करोनामुळे झालेला अनेक दिवसांचा लॉकडाऊन थोडाफार सुसह्य होतो तो घराभोवती असणाऱ्या छोट्याशा बागेमुळेच! जगभरात करोनाच्या भीतीचे सावट असताना निर्धास्तपणे फिरायला ही एवढीच जागा शिल्लक आहे!
अंगोपांगी कळ्या ल्यालेली, नेहमीच्या डौलात बहरायला सुरुवात झालेली मधूमालती, निळसर जांभळ्या रंगाची, महाभारतातील पात्रांना सामावून घेणारी, गोडसर मादक सुगंधाची, श्रीकृष्णाची आवडती, डोळे निववून टाकणारी कृष्णकमळाची फुले, सोलर एनर्जीवर चालणारं, सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढेल तस थुई थुई नाचणारं आणि खाली असणाऱ्या लाल, गुलाबी आणि पांढऱ्या बिगोनियाला भर उन्हातही थेंबांच्या स्पर्शाने उल्हासित ठेवणारं इवलसं कारंज, सूर्याची दाहकता वाढेल तस तशी दिवसागणिक आकर्षक होत जाणारी बोगनवेल, लिंबाच्या सावलीत विसावलेली, पांढरे फणे काढून खुणावणारी नागफणी (पीस लिली), जागा मिळेल तसा अस्ताव्यस्त पसरलेला गर्द निळ्या फुलांचा गोकर्ण, लाल, नारंगी, गुलाबी अशा दिलखेचक रंगांची मुक्त उधळण करणारी जास्वंद, दोन फूट बाय सहा फुटाचा टॅंक देखिल थिटा वाटून बाहेर सैलावलेली वॉटर लिलीची पानं आणि या पानांच्या गर्दीतून डोकं वर काढून तोऱ्यात फुलणारी जांभळ्या, अबोली आणि गुलाबी रंगाची वॉटर लिली जे काही अवर्णनीय नेत्रसुख देते ते शब्दातीत आहे! जोडीला पपई, कढीपत्ता, लिंबू, तुळस, पुदिना रोजच्या दिमतीला आहेच!
या सगळ्या चित्राला जिवंतपणा आणतात ते दाणापाण्यासाठी बागेत येरझाऱ्या घालणारे पक्षी! दोन पिल्लांसह येणारी लालगाल्या बुलबुलची जोडी फिडरमधील चुरमुरे पिल्लांना भरवून, मनसोक्त आंघोळ करून, संधी मिळेल तस पपईवर ताव मारून जाते, लाल बुड्या बुलबुलला भलतीच घाई असते, कर्कश्य आवाज काढून बाकी पक्ष्यांना हुसकावून, खाऊनपिऊन स्वारी लगेच गायब होते! विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फॅन टेलची सुरेल शीळ कान तृप्त करून जाते! याला मराठीत “नाचरा’ असं म्हणतात ते उगाच नाहीत! फुलवलेला शेपटाचा पंखा घेऊन सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं आणि स्वतः भोवती गिरक्या घेत, चक् चक् आवाज काढत राहायचं हा त्याचा आवडता छंद! दिवसातून दोन तीन वेळा तरी आंघोळीसाठी येतो.
संध्याकाळी उशिरापर्यंत रॉबिन (दयाळ) घालत असलेली शीळ देखील ऐकण्यासारखी असते, ह्याचा कारभार जरा थंडाच असतो, नर मादी कधीतरीच बरोबर असतात आणि असले तरी भांडण झालेल्या नवराबायकोसारखे! नर मखमली काळा आणि पोटाच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा असतो, पंखावर देखील पांढरा पट्टा असतो तर मादी थोडी राखाडी रंगाची असते, रॉबिन एक नंबरचा नकल्या आहे, झाडावर बसल्या बसल्या अनेक पक्ष्यांचे आवाज काढतो, बरेच पक्षी आहेत असा भास होतो बाहेर जाऊन बघाव तर हाच आपला वेगवेगळे आवाज काढत बसलेला असतो! फिडरमधील चुरमुरे खायला चिमणाचिमणी देखील येतात, आकाराने मोठ्या असलेल्या बुलबुलला ह्यांचा भारी धाक! ह्या चिमण्या बुलबुलला हाकलून लावतात आणि स्वतःचा पोटोबा झाल्याशिवाय त्यांना फिडरवर बसूही देत नाहीत! स्केली ब्रेस्टेड मुनियांची तर गंमतच न्यारी! हे पक्षी चिमणीपेक्षा किंचित छोटे असतात, त्यांचं डोकं ब्राऊन रंगाच असून पोटावर खवल्या खवल्या सारखं डिझाइन असतं, मध्ये मी त्यांच्यासाठी राळ (एक प्रकारच तृणधान्य) ठेवत असे खायला, दहा पंधरा मुनियांचा थवा एक एक करून खाली उतरत असे आणि थोड्या वेळातच सगळ्याचा फन्ना उडवत.
हे पक्षी जीवाच्या भीतीपोटी पाणी पितानाही गिरकी घेऊन आजूबाजूचा अंदाज घेणाऱ्या, डोळ्याभोवती चष्म्याचा भास व्हावा अशा पांढऱ्या रंगाचे वर्तुळ असणाऱ्या हिरवट पिवळ्या रंगाच्या, इवल्याशा ओरिएंटल व्हाईट आय (चष्मेवाला) देखील हजेरी लावून जातात! कूप कूप असा घुमणारा आवाज काढणारा आणि ज्याच्या दर्शनाने दिवस शुभ जातो असा शुभ शकुनी भारद्वाज त्याच बरोबर पाणी पिऊन फांदीवर निवांत बसून खाल्लेल्या फळांच्या बिया तोंडातून बाहेर काढणाऱ्या कोकिळा/कोकीळ, छोट्या छोट्या उड्या मारतं, किडे आणि मध खाण्यासाठी सगळी बाग पिंजून काढणारे ऍशी प्रिनिया आणि टेलर बर्ड हे पिटुकले पक्षी, चिमणीची बहीण शोधावी अशी राखाडी ग्रे-टिट, फुलाफुलांमध्ये मकरंद शोधत फिरणारे सनबर्ड तर कधी कधी अनाहूत पाहुण्यासारखे येणारे किंगफिशर, ड्रोंगो (कोतवाल) आणि पॉन्ड हेरॉन हे सगळे पक्षी म्हणजे बागेचं चैतन्य आहे!
करोनाचा दिवसेंदिवस घट्ट होत जाणार विळखा, बेफान धावणाऱ्या जगाला अचानक कोणीतरी “स्टॅचू’ म्हणावं तसं थांबलेलं जग, रोज हजारोने मरणाऱ्यांचे आकडे, आतडी पिळवटून टाकणारी शेकडो मजुरांनी उपाशीपोटी केलेली पायपीट, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, या सगळ्या परिस्थितीने दाटून आलेलं नैराश्याचे मळभ दूर करायला घरात एक तरी हक्काचा असा “हिरवा कोपरा’ हवाच! जो तुमच्यात नव्याने चैतन्य जागृत करेल आणि साचलेली नकारात्मकता सकारात्मकतेत परिवर्तित करेल! आजच्या घडीला पैसाअडका, दागदागिने या पेक्षा मोकळा श्वास घ्यायला टीचभर जागा असणे या सारखी श्रीमंती ती कुठली?
– प्रज्ञा देशमुख