[[{“value”:”
Ghibli : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा मजेदार फोटो किंवा किस्सा चर्चेचा विषय ठरतो. असं काहीस पुन्हा झाल्याचं पहायला मिळालं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. सेलिब्रिटींपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत, सर्वजण या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. असे दिसते की सोशल मीडियावर या ट्रेंडचा महापूर आला आहे. याच ट्रेंडच नाव आहे ‘घिबली’.
होय सध्या ‘घिबली’ स्टाईल नावाचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, प्रत्येकजण एआयच्या मदतीने त्यांचे फोटो घिबली स्टाईलमध्ये बदलताना दिसत आहे. आणि सगळे जण ‘घिबली-घिबली’ म्हणत आहेत.
कलाकार, सामान्य नागरिक आणि राजकीय नेत्यांनी देखील या ट्रेंडच्या महापुरात उडी मारली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तब्बल 15 फोटो घिबली शैलीत तयार करण्यात आले आहेत. हे सर्व छायाचित्रे गेल्या काही वर्षांत घडलेल्या महत्त्वाच्या घटनांपासून प्रेरित आहेत आणि या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगी दाखवले आहेत.
सोशल मीडियावर ‘#ghibli’ हा ट्रेंड सुरु आहे. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप या सर्व प्लॅटफॉर्मवर फक्त याच कलाकृतीचे फोटो पाहायला मिळत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? ‘घिबली स्टाईल’ म्हणजे नेमकं काय आणि हे फोटो कसे तयार कराचे? नसेल माहित तर चला यावर एक नजर टाकुयात….
घिबली स्टाईल म्हणजे काय?
घिबली शैली जपानी अॅनिमेशन चित्रपट स्टुडिओ ‘घिबली’च्या कला शैली आणि कार्टूनपासून प्रेरित आहे, जो त्याच्या रंगीत आणि जादुई दुनिया साठी प्रसिद्ध आहे. ही पारंपरिक शैली असल्याचं देखील बोललं जात. यामध्ये तुम्हाला पारंपरिक रंग, निसर्ग, पर्यावरण, मानवी भावना, आणि कल्पनारम्य शैलीची झलक पाहायला मिळते.
या स्टुडिओ स्थापना 1985 मध्ये अॅनिमेशनच्या जगातले दोन प्रभावशाली दिग्दर्शक ‘हयाओ मियाझाकी’ आणि ‘इसाओ ताकाहाता’ यांनी केली होती. स्टुडिओ त्याच्या अद्भुत कलाकृती, खोल कथाकथन आणि निसर्ग, मानवता, कल्पनारम्य आणि आत्म-शोधाच्या थीमसाठी ओळखला जातो.
स्टुडिओ घिब्लीने ‘द टेल ऑफ द प्रिन्सेस कागुया’ (2013), ‘स्पिरिटेड अवे’ (2001), ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लायज’ (1988) सारख्या उत्कृष्ट कलाकृतींची निर्मिती केली आहे.
‘घिबली’ नावाचा अर्थ काय होतो?
“घिबली” हे नाव इटालियन भाषेतील एका शब्दावरून आलं आहे, ज्याचा अर्थ “सहारा वाळवंटातून वाहणारा गरम वारा” असा होतो. ‘घिबली’ हा जपानमधील एक प्रसिद्ध अॅनिमेशन फिल्म स्टुडिओ असून, हे पारंपरिक हाताने काढलेल्या अॅनिमेशन तंत्रावर जास्त भर देतं.
हे साधन कोणी बनवले?
एआय चॅटबॉट चॅटजीपीटी 4ओ मध्ये लोकांसाठी घिबली स्टाईल इमेज फीचर समाविष्ट केले आहे, या फीचरने लोकांना काही वेळातच वेड लावले आहे. सध्या, हे वैशिष्ट्य ChatGPT Plus, Pro, Team सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, ‘एआय जनरेटेड इमेजेसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, सध्या हे फीचर मोफत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की हे एआय फीचर लवकरच मोफत वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाऊ शकते’.
चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन किंमत :
चॅटजीपीटी प्लस सबस्क्राइब करण्यासाठी, तुम्हाला दरमहा $20 (सुमारे रुपये 1711) खर्च करावे लागतील आणि प्रो सबस्क्रिप्शनसाठी, तुम्हाला दरमहा $200 (सुमारे रुपये 17.111) खर्च करावे लागतील. जर तुम्हालाही घिबली स्टाईलचे फोटो काढायचे असतील तर तुम्हाला किमान 1711 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल.
ChatGPT वापरून Ghibli स्टाइल इमेज कशा तयार कराव्यात?
1. ChatGPT उघडा व नवीन व्हर्जन सुरू करा.
2. प्रॉम्प्ट बारवरील तीन डॉट्स क्लिक करा – तिथे “Image” पर्याय निवडा.
3. आता तुम्हाला हव्या असलेल्या इमेजचे वर्णन द्या.
4. इमेज तयार झाल्यावर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.
OpenAI ने GPT-4o मध्ये सुधारणा केल्या असून, नवीन मॉडेल अधिक अचूक आणि संदर्भानुसार इमेज तयार करू शकते.
मोफत AI टूल्स वापरून Ghibli इमेज कशा बनवाल? पाहा….
ChatGPT व्यतिरिक्त, Craiyon, Playground AI, Grok आणि Deep AI सारख्या मोफत प्लॅटफॉर्मवरूनही घिबली स्टाइल फोटो बनवता येतात. फक्त मजकूर लिहा किंवा फोटो अपलोड करा, बाकी AI करेल. मात्र, GPT-4o प्रमाणे हे टूल्स अगदी हुबेहुब फोटो तयार करू शकत नाहीत. यामध्ये तुम्हाला थोडासा वेगळा फरक दिसून येतो.
The post #Ghibli : ‘घिबली’ इंटरनेटचं नवं वादळ ! फोटो नेमका कसा तयार करायचा? कशी झाली ट्रेंडला सुरुवात, वाचा इतिहास…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]
