणे, प्रथिने कमी पडल्याने स्नायूंची क्षमता कमी होणे ही काही नेहमी आढळणारी उदाहरणे आहेत. यासाठी समतोल आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. महत्वाची खनिजे(क्षार) व्हिटॅमिन्स व प्रथिने यांचे शोषण होण्यात अडथळे येतात म्हणून काही वेळा बाजारातील विश्वासार्ह कंपन्यांची फूड सप्लिमेंट्स रोज थोडी घेणे सोपे जाते. च्यवनप्राश हे पूर्वापार प्रसिद्ध असलेले ‘आयुर्वेदिक टॉनिक’ रोज १-२ चमचे घेणे चांगले. डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन्स व मह्त्वाची खनिजे एकत्र असलेली गोळी घेतल्यास आहारातील बदल करूनही राहिलेल्या त्रुटी भरून निघतात. सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, फळे यांचा जेवणात अंतर्भाव तर हवाच. पण मधुमेह, उच्चरक्तदाब, अँसिडिटी अशा प्रकारचा त्रास सुरु झाला असेल तर काही पथ्ये पाळावी लागतात आणि औषधांचा आधार घ्यावा लागतो.
३) व्यायाम :
नियमित व सर्वांगसुंदर व्यायामाची सवय व आवड निर्माण झाल्यास बऱ्याचशा व्याधींना दूर ठेवता येते. डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज ४-६ सूर्यनमस्कार व ३-४ कि.मी. चालणे हा परिपाठ ठेवल्यास डॉक्टरांची वरचेवर भेट घ्यावी लागणार नाही.
४) जनसंपर्क व छंद :
साठी ते सत्तरीनंतर विस्मरण, ऐकू कमी येणे, डोळ्यांच्या तक्रारी, कंबर व मान दुखी (स्पॉन्डिलायटिस), ऐकटेपणामुळे येणारी मनाची दुर्बलता इ. व्याधी सुरु होतात. यासाठी आहार व व्यायामाबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, संमेलने यात सहभाग घेणे, योगासने, प्राणायाम वर्गाला जाणे , अध्यात्मिक वाचन, छंद जोपासणे हे उपाय प्रभावी ठरतात.
प्राथमिक अवस्थेत व्याधींचे निदान:
बरेच वेळा कोणताही विशेष त्रास नसल्यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब,अँनिमिया, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व त्याचा कॅन्सर, स्त्रियांमध्ये ओव्हरी, गर्भाशय किंवा स्तनांचा कॅन्सर अशा व्याधींची सुरवात झालेली कळत नाही. यासाठी जागरूकता लागते. त्याच बरोबर काही तपासण्या वर्षातून एकदा करून घ्याव्यात. आपल्या फॅमिली डॉक्टरांचेकडे जाऊन सर्वसाधारण शारीरिक तपासणी व रक्तदाब (बी.पी) मोजावा. लॅबोरेटरीत जाऊन हिमोग्राम, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल या तपासण्या स्त्री-पुरुष दोघांनीही कराव्यात.
याशिवाय पुरुषांनी पी. एस. ए. (प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर ) व स्त्रियांनी सी. ए. १२५ व सी.ए १५.३ या ओव्हरी आणि स्तनांच्या कॅन्सरचे प्रथमावस्थेत निदान होण्यासाठी रक्ताच्या तपासण्या कराव्यात. तसेच स्त्रियांनी मॅमोग्राफी व पॅप स्मिअर करणेही हितावह असते. पोटाची सोनोग्राफी, ई.सी.जी. या तपासण्याही करणे उत्तम.प्रथमावस्थेत निदान झाल्यास कॅन्सर सारखे रोगही पूर्णपणे बरे होऊ शकतात. मोतीबिंदू व प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे त्रास होत असेल तर शस्त्रक्रिया हाच खरा उपाय असतो. अशास्त्रीय उपचारामध्ये वेळ व पैसा वाया घालवू नये.
कोणताही त्रास अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ” साठी बुद्धी नाठी ” अशी एक म्हण आहे. म्हणजे वय वाढले की मनाचा समतोल ढासळतो. माणूस विचित्र वागू लागतो. यासाठी संसारापासून मनाने अलिप्त राहणे, तरुणांचे कौतुक करणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी आपल्या तरुणपणाशी तुलना करीत न बसणे, मुलगा-सून नोकरी करीत असतील तर घर, नातवंडांवर लक्ष ठेवणे, घरातील छोटी कामे करणे असे धोरण ठरविल्यास तुम्ही कुटुंबाचा आधार होता. रोज आध्यात्मिक वाचन, पूजा,जप या मध्ये थोडा वेळ घालवल्यास व कोणत्यातरी सामाजिक कामात गुंतून राहिल्यास मनःशांती मिळते. पुरुषांनी भाजी आणणे, बँकेत जाणे अशी बाहेरची छोटी कामे तर स्त्रियांनी भाजी निवडणे, झाडांना पाणी घालणे, चहा करणे अशी घरातील कामे केल्यास अशा हालचालीतून आपोआप व्यायाम तर होतोच पण आपण घरातील अडगळ होत नाही.
खालील वचन इंग्रजीत असले तरी ते आजी-आजोबांच्या वयाला खूपच उद्बोधक आहे.
Before breakfast walk a mile,
After lunch rest a while,
After dinner sleep like crocodile,
And in between always smile.
असे केल्याने शतायुषी व्हाल, तंदुरुस्त रहाल व मजेत जगाल.
- डॉ. रमेश गोडबोले