वेलची म्हणजेच वेलदोडा हा मसाल्यातील एक पदार्थ. आपल्या घरात नित्य वापरला जाणारा. वेलची सुगंधी असते, त्याचप्रमाणे तिच्यात अनेक औषधी गुणही असतात. वेलचीचा उपयोग बहुतेक करून पानाबरोबर अधिक होतो.
खाण्याचे विविध पदार्थ, मिठाई इत्यादीमध्ये सुगंधी पदार्थ म्हणून वेलचीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. वेलची तेलात अनेक औषधी गुण असतात. वेलची अधिक उष्ण वा अधिक थंड नसते. ती शीतोष्ण असते. भोजनानंतर मुखशुद्धीसाठीही वेलचीचा नित्य वापर केला जातो.
आपण पाहूया चेलचीच काही औषधी गुणधर्म आणि उपयोग-
थकवा येण्यावर वेलचीचा उपयोग…
बऱ्याच वेळा माणसाला थकवा वाटतो, किंवा काळजी वा अन्य कारणांमुळे चिंता वाटते व उदासपणा येतो. शरीर पूर्णपणे गळून गेल्यासारखे वाटते. अशा वेळी वेलची पाण्यात चांगली उकळून तिचा चहा करून घेतला तर मनाला शांती मिळते. थकवा दूर होतो व मन प्रसन्न होते.
नपुंसकत्व….
नपुंसकत्व हा एक प्रकट न करतायेण्यासारखा विकार. अनेक कारणांमुळे पुरुषाची कामेच्छा कमी होते वा संभोगशक्ती कमी झाल्याचे जाणवते. किंवा अकाली-वेळेपूर्वी स्खलन होत असते. अशा रुग्णांनी रात्री वेलचीचे चिमूटभर चूर्ण दुधात उकळून त्यात मध घालून प्यायले असता त्यामुळे खूप लाभ होतो.
तोंडातील व्रण …
अनेकदा माणसाचे तोंड येते, वा तोंड आल्यानंतर येतात तसे तोंडात व्रण येतात. घसा खवखवतो, घसा बसतो, अशा वेळी वेलची कुटून पाण्यात उकळून घ्यावी. त्या पाण्याच्या सकाळी गुळण्या केल्या असता त्रास कमी होतो.
पचनासंबंधी विकार….
अनेकदा माणसाला पोट फुगल्याप्रमाणे वाटत असेल आणि जठराची पचनशक्ती कमी झाली असेल, तर त्यावर वेलचीचे तेल अतिशय परिणाम कारक ठरते.
मुखदुर्गंधी
तोंडाला दुर्गंधी येत असेल, उलट्या होत असतील, पचनदोष निर्माण झाले असतील तर वेलचीचे दाणे चघळावेत. वेलचीचे दाणे चघळल्याने पचनदोष नाहीसे होऊन पचनशक्ती वाढते. जेवण चांगले जाते. कांदा लसूण खाण्याने तोंडाला दुर्गंधी येत असेल तर वेलची चघळावी. तोंडाची दुर्गंधी जाते.
कफाचा त्रास
कफप्रवृत्ती असलेल्यांनी किंवा ज्यांना लघवीचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी वेलची अधूनमधून चघळावी. वेलची चघळल्यामुळे शरीरातील कफ मोकळा होतो. कफ मोकळा झाल्यामुळे अंग ठणकायचे थांबते. बलवृध्दी होते.
छातीत जळजळणे
अतिरिक्त चरबी असेल, छातीत जळजळ व पोटात गॅस होत असतील तर वेलची सेवनाने उपाय होतो. शरीराला थंडावा मिळाल्याने छातीतील जळजळ कमी होते.
सुस्तपणा
जर सकाळी दोन-तीन मिरे व एक वेलची पाण्यात उकळून त्यात चहापत्ती टाकून त्याचा चहा बनवून घेतला, तर पोटातील गॅस व सकाळी येणारा सुस्तपणा नष्ट होतो.
मूत्रविकार
वेलचीच्या बिया कुटून त्यात केळीच्या पानांचा रस व आवळ्याचा रस टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्याने लघवी मोकळी होते तसेच मूत्रासंबंधी जळजळ इ. तक्रारी दूर होतात. वेलची कुटून दुधासोबत घेतल्याने लघवीची जळजळ थांबते. यामुळे मूतखड्याच्या विकारातही लाभ होतो.
अशी आहे बहुगुणी वेलची.