पुणे – फुगासन हे दंडस्थितीतील आसन आहे. प्रथम दोन्ही पायात अंतर घेऊन उभे रहावे. नंतर नाकाने भरपूर श्वास घ्यावा. तोंडाचा चंबू करावा. आतील हवा घोळवावी आणि फुगा फुगवतो त्याप्रमाणे दोन्ही गाल चांगले फुगवावेत. बाह्य कुंभक करावेत. दृष्टी हे करत असताना नासाग्रावर केंद्रीत करावी.
या स्थितीत आपोआप बाह्या कुंभक होते. कोणी कोणी श्वास घेताना फुगा फुगवल्यासारखी कृती करताना दोन्ही हाताचे पंजे एकमेकांपासून विलग करत लांब लांब नेत एकीकडे तोंडाने फुगा फुगवण्याची कृती करतात.
यास्थितीत जमेल तेवढावेळ स्थिर रहावे. मग परत दोन्ही हाताचे पंजे जे लांब नेलेले आहेत ते जवळ जवळ आणत हातांची टाळी वाजवत तोंडाचा फुगा अलगद सोडावा. दीर्घ श्वास घेऊन श्वास किंचित कोंडल्यामुळे गाल फुगवल्यामुळे थायरॉईड ग्रंथीवर दाब येतो.
व त्यांचे कार्य सुधारते. दोन्ही हात एकमेकांपासून दूर नेत फुगा फुगल्याचे दाखवताना आपोआप हातांनाही व्यायाम होतो. टाळी वाजवल्यामुळे ऍक्युप्रेशर पॉंईटस् दाबले जातात. फुगासनात ज्या वेळी आपण दोन्ही हात एकमेकांवर जोरात आपटून तोंडाचा फुगवलेला चंबू सोडतो. त्यावेळी तोंडाने हाऽ हाऽ असा आवाज करावा. त्यामुळे आपोआप ताण जातात व निरागस आनंद मिळतो.
या आसनात दीर्घ श्वसन होते कुंभक होते व फुगा फोडताना गार हवा तोंडावाटे आत गेल्यामुळे शितलीपण होते. असे अनेक फायदे या फुगासनाचे आहेत. या आसनाचा परिणाम चांगला होतो. ताणतणाव जातात. ज्या ज्या वेळी आपण निराश असतो विशेषतः मुले जेव्हा टेन्शनखाली असतात, रडतात, चिडतात, भांडतात अशावेळी आई-वडिलांनी त्यांच्याकडून फुगासन करून घ्यावे म्हणजे मुलांना निर्मळ आनंद मिळतो त्यांचा ताणतणाव जातो.
व हे आसन करायला सोपे असल्यामुळे मुलांना आवडते तसेच ज्येष्ठांनाही बाल्यावस्थेचा आनंद मिळतो. ताणतणाव दूर होतात. हवा तोंडात घोळावल्यामुळे लाळग्रंथींना त्यांचे कार्य करण्याचा चालना मिळते व त्या चांगल्याप्रकारे स्त्रवून अन्नाच्या तुकड्यामध्ये चांगल्याप्रकारे मिसळतात म्हणजेच पचनाच्या तक्रारी हे असान दूर करते. चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो, गाल फुगवल्यामुळे ओघळणारी, लोंबकळणाऱ्या त्वचेलाही व्यायाम मिळतो व ती उत्तम प्रकारे टॅनिंग झाल्यामुळे घट्ट होते. असे फुगासनाचे अनेक फायदे मिळतात.