आपल्या जठर-आतडय़ांच्या व्यवस्थेमध्ये अन्ननलिका, छोटे व मोठे आतडे यांचा समावेश असतो. या व्यवस्थेवर दररोज विविध प्रकारच्या अन्नपदार्थाचा हल्ला होत असतो. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाचे सेवन वाढल्यामुळे आपल्या जीआय व्यवस्थेला हे अन्न नीट पचवण्यासाठी अतिरिक्त काम करावे लागते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गॅस्ट्रोइंटेरायटिस हा आजार विशिष्ट ऋतूत होणारा नसला तरी आरोग्यकारक जीवनशैलीचा अवलंब केल्यास तसेच खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी अंगी बाणवल्यास गॅस्ट्रोइंटेरायटिस टाळता येतो किंवा तो होण्याची शक्यता कमी करता येते. सामान्यपणे स्टमक फ्लू म्हणून ओळखला जाणारा गॅस्ट्रोइंटेरायटिस सहसा विषाणूंमुळे (रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरस) होतो. हे विषाणू म्हणजे डायरियाचे,
विशेषत: लहान मुलांमधील डायरियाचे सर्वाधिक आढळणारे कारण आहे. काहीवेळा ई. कोली जीवाणू, कॅम्पिलोबॅक्टर किंवा सॅलमोनेला प्रादुर्भाव यांमुळेही गॅस्ट्रोइंटेरायटिस होऊ शकतो. हे जीवाणू सामान्यपणे कमी शिजवलेल्या अन्नपदार्थातून, विशेषत: मटण व चिकन-अंडी यातून पसरतात. त्यामुळे हे अन्नपदार्थ स्वच्छ करताना व शिजवताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. अर्थात, या आजाराबद्दल एक आश्चर्यकारक व फारसे माहीत नसलेले सत्य म्हणजे हा आजार संसर्गजन्य आहे. आजाराचा विषाणू असलेल्या माणसासोबत संपर्क आल्यामुळे, दूषित अन्न किंवा पाण्यामुळे किंवा वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे (विशेषत: सार्वजनिक ठिकाणी) हा आजार पसरू शकतो. म्हणूनच हा आजार शाळेत जाणा-या मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो.
गॅस्ट्रोइंटेरायटिसची प्रमुख लक्षणे म्हणजे डायरिया आणि उलटय़ा. याचा परिणाम म्हणून पुढे शुष्क त्वचा, तोंडाला कोरड पडणे, डोके हलके वाटणे आणि सारखी तहान लागणे ही डिहायड्रेरेशनची लक्षणेही जाणवू लागतात. प्रादुर्भाव झाल्यानंतर एक दिवसाने ही लक्षणे सहसा जाणवू लागतात आणि आठवडाभर जाणवत राहतात किंवा कदाचित आणखी काळही जाणवू शकतात. गॅस्ट्रोइंटेरायटिसमुळे जठर व आतडय़ाची जळजळही सुरू होते. रक्ताच्या उलटय़ा, टोकाचे डिहायड्रेशन ही लक्षणे दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही घरगुती उपाय : डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ घेणे : पाणी पिणे सर्वात उत्तम. काही फळांचे रस, शहाळ्याचे पाणी वगैरेही पिऊ शकतात. अर्थात, सॉफ्ट ड्रिंक्स आणि मद्य टाळले पाहिजेत.
विश्रांती : वारंवार रेस्ट-रूमला जावे लागल्याने थकल्यासारखे वाटते. डिहायड्रेशन व अशक्तपणामुळेही असेच होते. तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पूर्ण बरे होत नाही, तोपर्यंत कष्टाची कामे किंवा व्यायाम करणे टाळा.
आहार : उन्हाळ्याच्या दिवसात पचनक्रिया सोपी व्हावी म्हणून नेहमी हलका आहार घेणेच उत्तम. सूप, भात, वरण आदीसाधे अन्नपदार्थ थोडे थोडे खा. तळलेले, मसालेदार पदार्थ किंवा जंक फूड टाळा. लहान मुलांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यासाठी ओटीसी रिहायड्रेशन मिश्रणे उपयुक्त ठरू शकतात.
तोंडाला व ओठांना कोरड पडणे, लघवीचा रंग गडद होणे, त्वचा शुष्क होणे आदी डिहायड्रेशनच्या लक्षणांबाबत सावध राहा आणि त्वरित आवश्यक ते उपाय करा. हा काही घरगुती उपाय नव्हे, पण काही प्रतिबंधात्मक औषधे घेऊन तुम्ही वेदना, मळमळ, उलटय़ा कमी करू शकता. यामुळे आतडय़ांची हालचाल स्थिर होण्यात मदत होईल.
गॅस्ट्रोइंटेरायटिसखेरिज आणखीही अनेक बाबी संतुलन बिघडवू शकतात :
कमी तंतूमय आहार
अपुरा व्यायाम
प्रवास किंवा दिनक्रमातील बदल
दुधाचे पदार्थ किंवा मसालेदार/तळलेले पदार्थ खाणे
तणाव
आतडय़ाच्या हालचालींना विरोध करणे
कॅल्शिअम किंवा ऍल्युमिनिअमचा अंतर्भाव असलेली अँटासिड औषधे घेणे किंवा शरीरातील विविध संस्थांच्या अवस्थांसाठी अन्य औषधे घेणे, अतिरिक्त प्रमाणात प्रतिजैवके घेणे.
जठर-आतडीविषयक समस्यांचा प्रतिबंध
अन्न गरज भासेल त्याप्रमाणे थोडय़ा प्रमाणात शिजवावे आणि प्रत्येक जेवणात ताजे अन्न खाल्ले जाईल याची काळजी घ्यावी. नाशवंत अन्नपदार्थ दीर्घकाळासाठी साठवून ठेवू नयेत.
पोटाचे अन्य विकार
पचनासंबंधी तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यावर उपचाराकरिता दिवसाला दहा नवीन रुग्णांची नोंद होते. अशी नोंद तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व विकारांना बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ्य, आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानशा तक्रारीदेखील भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत.
जंक फूडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, बैठे काम अशा प्रकारच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस पोटासंबंधी तक्रारींमध्ये वाढ होतच असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षामध्ये पोटाच्या विकारांमध्ये झालेली वाढ पाहता तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. पचन क्रिया चांगली नसेल, तर बद्धकोष्ठता, आतडय़ातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (ऍसिडिटी) असे आजार होऊ शकतात.
पोटाच्या आजाराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येते.
यामध्ये ते वयोगटामधील रुग्णांचा समावेश अधिक असून बदललेली जीवनशैली तसेच चहा, कॉफी, मद्यपानाच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचे डाएट, मानसिक ताणाव याचा थेट परिणाम पोटाच्या विकारांवरही होताना दिसून येतो. दिवसागणिक पचनासंबंधी तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता, रोजच्या जीवनशैलीत अचूक बदल करण्याने हे विकार नक्कीच टाळता येतील.
प्रौढांमध्येही मोठय़ा प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार पाहावयास मिळत आहेत. उतारवयातले एक कायमचे दुखणे म्हणजे अपचन, गॅसेस, पोटफुगी अशा असंख्य पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. वय झाले की, ज्याप्रमाणे सांध्यांची हालचाल मंदावते, त्याप्रमाणे पोटातील आतडय़ाची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून पुढे सरकणारे अन्न हळूहळू पुढे जात राहते, त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो, पोट जड होते व लोकांमध्ये बद्धकोष्ठता सुरू होते. मंदावलेल्या हालचालीमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवून खूप तास गेले, तरी पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.
जठराच्या किंवा ऍसिडिटीचा विचार करताना, एक गोष्ट आधोरेखित करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे एच. पायलोरी या जंतूचा जठर व लहान आतडय़ांना होणारा संसर्ग व त्यामुळे होणारी अल्सर व कॅन्सरची निर्मिती. एच. पायलोरी हा अंगावर एका प्रकारचे चिलखती आवरण असणारा जंतू अशुद्ध पाण्यातून आपल्या जठरात प्रवेश करतो आणि योग्य उपचार विशिष्ट कालावधीसाठी न घेतल्यास त्यातून अल्सर व कॅन्सरला आमंत्रण देतो.
बऱ्याच वेळा योग्य व वेळेत निदान न झाल्याने मोठमोठी ऑपरेशन्स आणि त्यांचा तणाव व खर्च यातून सुटका करून घेता येत नाही, असे आजार म्हणजे हे पोटाचे आजार. पोटाचे आजार ब-याच वेळा पेशंट आणि डॉक्टरांच्या उशिरा लक्षात येतात. त्यातही गैरसमजुती आणि निष्काळजीपणा यामुळे शास्त्रशुद्ध आणि नेमके उपचार मिळायला विलंब होत जातो आणि त्यातून पुढे कॉम्प्लिकेशन होतात, असे दिसून येते.
लक्षणे
बद्धकोष्ठता
छातीत जळजळणे किंवा दुखणे
उदराचा फुगवटा आणि वात येणे (ब्लोटिंग)
उलटी येणे
प्रकार
पित्त (ऍसिडिटी)
आतडय़ातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)
पित्ताचा खडा (गॅल स्टोन्स)
वारंवार बद्धकोष्ठता (ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन सिंड्रोम)
वारंवार शौचालयात जाणे
बराचवेळ कुंथणे
अपूर्ण मलविसर्जन
गुद किंवा इंद्रियांवर दाब टाकावे लागणे
मलविसर्जनाला गती देणा-या रेचक औषधांचा वापर करावा लागणे
मद्यसेवनाने बिघडते यकृत
नियमित मद्यसेवनाच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरीत परिणाम होत आहे. मद्यसेवनाचे व्यसन हा आजार हा मधुमेहाप्रमाणेच जन्मभराचा असतो, तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर फक्त आणि फक्त बरबादीच करतो. नियमित दारूच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरीत परिणाम होत आहे.
यकृत हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो खनिजं, जीवनसत्त्वं साठवून ठेवतो आणि शरीरातील 50 टक्के चांगल्या कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो. यकृतामध्ये पित्त या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होतं परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे नवी मुंबईत यकृताच्या आजारांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.
कामाचा ताण, अवेळी खाणे पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नियमित दारूचे व्यसन या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वाढत जाणारा लठ्ठपणा. लठ्ठपणा वाढल्याने शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. यकृतातील मेदाचेही प्रमाण वाढल्याने कार्यक्षमता कमी होऊन ते कठीण होत जाते म्हणजेच त्याचे कार्य थांबते. आजमितीला भारतामध्ये 100 पैकी 15 ते 20 जणांना यकृतातील मेद वाढीचा आजार जडलेला आहे. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो पण, निदान झाले नसल्यामुळे याची जाणीव अनेकांना नसते. भरपूर दारू पिणाऱ्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशांना अल्कोहोलिक हेपॅटिटिस, मेदयुक्त यकृत आणि अल्कोहोलिक सिरॉसिस (यकृत काठीण्य) हे आजार जडू शकतात.
सध्याची कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र असून आधुनिक मम्मी डॅडीना मुलांना वेळ देता येत नाही. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे कुटुंबांचा धाक असणं हा प्रकार आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजच्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे फार अवघड आहे. वाईन शॉपच्या बाहेर असणारी आजच्या युवा वर्गाची गर्दी पाहता भविष्यात भारतामध्ये यकृताच्या आजारांमध्ये नक्की वाढ होणार असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यकृताचा कर्करोग आणि सायरोसिसमुळे भारतामध्ये तब्बल तीन लाखावर व्यक्ती दगावतात. तर दरवर्षी दोन लाख यकृताने आजारी व्यक्तींना अखेरच्या क्षणी निदान होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मृत्यूच्या कारणांमध्ये यकृताचा आजार हे तिसरे कारण ठरत आहे.
-डॉ. रॉय पाटणकर