जानुस्पर्शासन हे दंडस्थितीतील एक आसन आहे. प्रथम दंडस्थिती घ्यावी आणि सरळ उभे राहावे. मग एका पायावर उभे राहून दुसरा पाय जमिनीला समांतर न्यावा. श्वास सोडत डोके जास्तीत जास्त या उभ्या केलेल्या पायाच्या गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. जर डोके गुडघ्याला लागले तर तुमचे शरीर लवचिक आहे असे समजावे हा लवचिकपणा सरावाने येतो.
डोके गुडघ्याला लावण्याच्या स्थितीत श्वास रोखावा. दोन्ही हातांनी जमिनीला समांतर असलेल्या पायाचे पाऊल पकडावे, नाकाने गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी कुंभक करावे. या आसनाचे अनेक फायदे आहेत.
या आसनामुळे शरीराची चरबी कमी होते. अन्नपचन सुलभ होण्यास मदत होते. यामध्ये हृदयाला एक प्रकारचा व्यायाम होत असल्याने श्वसन कार्य सुधारते.
दमा असलेल्या व्यक्तींनी हे आसन जरूर करावे, त्याचा त्रास कमी होण्यास निश्चितच फायदा होतो. या आसनात प्राणायामाचा चांगला अभ्यास होऊ शकतो. तरी हे आसन नियमित करावे. या आसनाने गुडघेदुखी थांबण्यासही मदत होते तसेच पोटऱ्यांनाही व्यायाम मिळतो. हे आसन नियमित केल्यास कंबर लवचिक होते.
आसनस्थितीत कंबरेला ताण बसल्यामुळे कंबरदुखीही थांबते. एकदा डाव्या पायाने, एकदा उजव्या पायाने असे दोन्ही पायांनी जानुनासिकास्पर्शासन करता येते. एकाच आसनाव्दारे अनेक फायदे होत असल्याने हे आसन जरूर करावे.