बघितलंस का तिला, किती जाड झाली आहे? नुसती घरी बसून असते, सगळ्या कामांना बायका ठेवल्या आहेत म्हणे हो ना ड्रेस तरी शोभतो आहे का ? आणि उगाच काहीही शोभत नसताना काय घालायचं आपलं गेले दोन तीन वर्ष, नुसती वाढतच चालली आहे जिथून तिथून असं म्हणूं फिदीफिदी हसण्यावारी नेणारा हा संवाद होता माझ्या सोसायटीमधील दोन स्त्रियांचा. माझ्या चांगल्याच परिचयाच्या. मला न राहवून मी त्यांना चांगलीच सुनावून आले.
मी गेल्यावर माझ्या पाठीमागे त्यांनी नक्कीच नाके मुरडली असणार हे ही मला चांगलेच ठाऊक होते. पण मला त्याची परवा नव्हती. खरंच किती बोलतो ना आपण दुसऱ्याच्या एखाद्या व्यंग अथवा कमतरतेवर! आपल्याला माहीत असतात का हो कारणं त्यांच्या ह्या त्रासाची? कोणीही आनंदाने नाही ना जाडं होत? किंवा कुणालाही हौस नसते काळं, बुटकं, अती उंच असण्याची.
आता हे संवाद जिच्याबाबतीत बोलले जात होते, ती सुकन्या, माझ्याच मजल्यावर राहणारी, लग्नाला दहा वर्ष झाली तरीही मुलबाळ नाही म्हणून ट्रीटमेंट घेत होती आणि तरीही यश काही मिळत नव्हतं. अनेक प्रकारची हेवी औषधं घेऊन त्या सगळ्याचा तिच्या शरीरावर परिणाम होऊन तिचं वजन वाढलं होतं. मुळात ती जाडी नव्हती, पण ह्या दहा वर्षात मात्र ती फारच सुटली होती.
त्यात तिला आलेलं नैराश्य ह्या सगळ्याने ती पार खचून गेली होती, म्हणजे एखाद्या खचलेल्या माणसाला धीर द्यायचा सोडून आपण आधी नावंच ठेवतो नाही का, कोणालाही, आणि सगळ्याच स्त्रियांचा हा वाईट स्वभाव असतो की पटकन एखाद्याला विचार न करता बोलायचं.
मान्य आहे तिने प्रयत्न करायला हवेत बारीक आणि फिट राहण्यासाठी, पण तरीही आपल्याला काहीही हक्क नाहीये असा कोणालाही काहीही माहीत नसताना फटकन बोलण्याचा. आता तुम्हाला गंमत सांगते. ज्या दोन स्त्रियांचा हा संवाद मी ऐकला त्यातली एक इतकी इतकी बारीक आहे, की जोरात फुंकर मारली की उडून जाईल आणि एक नकटी आणि थोडी काणी.
मग आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात हे ह्या स्त्रियांना माहीत नसते का? तुम्हाला चालेल का कोणी असं टोचून बोललं तर? वाटेल ना वाईट? कोणीही सर्वगुण संपन्न असतं का हो इथे? प्रत्येक माणसात काही ना काही कमी असतेच, पण ह्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणासही काहीही बोलण्याचा अधिकार नाही. सुकन्या त्या दिवशी मला अचानक बाजारात भेटली. थोडी उदासच वाटली.
मी ऐकलं त्या दिवशी त्या दोघींचे माझ्याबद्दलचे बोलणे, आणि तू नंतर त्यांना हे किती चूक आहे ते समजावलेस ते ही. पण एक सांगू, आता ना सवय झाली आहे सगळं ऐकायची, आता मी आहे जाडी तर आहे, करते आहे प्रयत्न, पण नाहीये काही परिणाम होत काय करू? मला खूप खूप वाईट वाटलं , अगदी डोळे भरून आले. सुकन्या, प्लिज अजिबात नाही, आपण ऐकून घेतो ना, म्हणून ही माणसं शेफारतात, ही दुनिया जशास तसं वागणाऱ्याची आहे , तू मुळीच ऐकून घेत जाऊ नकोस कोणाचंच, तू कोणत्या प्रसंगांना तोंड देत आहेस याची त्यांना पुसट जाणीव नाहीये, सगळं सहज सोपं असतं ना जीवनात तेव्हा हे असं लागेल असं बोलतात माणसं.
“हो कळतंय , पण जे बोलतात ते मूर्ख असं म्हणून मी ना हल्ली देते सोडून, नाही वाद घालत बसत, जाऊदे… पण बरं वाटलं तुला ऐकून, थॅंक्स!’ असं म्हणत ती गेली पुढे निघून. अनेक संकटं, त्रास सहन करून एखादी स्त्री जगत असते आपलं आयुष्य , पण अशी काही माणसं असतात जी त्यांचं जगणं अजून त्रासाचं करतात हे असं लागेल असं बोलून.
आता दुसरं उदाहरण अजूनही पेपरमध्ये वधु-वर ह्या माहितीच्या मथळ्याखाली येणाऱ्या जाहिराती बघून हसायलाच येतं की ‘गोरी मुलगी हवी’, आता तुमचा मुलगा गोरा आहे ठीके , पण गोरी मुलगी असेल बावळट, स्वयंपाक काहीही न येणारी तरीही चालणार आहे का? माझ्या एका मैत्रिणीच्या आईने त्यांच्या धाकट्या मुलींसाठी एक स्थळ बघितलं, “गोरी मुलगी हवी’ ह्या सदराखाली, ती काही गोरी नव्हती, पण मुलगा बघून तरी येऊ म्हणून त्या त्यांच्या घरी गेल्या तर मुलगा अगदी सावळा त्यानंतर दिसायला सुमार.
शेवटी त्या न राहवून बोलल्या “का हो ? तुमचा मुलगा तर सावळाच आहे की ! आणि तुम्हाला का हवी आहे मुलगी गोरी?’ तर त्यांचे उत्तर बघा मुलगा सावळा असला तरी स्मार्ट आहे, इंजिनियर आहे, आणि त्यांना होणारी मुलं गोरी हवीत हो आम्हाला.’
मी कपाळावर हात मारून घेतला. खरं तरं आपल्या भारतीय भवतालात मुलींचे सौंदर्य हे सावळ्या रंगातच आहे. पण अजूनही ‘एक गोरी हजार गुण चोरी’ ह्या भ्रमात सावळया, हुशार, तरतरीत मुलींना आजच्या काळातही केवळ रंगावरून नाकारले जात आहे.
जेव्हा आपण कुठल्याही वाईट प्रसंगातून जातो ना, तेव्हाच त्या काळात त्या जगण्यातील गांभीर्य आपल्याला कळते. समोरचा माणूस एखाद्या व्यंगापायी किंवा एखाद्या कमतरतेमुळे काय जगणं जगत असतो, हे जेव्हा आपण त्या जागी आपल्याला स्वतःला ठेऊन बघू ना, तेव्हाच कळू शकते, त्या माणसाचे आयुष्य. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करणं भयंकर चूक असते. आणि आपण सर्वच माणसांनी ही चूक करता कामा नये. दुसऱ्याला समजून घेणं हा एक गुण अंगी बाणवला ना तरी बघा आनंद मिळेल दुसऱ्यालाही आणि आपल्यालाही.
– मानसी चापेकर