आमचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर आहे. दोन टेरेसवाला. एक टेरेस मागच्या बाजूला आणि एक पुढच्या बाजूला. दोन्ही अगदी प्रशस्त आहेत आणि समोर मोठ्या इमारती नाहीत, त्यामुळे अगदी दूरवरचे चांगले दिसते, दोन्ही टेरेसवरून. मागील बाजूने तर खडकवासल्याचे धरणही दिसते. त्या बाजूने सदैव गार वारा वाहत असतो. फार पूर्वी, म्हणजे दोन दशकांपूर्वी आम्ही पहिल्या मजल्यावरील छोट्या फ्लॅटमध्ये राहत होतो, बिना टेरेसच्या. त्यामुळे सुरुवातीला या साऱ्या गोष्टींचे मोठे कौतुक वाटायचे. मात्र काही दिवसांत नव्याच्या नऊ दिवसांचे कौतुक संपले. आता कोणी नवीन आमच्याकडे आले तरच मागील टेरेसवर जाऊन धरण दाखवले जाते, आणि तो गार वारा अंगावर घ्यावासा वाटतो. पाचव्या मजल्यावरून खाली पाहिले तर माणसे इवलिशी दिसतात, ओळखताही येत नाहीत. खाली उभ्या असलेल्या गाड्या खेळण्यातल्या गाड्यांसारख्या दिसतात. लिफ्ट असल्याने खाली-वर जाण्यायेण्याचे काही वाटत नाही. पण लिफ्ट बंद असली की मात्र ब्रह्मांड आठवते. एरवी दिवसातून दहा वेळा वरखाली करणाऱ्या मला लिफ्ट बंद असली की खाली जायचे नुसते नाव काढले तरी पायात गोळे येतात. गेल्या अनेक वर्षांत जीवन अगदी चाकोरीबद्ध झालेले आहे.
खरं तर मी तशी मोठी उत्साही. अगदी लहानपणापासून. त्यामुळेच घरात लाडकी. आता मात्र लहानपणचे ते लाडाकोडातले दिवस आठवले की मन खंतावते. पुन्हा ते फुलपाखरी दिवस परत यावेत असे वाटते. साऱ्या भावंडांनी एकत्र यावे. हसून खेळून आनंदात दिवस घालवावेत असे वाटते. पण ते आता अशक्य नसले, तरी असंभव आहे याची मनोमन खात्री झाली आहे. आपण बदललो नाही, तरी जग बदलायचे राहत नाही. अगदी रक्ताची-पाठीवर पाय देऊन आलेली भावंडेही बदलतात. कोरडी व्यवहारी होतात. वेळ, पैसा, श्रम आणि माया सर्वांचाच काटेकोर हिशोब ठेवतात.
हे सारे पटते, तरीही वाटते, काही चमत्कार व्हावा आणि ते जुने दिवस काही क्षणांपुरते तरी परत यावेत. पण आता चमत्काराचे दिवस संपले आहेत. आता चमत्कारिक दिवस आले आहेत. ओझे वाहावे तसे दिवस आपल्याला ओढत नेत असतात. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे जात आहेत. बघता बघता बालिश बालपण सरले, उत्साही तारुण्यही मागे पडले आता उतारवयाकडे वाटचाल चालू झाली आहे.
उगाचच गदिमांच्या त्या ओळी आठवतात-
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे…
काल पहाटे मला जरा लवकरच जाग आली. सकाळी उठल्यानंतर चहापाणी, आवराआवर, स्नान, कपड्यांना इस्त्री, मंदिरात जाऊन येणे, कधी तरी कामासाठी बाहेर पडणे. स्वत:च्या वाहनाने गेले तर इंच इंच लढवत गर्दीतून वाट काढत जायचे, किंवा बसने गेले तर गर्दीत धक्केबुक्के खात लोंबकळत, प्रसंगी एका पायावर उभे राहून थकून-भागून जायचे. येतानाही तीच परिस्थिती.
फिरायला बागेत वगैरे जायचे म्हटले तर तेथेही गर्दी असतेच. हल्ली माणसाला इकडे तिकडे पाहायला फुरसत नसते, आणि असते तेव्हा बहुदा स्मार्टफोनमध्ये डोके खुपसलेले असते. पण काल पहाटे लवकर जाग आली, तर वेगळेच वाटले. म्हटले आज सारे रुटीन टाकून द्यायचे. जाऊन टेरेसमध्ये उभी राहिले. शांत चित्ताने! दूरवर अंधूक दिसणाऱ्या धरणाकडे पाहिले. अगदी डोळे भरून पाहिले. लहानपणी समुद्रावर गेल्यानंतर समुद्राकडे पाहायची, त्याच भावनेने पाहिले.
दोघातला फरक आज प्रकर्षाने जाणवला. कितीही म्हटले तरी हे साठवलेले पाणी. सागराच्या पाण्याची गाज, त्या लाटा, भरती आणि ओहटी त्याला कोठून असणार. समुद्र पाहिलाच नसता तर याचेही कौतुक वाटले असते. पण वर्षानुवर्षे समुद्र अगदी पोटभर पाहिला. त्या पाण्यात खेळले, लाटांबरोबर पायाखालची वाळू सरकताना होणाऱ्या गुदगुल्या अनुभवल्या. शंखशिंपले, कवड्या, समुद्रफेस गोळा केले. आता त्या शंखशिंपल्यांच्या आठवणीच राहिल्या आहेत.
मला माझ्या भावाची आठवण झाली. तो आठव्या मजल्यावर राहतो, त्याच्या गॅलरीत उभे राहिले, तर खालचे नीट दिसतही नाही माणसे सोडा, गाड्याही नीट दिसत नाहीत आणि चौदाव्या मजल्यावर राहणाऱ्या भाच्याच्या गॅलरीतून तर खाली पाहिले तर भोवळ आल्यासारखे होते. मनात विचार आला, आता म्हणे तीस-चाळीस मजली टॉवर बांधतात, त्यावरून पाहिले तर खालची माणसे किडेमुंग्यांसारखी दिसत असतील. खरं तर माणसाने माणसाच्या पातळीवरून परस्परांकडे पाहावे किंवा थोड्या उंचीवरून. फार उंचीमुळे दुरावा येतो, परकेपणा येतो.
काल पहाटे टेरेसवरून खाली पाहताना वाटले, मी काय, भावंडे काय, इतक्या उंच उंच इमारतीत राहतो. फ्लॅटच्या चार भिंतीत बंदिस्त असतो. लहानपणचे ते कौलारू घर परत मिळेल का? सर्वांचे पाय पुन्हा जमिनीला लागतील का? पाय म्हणजे या देहाचे पाय नव्हेत, मनाचे. मनाने सारी भावंडे पुन्हा जमिनीवर येतील का आणि परस्परांना भेटतील का?
हे पाचव्या, आठव्या, चौदाव्या मजल्यावरचे जीवन काही खरे नाही. त्याने जमिनीशी असलेली नाळच तुटते. आपलेही परके होतात आणि ही खंत बोलूनही दाखवता येत नाही. कोणत्याही गोष्टीची “थोडक्यात गोडी’ म्हणतात, उंचीचेही तसेच आहे. थोड्या उंचीवरूनच बरे… माणसात राहिल्यासारखे होते. फार उंच गेले की माणसेच नाही, तर माणुसकीही दुरावते.