सध्या मुला-मुलींना खूप स्वातंत्र्य ( Freedom of youth ) दिले जाते. तारुण्य हे उपभोग्यासाठी असते, असे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे दारू, सिगारेटसारखी व्यसने मुलींमध्येही वाढताना दिसत आहेत. पण, स्वातंत्र्य ( Freedom of youth ) म्हणजे काय आणि स्वैराचार म्हणजे काय ( Freedom of youth or arbitrariness ) याची सीमारेषा ओळण्याची गरज आहे. कारण, स्वैराचार हा क्षणिक आनंददायी वाटत असला तरी आयुष्य बरबाद करू शकतो. त्यापासून वेळेतच सावध झाले पाहिजे असे वाटते. (लेखात आलेली नावे बदलून लिहीलेली आहेत.)
माझ्याकडे आली ती माझ्या ओळखीतल्या व्यक्तीकडून. बाहेर गावाहून शमा पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिची तब्येत बिघडली म्हणून माझ्या स्नेह्यांनी तिला माझ्याकडे पाठवलं. ती येण्यापूर्वी स्नेह्यांनी मला तिची थोडी माहिती दिली. एकंदर शमाची लक्षणे चांगली नाहीत. वागणे दिवसेंदिवस खूप स्वैर होत चालले आहे, असा त्यांचा एकंदर सूर होता.
शमा सुरुवातीला आली तेव्हा तपासून काही गोळ्या दिल्या. नंतर ती वेगवेगळ्या कारणांनी दवाखान्यात येत राहिली. कधी झोप नीट येत नाही, कधी डोकं दुखतंय वगैरे वगैरे. शमाशी हळूहळू बोलण वाढलं. संवाद वाढला. मग, लक्षात येत गेलं शमाचे दारू-सिगारेटचे व्यसन वाढत चाललं आहे. पुण्यात एकटीच राहात असल्याने कुणाचा धाक नव्हता.
मित्रांबरोबर कधीही बाहेर भटकत राहणं, वाट्टेल तसं खाणं-पिणं, असं बेबंद आयुष्य चाललं होतं. तिची परिस्थिती पाहून मी तिच्या वडिलांना भेटायला बोलावले. पहिल्यांदा त्यांच्याशी बोलणे गरजेचे होते. ते आल्यावर त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, “”डॉक्टर, जाऊ द्या ना, हेच तर वय आहे, एन्जॉय करायचं!” वडिलांच्या या प्रतिक्रियेनंतर मीच चाट पडलो.
मुला-मुलींना स्वातंत्र्य ( Freedom of youth ) जरूर द्यावे, पण आरोग्यच हाताबाहेर जात असेल तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग?
त्यानंतर जवळजवळ वर्षाने ती मुलगी पुन्हा माझ्याकडे आली. तिचे वडीलच घेऊन आले. मी तिच्याशी बोलावे, अशी फारच गळ त्यांनी घातली. आता तिचे व्यसन हाताबाहेर गेले होते. दरम्यानच्या काळात तिने एका मुलाशी लग्न केले, पण सहा महिन्यांतच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. ती मुलगी पूर्ण हताश झाली होती. तिला आयुष्य खूप निराशाजनक वाटत होते. त्यामुळे दारू-सिगारेटच्या जणू आहारी गेली होती.
मी मुलीशी बोलू लागलो. सुरुवातीला ती कोणाचेच काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती, पण हळूहळू संवाद वाढला. तो मुलगा तुझ्या आयुष्यातून गेला आहे. त्याला तुझी काळजी नाही. तो तुला विचारत नाही. त्याच्यापायी स्वतःचे आयुष्य का बरबाद करते, असे तिला विचारलं.
हळूहळू तिला विचार पटू लागले. तिने तिचे मन कशात तरी रमवणे गरजेचे होते. तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला. तिने तो ऐकला. आता तिच्यात खूप सुधारणा आहे. व्यसनातून बाहेर आली आहे. स्वभावात काही गोष्टी मात्र राहून गेल्या. दुसऱ्याला उद्धटपणे बोलणे, आततायीपणा करणे या गोष्टी अजून तरी कमी झाल्या नाहीत, पण हळूहळू त्याही कमी होतील, असे तिच्या सध्याच्या प्रगतीवरून वाटते.
राजश्री माझ्याकडे आली ती तिच्या आईबरोबर. राजश्री सिगारेट पिते आणि त्याचे प्रमाण खूप आहे, असे आईने तिच्यासमोरच मला सांगितले. राजश्रीचा स्वभाव भयंकर हट्टी. आपण म्हणतो तेच खरं करायची सवय. त्यामुळे घरात कधीही येणार, कधीही बाहेर जाणार. घरातल्या कोणत्याच कामाला हात लावणे नाही. कोणत्याच गोष्टीत शिस्त नाही. त्यामुळे आई-वडील वैतागले होते आणि राजश्रीचा आई-वडिलांवर विश्वास नव्हता. त्यामुळे ती त्यांना वैतागली होती. राजश्री एका मुलाच्या प्रेमात पडली होती. दोन वर्षे होऊनही मुलगा लग्नाचा विषय काढत नव्हता. आणि ती तर हट्टाला पेटली होती, याच मुलाशी लग्न करेन. दरम्यान, काही चांगली स्थळे तिला येत होती, पण तिच्या नकाराने जात होती. त्यामुळे आई-वडील वैतागले होते. तिच्यापुढे काय करावे हे त्यांना कळत नव्हते. त्यातून दोघांना मानसिक तणाव वाढून आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या. रक्तदाब वाढणे, डोकं दुखणे, चीडचीड वाढणे अशा तक्रारी पालकांमध्ये दिसू लागल्या.
राजश्रीशी मी पहिल्यांदा बोललो तेव्हा, ती त्या मुलाशीच लग्न करणार या निर्णयावर ठाम होती. मुलगा सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला होता आणि परत यायचे नाव घेत नव्हता. पण, ती त्याच्यासाठी थांबायला तयार होती. अधिक चौकशी केल्यावर तिने सांगितले, मुलाच्या घरातून लग्नाला विरोध आहे. मी मुलाशी बोलण्याचा निर्णय घेतला. त्याला फोन केल्यावर तोही आडपडदा न ठेवता बोलला. त्याला या मुलीशी लग्न करायचे नव्हते. ग्रुपमध्ये असताना मैत्री झाली आणि काही काळ प्रेमही वाटले हे तो स्वीकारत होता, पण तिचे विचार,
तिचे वागणे त्याला पटत नव्हते आणि त्याने हे तिला पहिल्यापासून सांगितले होते. पण, ती त्याचेही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. त्यामुळे वेळ वाया जाऊन, तिचे लग्नाचे वय पुढे जात होते. आधी तिच्या या गोष्टी लक्षात येत नव्हत्या, पण तिला अनेक वेळा सांगितल्यावर सत्य परिस्थिती लक्षात आली. मुलगा भारतात परत येणार नाही आणि आला तरी आपल्याशी लग्न करणार नाही, हे तिने स्वीकारण्यास सुरुवात केली. तिने त्याच्याशी संपर्क तोडला. काही दिवसातच ती त्याला विसरू लागली. आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता, हे तिच्या लक्षात आले. हट्टाने, आततायीपणाने आपण चुकीचा निर्णय घेत होतो, हे वेळीच लक्षात आल्याने ती वेळीच सावरली. शमा, राजश्री या केवळ दोन मुली नाहीत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली आहे, हे दिसते. त्यामुळे स्वातंत्र्य ( Freedom of youth म्हणजे काय, स्वैराचार म्हणजे काय ( Freedom of youth or arbitrariness ) आपली जबाबदारी काय याची जाणीव नव्या पिढीला करून देण्याची गरज आहे.