[[{“value”:”
Health: सण म्हणजे आनंद, मिरवणुका, रोषणाई, फटाके, गुलाल आणि गर्दी. पण या सर्व धामधुमीत आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः डोळ्यांची, कारण डोळे हे अतिशय संवेदनशील अवयव आहेत. गर्दीत होणारा धूर, धूळ, रंगीत पावडर, तसेच हवेतले प्रदूषण यामुळे डोळ्यांचे विविध आजार उद्भवू शकतात.
पावसाळ्यामुळे हवेत आर्द्रता अधिक असल्याने संसर्ग वेगाने पसरतो. त्यामुळे डोळे येणे, ऍलर्जी होणे आणि संसर्ग वाढणे यांची शक्यता जास्त असते.
कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे?
1. डोळ्यांत लालसरपणा
2. सतत पाणी येणे
3. डोळ्यांतून स्त्राव (पिवळसर किंवा पांढरट)
4. डोळ्यांत खाज सुटणे किंवा जळजळ
5. प्रकाश सहन न होणे
6. डोळ्यांत काहीतरी अडकले असल्याची जाणीव होणे
ही लक्षणे दिसल्यास विलंब न करता नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टरांच्या मते, काही साधे नियम पाळले तर सण साजरा करतानाही डोळे सुरक्षित ठेवता येतात:
1. गर्दी आणि धूर टाळा- शक्यतो खूप गर्दी, धूर, धूळ असलेल्या ठिकाणी कमी वेळ थांबा.
2. हातांची स्वच्छता- डोळ्यांना हात लावण्याआधी नेहमी हात धुवा.
3. डोळे चोळू नका- डोळ्यांत खाज सुटली तरी वारंवार डोळे चोळणे टाळा.
4. कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास -लेन्स घालून मिरवणुकीत किंवा गर्दीत जाऊ नका.
5. संरक्षक चष्मा वापरा -गुलाल, फटाके किंवा धूर यांचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांना झाकणारे चष्मे घाला.
6. डोळ्यात काही गेले तर, लगेच स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
7. टिश्यूचा वापर करा- डोळे पुसण्यासाठी वेगळे टिश्यू किंवा रुमाल वापरा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावा.
8. लालसरपणा किंवा वेदना असल्यास, विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सण आनंदाचा, आरोग्याचाही!
सण साजरा करताना आनंद महत्त्वाचा आहेच, पण आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. डोळ्यांमध्ये थोडा त्रास जाणवला तरी तो दुर्लक्षित करू नका. वेळेवर योग्य काळजी घेतली, तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि सणाचा आनंदही द्विगुणित होईल.
The post Health: सणासुदीच्या उत्साहात डोळ्यांची काळजी घ्या! गर्दी, धूर आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण कसे कराल? appeared first on Dainik Prabhat.
“}]]
