[[{“value”:”
Eye Care: उन्हाळ्यात आपण त्वचेची खूप काळजी घेतो. सनस्क्रीन लावतो, टोपी वापरतो आणि भरपूर पाणी पितो. पण अनेकदा डोळ्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. वाढतं तापमान, कडक ऊन, धूळ आणि प्रदूषण यांचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांत जळजळ, खाज येणे, लालसरपणा, पाणी येणे आणि कोरडेपणा वाढण्याच्या तक्रारी वाढू लागतात.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. योग्य काळजी घेतल्यास संसर्ग, अॅलर्जी आणि इतर अनेक समस्या टाळता येऊ शकतात.
दुपारी १२ ते संध्याकाळी ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. या काळात सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांत जळजळ होणे, खाज येणे, धूसर दिसणे, डोळे लाल होणे आणि पाणी येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं.
उन्हाळ्यात डोळ्यांची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. दिवसातून काही वेळा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांना आराम मिळतो. मात्र, वारंवार हातांनी डोळे चोळू नयेत. कारण हातांवरील जंतू आणि घाण डोळ्यांमध्ये जाऊन संसर्ग होऊ शकतो. (Eye Care)
शरीरात पाण्याची कमतरता झाली तरी त्याचा परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास डोळ्यांतील नैसर्गिक अश्रूंचं प्रमाण कमी होतं आणि डोळे कोरडे पडू लागतात. त्यामुळे दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. (Eye Care)
याशिवाय ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारखी पेयंही शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. यामुळे डोळ्यांचं आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.
जर बाहेर जाणं आवश्यक असेल, तर टोपी, छत्री किंवा चांगल्या दर्जाचे यूव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरणं गरजेचं आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास मोतीबिंदूसारख्या समस्यांचाही धोका वाढू शकतो. (Eye Care)
नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारे आणि आधीपासून डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेले लोक अधिक धोक्यात असतात. त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. (Eye Care)
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि विश्रांतीही खूप महत्त्वाची आहे. सतत मोबाईल, टीव्ही किंवा संगणकाच्या स्क्रीनसमोर बसणं टाळावं. (Eye Care)
जर डोळ्यांत सतत जळजळ होत असेल, लालसरपणा वाढत असेल, धूसर दिसत असेल किंवा कोरडेपणा खूप वाढला असेल, तर स्वतःहून औषधं घेऊ नयेत. अशावेळी त्वरित नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉप्सचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. (Eye Care)
लक्षात ठेवा, डोळे हे आपल्या शरीरातील अतिशय नाजूक आणि महत्त्वाचे अवयव आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेसोबत डोळ्यांचीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे.
“}]]
