मोठय़ा गोष्टी या लहान स्वरूपात दडलेल्या असतात, असे सर्रास म्हटले जाते. प्रामाणिकपणे अंडय़ाचा विचार केला तर, या वाक्याची प्रचिती तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. अंडय़ामध्ये खूप जास्त प्रथिने, चांगल्या स्वरूपातील मेद आणि जीवनावश्यक जीवनसत्त्वे उपलब्ध असतात. हे घटक आरोग्याच्या दृष्टीने फारच हिताचे असतात. जर तुम्ही अंडय़ांचा वापर सकाळच्या नाश्त्यात करत असाल, तर मग वजन कमी करण्यासाठी वेगळा आहार घेण्याची आवश्यकता नाही.
जगभरात २ मिलीयनहून अधिक प्रौढ व्यक्ती आणि बालकांचे वजन गरजेहून अधिक आहे किंवा ते लठ्ठ आहेत. तसेच त्यांच्या वजनामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो, अशी माहिती नवीन अहवालातून मिळते. जगातील जवळपास एक-तृतीयांश लोकसंख्येला वाढते शहरीकरण, वाईट आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा छळतो आहे आणि भारत एकटाच दिवसेंदिवस फुगत चाललेला नाही!! २०२५ पर्यंत भारतात राहणारे जवळपास आणखी ५ टक्के लोक लठ्ठपणाकडे जाण्याची संभावना आहे. २०१६ मध्ये देशात ३० मिलीयन लोक लठ्ठ होते. तर २०२५ पर्यंत हा आकडा ७० मिलीयनपर्यंत जाईल!!
एकविसाव्या शतकात भारतात लठ्ठपणाने उग्र रूप धारण केले आहे. देशातील अतिरिक्त ५% लोकांना लठ्ठपणाने ग्रासले आहे. लठ्ठपणाच्या बाबतीत भारतही इतर विकसनशील देशांचा ट्रेंड अंगीकारत असून अधिकाधिक लठ्ठ होत चालला आहे. अनारोग्याला आमंत्रण देणारे, प्रक्रिया केलेले अन्न भारताच्या बाजारपेठांमध्ये शिरले आहे. जागतिक अन्न बाजाराचा हा अद्ययावत प्रकार भारताने उचलला आहे. मध्यम तसेच त्यावरील उत्पन्न गटाच्या मिळकतीत वाढ झाल्याने व्यक्तीचा सरासरी उष्मांक आहार वाढला. हृदयासंबंधी आजार बळावण्यासाठी लठ्ठपणा हा महत्त्वाचा घटक ठरतो.
भारतात लठ्ठपणाची समस्या फार आधीपासून सुरू झाली. लहान मुलांच्या लठ्ठपणात आपला देश – १४.४ मिलीयन – चीननंतर दुस-या क्रमांकावर आहे. शारीरिकदृष्टय़ा हालचाल नसणे आणि जंक फूड ही त्यामागची कारणे आहेत. भारतातील आहार हा भारी कबरेदकांचा आणि तेलकट असतो. एक देश म्हणून भारत व भारतीय वैद्यकीयदृष्टय़ा मोठी किंमत चुकवत असतात. लठ्ठपणामुळे अतिताण, मधुमेह (भारतात ८० मिलीयन मधुमेही आढळतात), कुच्र्याचे आजार, हृदयरोग आणि श्वसनासंबंधीच्या समस्या बळावतात. हृदयरोग, रिनल ट्रान्सप्लांट, गुडघे प्रत्यारोपण आणि मधुमेही उपचार या सर्वावर मोठा खर्च होताना दिसतो.
अशा परिस्थितीत आणि अशा वेळी आपण अंडय़ाचे आभार मानले पाहिजेत. ज्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व असते, ते आपली तंदुरुस्त हाडे आणि दातांसाठी आवश्यक असते. तसेच यातील पोषक तत्त्वे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात, हृदयरोगापासून संरक्षण करतात, चेतासंस्थेच्या, मेंदूच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंडी हा वजन कमी करण्याचा उपयुक्त आहार आहे.
अंडय़ांमध्ये प्रथिने जास्त आढळतात. ती वजन कमी करण्यासाठी पोषक ठरतात. शरीराचा भार कमी करण्यासाठी बनवला जाणारा अंडय़ांचा पदार्थ म्हणजे एग व्हाईट सलाड किंवा काही भाज्या घालून केलेले झटपट ऑम्लेट अथवा एग व्हाईट वापरून तयार केलेले सँडविच. आहारात अंडय़ांचा समावेश करून दिवसाची सुरुवात करणे हा वजन कमी करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. कारण अंडय़ांमुळे पोट चांगले भरते, दुपारच्या जेवणापर्यंत काही खाण्याची इच्छा होत नाही, ज्यामुळे भूक दूर पळते. अंडय़ांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
एका सर्वसाधारण अंडीयुक्त आहारात २ ते ४ अंडय़ांचा समावेश असू शकतो. साधारणपणे तीन मोठय़ा उकडलेल्या अंडय़ांत २४० हून कमी कॅलरीज असतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने तसेच हंगामी भाज्यांचा समावेश केल्याने आहार परिपूर्ण होतो, त्यातून साधारण ३०० कॅलरीज मिळतात.