समाजामध्ये सर्वत्र दिसणारा आजार म्हणजे लठ्ठपणा / ओबेसिटी होय. याला आजार म्हणून पण मान्यता मिळाली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लठ्ठपणाचे प्रमाण जगात सर्वत्र मोठया वेगाने वाढत आहे. समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे गरिबांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण खूप जास्त आहे. अगदी साथीच्या रोगाप्रमाणे लठ्ठपणा समाजात पसरत चालला आहे. वैद्यकीय ज्ञानानुसार याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे. यालाच लाईफ स्टाईल डिसऑर्डर म्हणतात. यातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे आहार, व्यायाम, ताण तणाव, झोप हे आहेत. इतर काही कारणे आहेत पण ती अतिशय क्वचित असतात.
डॉ. चंद्रकांत कणसे
लठ्ठपणामुळे विविध शारिरीक आणि मानसिक आजार होतात. खरेतर लठ्ठपणा हे बऱ्याच आजारांचे मूळ कारण आहे. यामध्ये डायबेटीस, रक्तदाब, संधिवात, ऍसिडिटी, नैराश्य, हृदयविकार, कॅन्सर, स्मृतिभ्रंश – अल्झायमर्स, झोपेचे आजार, पाळीचे आजार – वंध्यत्व, नपुसंकत्व, त्वचा समस्या आदी आजारांचा समावेश होतो.
यातील चांगली गोष्ट म्हणजे या लाईफ स्टाईल कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आपण सहज बदलू शकतो. म्हणजे हे सर्व प्रकारचे आपण योग्य लाईफ स्टाईलद्वारे रोखू शकतो, नियंत्रण ठेवू शकतो. या सर्व आजारांसाठी औषध उपयोग ही अत्यंत गौण बाब आहे.
फार थोड्या प्रमाणात औषध उपचार करण्याची गरज असते. बहुतेक लोक बिगर औषधाचेच निरोगी आयुष्य जगू शकतात. याहूनही महत्त्वाचे म्हणजे यासाठी खर्च अत्यल्प, तसेच औषधाचे दुष्परिणामदेखील नाहीत. दुर्दैवाने औषध नाही म्हणून लोकांना याची किंमत नाही आणि डॉक्टर लोक लक्ष द्यायला तयार नाहीत.
बऱ्याचदा लठ्ठपणा हा दखलपात्र मोठा आजार आहे हेच आम्हाला मान्य नसते.
चालतंय, पाहू नंतर…
आज तर काही त्रास होत नाही ना…
थोडासाच त्रास होतोय…
मी कमीच खातोय…
एवढ्याने काय होतंय?
एक ना अनेक कारण, समजुती अज्ञान, दुर्लक्ष, बेफिकीरी इत्यादी सतत वाढतच रहाते.
जे लोक लक्ष देतात ती शॉर्टकट्स शोधतात आणि अलगदपणे फसवणुकीला बळी पडतात. साधारणपणे “मी सर्व काही केले; तरी माझे वजन कमी होत नाही; त्यामुळे मी असे असे केले’ – असा एक अत्यंत चुकीचा युक्तिवाद असतो. मग त्यामध्ये मध, औषध, पावडर, तेल, गोळ्या, रस, काढा, मलम, जडीबुटी, विशिष्ट औषध, ही पॅथी ती पॅथी अगदी मंत्र, गंडा दोरा, विविध पट्टे, काही यंत्रे. अशा तऱ्हेच्या अनेक उपचारासाठी फार मोठया प्रमाणात खर्च करणारे नागरिक तुम्हाला पावलो-पावली सापडतील.
या सर्वांचा शेवट हा खात्रीपूर्वक अपयश आणि निराशाजनकच असतो. खरे तर वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम सोडून दुसरा कुठलाही पर्याय योग्य नाही. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे योग्य. ज्या तज्ञ माणसाकडे तुम्ही जाल, त्याने तुम्हाला या बाबतीत योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
त्या ऐवजी त्याने जर तुम्हाला इतर काही पावडर, गोळ्या, औषधे, मलम, काढे, जडीबुटी, यंत्र असे काहीही जरी सांगितले तरी ते अशास्त्रीय आहे याची खूणगाठ बांधावी. या इतर उपचारांचा कोणालाही कधीही दीर्घकाळ फायदा होत नाही. यातील बहुतांश उपचार खात्रीने अयशस्वी असतात. यामध्ये काही तरी विकून पैसे कमविणे एवढाच हेतू असतो. अशा प्रकारच्या उपचारापासून दूर राहिले पाहिजे. नाहीतर मोठी फसवणूक होऊ शकते आणि पदरी घोर निराशा येते.
जे कोणी रूग्ण अशा प्रकारचे उपचार घेत असतील त्यांनी ते लवकरात लवकर थांबवावेत आणि आहाराचे योग्य प्रकारे नियोजन करावे. वजन कमी करणे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे.फक्त योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने उपचार आवश्यक आहेत.
यासाठी मग माणूस अनायासे पर्याय शोधत राहतो. खरे तर तो शॉर्टकट्स शोधत असतो. मग त्याच्या पुढे एक पर्याय राहतो तो म्हणजे ऑपरेशन ?
बॅरिऍट्रीक सर्जरी
बॅरिऍट्रीक सर्जरी म्हणजे काय ?
वजन कमी करण्यासाठी जे ऑपरेशन केले जाते, त्याला वैद्यकीय भाषेत बॅरिऍट्रीक सर्जरी म्हणतात.
बॅरिऍट्रीक सर्जरीत काय ऑपरेशन करतात?
साधारणपणे याचे दोन प्रकार आहेत 1 – जठराचा आकार लहान करणे साधारणपणे जठराचा 85 ते 90% भाग कापून काढला जातो किंवा त्याला बॅंड बांधला जातो. त्यामुळे साधारणपणे 1500 ते 2000 ग्रॅम्स साठवून ठेवण्याची जठराची क्षमता 100-150 ग्रॅम होते त्यामुळे माणूस 80-90 % कमी खातो. त्यामुळे वजन कमी होते.
2- आतड्यात बायपास- लहान आतड्याचा भाग जठराला जोडला जातो. त्यामुळे पाचक रस आणि आतड्याचा बराचसा भाग पाचन प्रक्रियेत सहभागी होत नाही.
बऱ्याचदा वरील दोन्ही ऑपरेशन एकत्र केली जातात.
बॅरिऍट्रीक सर्जरीचे फायदे कोणते ?
ह्या सर्जरीमुळे बहुतेक सर्व लोकांचे सुरवातीला वजन नक्की वेगाने कमी होते. त्यामुळे वजनामुळे होणारे सर्व त्रास लगेचच कमी होतात आणि रुग्णाला बरे वाटते.
बॅरिऍट्रीक सर्जरीचे तोटे कोणते ?
1) सर्जरीसाठी येणारा मोठा खर्च.
2) इतर कोणत्याही सर्जरीचे आणि भूल देण्यात असणारे तोटे / धोके या सर्जरीमधे देखील असतातच. उदा. इन्फेक्शन, लिकेज, आदी.
3) सर्जरीनंतर आयुष्यभर घ्यावी लागणारी औषधे आणि त्यासाठी आवश्यक खर्च.
4) सर्जरीनंतर सांगितलेली जीवनशैली जर अंमलात आणली नाही तर 5 ते 10 वर्षात पुन्हा सर्जरी करावी लागू शकते.
सर्जरी हा तात्पुरता/ अंशतः उपचार आहे आणि त्यानंतर योग्य प्रकारे आहार आणि व्यायाम अत्यंत आवश्यक असतो.
थोडक्यात ज्या गोष्टी नकोत म्हणून तुम्ही सर्जरी करता त्यापासून सुटका नाही. योग्य प्रकारे आहार आणि व्यायाम केले तरच सर्जरी यशस्वी होऊ शकते.
खरे तर योग्य आहार, व्यायाम, झोप यांचे नियोजन केल्यास 99% लोकांना सर्जरीची गरजच पडणार नाही, हे नक्की. आणि याचे योग्य पालन नाही केले तर सर्जरी अयशस्वी होणार, हेही तितकेच खरे.
जरा चौकशी केली तर आपल्या आजूबाजूला काही रुग्ण नक्की भेटतील की ज्यांना बॅरिऍट्रीक सर्जरी करून काहीही फायदा झाला नाही. काही वर्षांत त्यांचे वजन पुन्हा पूर्वपदावर असेल. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी सर्जरीनंतरही आपली जीवनशैली बदलली नाही, हे असते.
ज्या कोणाला सर्जरी सांगितली आहे किंवा सर्जरी करावी असा विचार करत आहेत त्या सर्वांनी कमीतकमी 1 वर्ष तरी जीवन शैली योग्य प्रकारे बदलावी म्हणजे त्यांना सर्जरीची गरजच पडणार नाही आणि त्याची पुढील त्रास आणि खर्च या पासून आयुष्य भरासाठी सुटका होईल. बॅरिऍट्रीक सर्जरीनंतर जी गोष्ट आयुष्यभर करायचीच आहे ती अगोदरच का करायची नाही? आणि मग सर्जरी तरी कशाला?