जवळ जवळ 80 टक्के रोग पचनसंस्थेत विकृती झाल्यामुळे होतात. गरोदर स्त्रीची पचनसंस्था का बिघडते? तर ती स्त्री अन्न नीट न चावून खाता बऱ्याचदा घाईघाईने जेवते, जेवताना वरचेवर सतत पाणी पिते. तसेच जर गरोदर स्त्रीच्या दातांना कीड पडलेली असेल किंवा दात काढलेले असतील तर तिने सेवन केलेल्या अन्नाची चर्वण क्रिया नीट न झाल्यामुळे पचनसंस्था वरचेवर बिघडण्याची तक्रार अनेक गरोदर स्त्रियांमध्ये आढळते. अन्न नीट न चावले गेल्यामुळे ऍसिडीटी व वाताचा त्रास सुरू होतो.
त्रिदोषाचा असमतोल झाल्यामूळे हा वात शरीरभर त्रास देतो.त्यामुळे डोकेदुखी, स्पॉंडिलायटीस, सांधेदुखी, निद्रानाश, स्नायूंच्या चमका अशा तक्रारी सुरू होतात. रक्तातील शुगर, कोलेस्ट्रोल, ट्रायग्लिसराईड वाढणे यासारख्या समस्या उत्पन्न होतात. फोफशेपणा वाढून गरोदर स्त्रीचे एकदम अचानक वजन वाढू लागते. ते कुठल्याही व्यायामाने वा डाएटने आटोक्यात येत नाही व एकीकडे गरोदर स्त्रीचा अशक्तपणाही वाढू लागतो व म्हणूनच सर्वात महत्त्वाची कला किंवा प्रत्येक गरोदर स्त्रीने लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सर्व अन्न पदार्थ नीट चावून खावेत.
जेवणाची एक ठराविक वेळ ठेवावी. साधारणपणे सहाव्या महिन्यानंतर एकाच वेळी पोटभर न जेवता दिवसातून थोडे थोडे असे चार वेळा खावे. रात्रीचे जेवण हलके व लवकर घ्यावे. प्रत्येक गरोदर स्त्रीने आपल्या जेवणात साजूक तूप निदान एक चमचा तरी खावेच खावे. लोणची तसेच अति तिखट व चमचमीत तामसी आहार खाऊ नये. गरोदर स्त्रीने हिरव्या मिश्र भाज्यांचे सूप रोज घ्यावे .तर्पण क्रियेमध्ये पाणी ही पचवावे लागते हे प्रत्येक गरोदर स्त्रीने लक्षात घ्यायला हवे.
प्रत्येक घोटात लाळ मिसळून हे पाणी पोटात जायला हवे. आपल्या नैसर्गिक तपमानाचे ग्लासभर पाणी पचवायलाही शरीराला काही तास लागतात. मग थंडगार व घटाघटा प्यायलेल्या पाण्याने किती ताण पचनसंस्थेवर पडत असेल?दातांचे, लाळेचे, हिरड्यांचे आरोग्य नीट राहण्यासाठी जबड्यांचे व्यायाम करावेत. जबडा पूर्ण उघडून बंद करावा व असे 30-35 वेळा करावे. मग तोंडात साठलेली लाळ जिभेने सर्वत्र फिरवून 2-3 घोटात गिळून टाकावी.
विशेषतः सकाळी उठल्या उठल्या जी लाळ असते ती खूप गुणकारी असते असे चीनी योगात सांगितले आहे. वनौषधींच्या मंजनाने हिरड्यांना मसाज करावा.दात घासावेत. ओंजळभर कोमट पाण्याची चूळ तोंडात घ्यावी.ही चूळ तोंडात काही सेकंद ठेवावी. पाणी एवढेच तोंडात घ्यावे की ते इकडून तिकडे अजिबात हलणार नाही. मग या दाबाने हे वनौषधींचे पाणी दाताच्या सर्व फटी, छिद्रे, टॉन्सिल, घसा इथे जाऊन जंतूविरहित दात करते. डोळे व कानाची ट्यूब ह्यावरही दाब येतो. नंतर चूळीतील अर्धे पाणी फेकून द्यावे.
उरलेली गुळणी, मान वर करून घशाच्या मागच्या भागात न्यावी व नंतर फेकून द्यावी. हे केल्यावर घशाच्या मागील बाजूस एक चिकटा असतो तो सुटून येतो. असे रोजच्या रोज करावे. जर हा चिकटा निघाला तर घशाचे, श्वासाचे, पोटाचे विकारच होत नाहीत. दात घासताना खॅक् खॅक् करून हा चिकटा काढायची पूर्वापार पद्धत आहे. बाहेरून आलेले जंतू, धूळ, विष हा चिकटाच थोपवित असतो.नखे खाण्याची सवय अतिशय वाईट आहे. यामुळे वरचेवर जंत होतात व ऍनिमिया होतो. शिवाय पोटात इन्फेक्शन होवून लिव्हर कमकुवत होतो.
सक्षम निरोगी श्वासोच्छ्वास
सक्षम श्वसनसंस्थेसाठी प्राणायामाविषयी माहिती प्रत्येक गर्भवतीने करवून घेणे आवश्यक आहे. तज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम किंवा सुक्ष्म व्यायाम करावा.या सुक्ष्म व्यायाम प्रकारात मुख्यत्वे संथ श्वसन,अनुलोम विलोम या श्वसनक्रियेची पूर्वतयारी करावी.मग प्रत्यक्ष अनुलोम विलोम करावे.वरवरची कपालभाती करावी मग भाम्ररी प्राणायाम करावा. यात कर्ण भ्रमरी करावी. मग ओंकार जप करावा.साधारणपणे प्रत्येक गर्भवती स्त्रीने 20ते 25मिनिटे सुक्ष्म व्यायाम म्हणजेच प्राणायामाचे वरील प्रकार तज्ञ योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
संथ श्वसन म्हणजे सावकाश दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यावा व सावकाश सोडावा.असे रोज पाच मिनिटे करावे.नंतर फक्त एकाच नाकपुडीने सावकाश श्वास घ्यावा आणि सावकाश श्वास सोडावा.अनुक्रमे डावी आणि उजवी नाकपुडी बंद करून ही अनुलोमन विलोमनाची पूर्वतयारी म्हणून पाच मिनिटे असा श्वास घ्यावा.यानंतर प्रत्यक्ष अनुलोम विलोमन क्रिया योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. जेवढा वेळ श्वास घ्यायला लागेल त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडायला लावावा.
अनुलोम विलोमन म्हणजेच नाडीशुद्धी प्राणायाम रोज पाच मिनिटे योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. कपालभाती हा प्राणायाम गरोदर स्त्रीने पहिले तीन महिनेच फक्त करावा. हा प्राणायाम करताना ओटीपोटाला हिसका देऊ नये. फक्त श्वास सोडत नाक शिंकरल्यासारखा आवाज काढत रेचक करावे. कपालभाती हा प्राणायाम गरोदर स्त्रीने ओटीपोटाला जोरात हिसका देऊन करू नये. वरवर पण तज्ञाच्या मार्गदर्शनानेच करावा.
मग भ्रामरी प्राणायाम करावा. दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास घेऊन घशातून भुंग्यासारखा आवाज काढत श्वास सोडावा.भ्रामरी अचूक होत असल्यास दातांमधून कंपने जाणवतात. हा भ्रामरी प्राणायाम रोज पाच मिनिटे करावा.मग कानात अंगठे घालून बाकीची बोटे म्हणजे अनामिकावमध्यमा डोळ्यावर, तर्जनी भुवयांवर आणि करांगुली हनुवटीच्या दिशेने ठेवावी आणि अकरा वेळा भ्रामरी करावी. यानंतर रोज कमीतकमी 21वेळा प्रणवजप करावा.
अशाप्रकारे दीर्घ श्वसन,अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी व कर्ण भ्रामरी प्राणायाम, व सर्वात शेवटी ओंकार जप करावा. अशाप्रकारे गरोदर स्त्रीने आपली श्वसनसंस्था सक्षम व निरोगी राखण्यासाठी रोज प्राणायाम करावा. मात्र योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर स्त्रीने प्राणायाम करावा. प्रत्येक उच्छवासागणिक मनात माझे शारीरिक ताणतणाव जात आहेत. अशी सकारात्मक कल्पना करावी. तसेच श्वास घेताना हा श्वास माझे बाळ निरोगी, आनंदी आणि हसरे करणारा बाळाला भरपूर प्राणवायू पुरविणारा आहे.
त्यामूळे माझी नैसर्गिकरित्या प्रसूती सुलभ होणार आहे. अशी सकारात्मक कल्पना करावी. कोणताही त्रास करून न घेता तसेच पोटाला धक्का किंवा दुखापत होऊ न देता काळजीपूर्वक प्राणायाम करून बाळाला जास्तीतजास्त ऑक्सीजन कसा पुरवता येईल याकडेच लक्ष द्यावे. प्रत्येक गरोदर स्त्रीने आपली व आपल्या होणाऱ्या बाळाची प्रकृती सांभाळावी.
योग्य रक्ताभिसरण होण्यासाठी विविध आसने व प्राणायामाने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारू लागते. तसेच गरोदर स्त्रीने रोज सकाळ संध्याकाळ एक तास मोकळ्या हवेत फिरायला जावे. नेहमी आनंदी रहावे. मनात सतविचार करावेत. रक्ताभिसरण सुधारावे म्हणून वेगवेगळी आसनांची माहिती योग तज्ञांकडून घेऊन ती नियमित त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
शरीरातील विषारी द्रव्यांचे उत्सर्जन योग्य वेळी
-गरोदर स्त्रीने नैसर्गिक आवेगांची लाज बाळगू नये. तर ते वेळच्यावेळी करावेत. म्हणजेच अशा अवस्थेत आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांचे उत्सर्जन घाम, मल, मूत्र, गॅसेस ह्यांचार माध्यमातून केले जाते. गरोदर स्त्रीने म्हणून आपल्या ह्या संवेदनांचा कंटाळा करू नये. नैसर्गिक आवेग दाबून धरू नयेत.
त्रिदोषांचे संतुलन
वनौषधींच्या नियमित सेवनाने शरीरातील सप्त धातू रस,रक्त, मांस, मेद, अस्थि, शुक्र,वीर्य सारेच पुष्ट होतात. वात,पित्त,कफ या त्रिदोषांचे संतुलन राखणे आवश्यक असते. प्रत्येक गरोदर स्त्रीने त्रिदोष संतूलन राखून आपल्या वैद्याच्या सल्ल्याने दिवसातून किती ग्लास पाणी प्यावे.हे ठरवून घ्यावे. मात्र कफ प्रकृतीने थोडे कमी पाणी प्यावे. प्रत्येक गरोदर स्त्रीने फ्रिजमधील थंड पाणी मुळीच पिऊ नये. गरोदरपणात फिल्टर पाण्यापेक्षा उकळलेले पाणी पिणे तिच्या प्रकृतीच्या आणि बाळाच्या तब्येतीच्या दृष्टीने सुरक्षित असते.
जेवणानंतर 2 तासांनी व इतर वेळी भरपूर पाणी प्यावे. कोल्ड्रींकने नुकसानच होण्याची शक्यता असते. म्हणून गरोदर स्त्रीने शीतपेये पिऊ नयेत. सर्दी झाली असे वाटल्यास तुळशीची पावडर नाकाने हुंगावी. तळपायाची आग होत असल्यास साजूक तुपाने व काशाच्या वाटीने रात्री झोपताना तळपाय चांगले चोळावेत. गरोदर स्त्रीला जर अंगात खूप उष्णता वाटल्यास नागरमोथा व जांभूळ बियांची पावडर प्रत्येकी अर्धा ते 1 चमचा समप्रमाणात घेऊन एका काचेच्या ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी व हे पाणी सकाळी किंवा दिवसभर थोडे थोडे गरोदर स्त्रीने पीत राहावे.
काही गरोदर स्त्रीयांना सुरूवातीला उलट्यांचा खूप त्रास होतो. अशावेळी पहिल्या तीन महिन्यांतील उलट्यांसाठी ज्येष्ठमध, सुंठ, आवळा समप्रमाणात मिश्रण एकत्रित करून रोज ते कोमट पाण्याबरोबर एक चमचा घ्यावे यामुळे उलट्या कमी होण्यास मदत होते. काहीवेळा गरोदर स्त्रीची उष्णतेने डोळ्यांची आग होते अशावेळी कपभर थंडगार पाण्यात एक थेंब लव्हेंडर तेल टाकून त्यात दोन रूमाल भिजवून पिळून त्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.त्यामूळे डोळे चुरचुरणे किंवा डोळ्यांची आग होणे थांबते.
प्रत्येक गरोदर स्त्रीने गरोदरपणाते त्रिफळा, सोनामुखी, कोरफड यासारख्या वनौषधी शक्यतो टाळाव्यात.किंवा वैद्याच्या सल्ल्याने त्या घेण्याचे प्रमाण ठरवावे. असे म्हणतात की गरोदर स्त्री ज्या पद्धतीने अन्न खाते त्याच पद्धतीने तिच्या बाळाचे मन होते. तसेच गरोदर स्त्री ज्या द्रव पदार्थांचे सेवन करते त्या पद्धतीने तिच्या बाळाची वाणी होते.
गरोदरपणात स्त्रीने जेवण, झोप, उत्सर्जन यांना महत्तम स्थान द्यावे. गरोदरपणात बाळाला केंद्रबिंदू मानावे. स्वतःचे आरोग्य उत्तम राखायला हवे व करिअरला या काळात दुय्यमस्थान द्यावे. हे अंतरंगातून जेव्हा उमगले जाते तेव्हा ते आपसूकच व्यवस्थित आचरणात आणले जाण्यासाठी योग्य ते प्रयत्न गरोदर स्त्रीकडून केले जातील..
पतीने पत्नीला बकअप् करावे
बाळ किती रडते. माझी रात्रभर झोप होत नाही. किती तो लोळागोळा ! मला नाही घेता येणारे, शी! बाळ माझे कपडे खराब करेल. अरे बाप रे ! माझ्याने हे मुळीच होणार नाही. तू व तुझी किंवा माझी आई बघून घ्या. वाटल्यास एखादी बाई लावा 24 तासांची. पण मला कटकट नको. आधीच मला ऑफीसात कामाचा खूप ताण आहे. त्यात बाळाची रडारड अन् कटकटीने मला झोप लागत नाही. असे म्हणणारे अनेक भारतीय पती आढळतात.
गरोदरपणात स्त्रीचे मन नाजूक झालेले असते. त्यामूळे नेहमीपेक्षा या बाळंत झालेल्या किंवा होऊ घातलेल्या मातेच्या भावना पटकन उत्तेजित होतात. पटकन चिडणे, लगेच रुसणे, खूप आनंदी होणे तर कधी खूप दुःखी अशी भावनिक टोके त्यामूळे गाठली जातात. ह्याकडे बघण्याचा पतीचा दृष्टीकोन हा सहिष्णुवादी हवा. ठीक आहे मी समजू शकतो काही काळजीचे कारण नाही. असा प्रोग्रेसिव्ह प्रतिसाद हवा.
जर गरोदर स्त्रीचे व इतर नातेवाईकांचे संबंध तणावपूर्ण असतील तर त्याचाही परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतो. म्हणूनच जर कलह असतील तर ते सर्वांनी मिळून , एकत्र बसून, एकमेकांशी मनमोकळे बोलून, समजून घेवून, भावनांची कोळिष्टके दूर करून, परत नवीन सुरूवात करावी. सासू, सासरे, दीर, नणंदा यांच्यातील वातावरण चांगले हवे. सासूने आता नातवंड होणार या आनंदात क्षमाशील राहिल्यास खूप समस्या सुटतात व सुनेनेही सासूबद्दल कृतज्ञता ठेवायला हवी.
भावनिक गुंतागूंत कमी झाला तर खूप मोठी ऊर्जा वाचते व सगळेच जण ती ऊर्जा गर्भस्थ बाळावर लावू शकतात. गर्भवतीने कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी.ती म्हणजे जास्तीतजास्त आनंदी वातावरण राखले पाहिजे. या आनंदी परिसराची स्पंदने बाळाला अतिशय लाभदायक असतात.
पतीचा सहभाग हा प्रत्येक पत्नीला आपल्या गरोदरपणाच्या कालावधीमध्ये आवश्यक असतो.