आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याची समस्या सतावत असेल. ब जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते. हळूहळू तिथे जखम तयार होते व ती खूप दुखते. हा आजार 8-10 दिवस चालतो व नंतर बरा होतो. या आजारावर काही घरगुती आणि सोपे उपाय नक्कीच आहेत. पाहुयात, हे उपाय कोणते आहेत.
जेवणात पालेभाज्या असल्या, की बहुधा हा आजार होत नाही. सतत चहा-कॉफी, तंबाखू, धूम्रपान, दारू, इत्यादी व्यसनांनीही तोंड येते. पोटात जंत, आमांश वगैरे जुने आजार असले तर तोंड येते. अशा वेळी मूळ आजारावर उपचार करावा. काही जणांना विशिष्ट पदार्थामुळे किंवा औषधाने वावडे म्हणून तोंड येते. उदा. काही जणांना मसाला गरम पडून तोंड येते. दातांमध्ये गालाचा किंवा जिभेचा भाग चावला गेल्याने तोंड येते. एड्स या आजारात तोंडात बुरशीने व्रण येतात.
काही वेळा हिरडयांना सूज आल्यामुळे तोंड येते. अशा वेळी दिवसातून तीन-चार वेळा मिठाच्या पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. जेंशनचे एक-दोन थेंब औषध हिरडयांवर लावावे. लिंबू, पेरू किंवा आवळा अशी क जीवनसत्त्वयुक्त फळे खाण्यात असल्यास हिरडया मजबूत व निरोगी राहण्यास मदत होते.
तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. यासाठी जाईची 5-6 पाने स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल, अशी काळजी घेणे आवश्यक आहे. रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. असे दिवसातून 3-4 वेळा,या प्रमाणे 4-5 दिवस करायला सांगावे.
दुसरा एक उपाय म्हणजे सहाणेवर तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठमध उगाळून गंध तयार करावे. तोंडातील अंतर्भागात हे गंध सगळीकडे झोपताना लावावे (चूळ भरू नये). असे 4-5 रात्री करावे.
सोनकाव सायीत मिसळून व्रणावर लावल्यास वेदना कमी होते. तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होते. हळद लावण्याने व्रण लवकर भरुन येतो.
वारंवार तोंड येण्याचा त्रास असल्यास त्यामागे (काही जणांच्या बाबतीत) बध्दकोष्ठाचा त्रास असण्याची शक्यता असते, अशांना संध्याकाळच्या जेवणानंतर दोन-तीन तासांनी तेल किंवा तूप (पाच-सहा चमचे) द्यावे. त्यानंतर लगेच एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाव्याचा मगज (दीड ग्रॅम) घेण्याचा सल्ला द्यावा. यामुळे पहाटे पोट साफ होते. असे दर 2-3 दिवसांनी चार-पाच वेळा करावे. याबरोबरच तोंड येणा-या व्यक्तींनी तिखट, अतिखारट व आंबलेले अन्नपदार्थ टाळावेत.