पित्तनाशक – डाळिंब हे पित्तनाशक आहे. चांगल्या ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कसल्याही प्रकारचे पित्त शमते.
तोंडाला चव येण्यासाठी – डाळिंब रूची उत्पन्न करणारे आहे.
अरूचीवर – कोणत्याही कारणाने आलेल्या अरूचीवर हे उत्तम रूची देते. ह्याचे दाणे थोडे थोडे चावून रस गिळावा, तोंडास रूची येते.
सतत तहान लागत असेल तर – ह्याच्या रसाने तृषा-तहान थांबते. तापात किंवा दुसऱ्या रोगात तहान फार लागत असेल तेव्हा डाळिंबाचे दाणे खावे किंवा रस काढून तो वरचेवर थोडाथोडा प्यावा, तृषा-तहान थांबते.
लहान मुलांच्या खोकल्यावर – लहान मुलांचे खोकल्यावर ह्याचा रस, मध व साखर घालून याचे वरचेवर चाटण केल्याने थांबतो. डाळिंबाचे साल तोंडात धरल्याने खोकला थांबतो.
छातीत दुखत असल्यास – डाळिंब हृद्य म्हणजे हृदयाला हितकारक आहे. छातीत दुखत असल्यास ह्याच्या दाण्याचा रस 10 मि.लि. खडीसाखर 10 ग्रॅम घालून प्यावा, बरे वाटते. छातीतील दुखणे थांबते.
अन्नपचन होऊन भूक लागण्यावर – संग्रहणी म्हणजे, अन्न पचून वरचेवर फार वेळा पातळ परसाकडे होते, त्यावर हे अत्यंत उत्तम औषध आहे. ह्याने अन्न चांगले पचते, उत्तम भूक लागते व परसाकडे थांबते.
अतिसार व संग्रहणीवर “दाडिमाष्टक’ – दाडिमाष्टक म्हणून डाळिंबाचे इतर औषधे घालून तयार केलेले चूर्ण फार पुरातन कालापासून अतिसार, संग्रहणीवर प्रसिद्ध आहे. चांगल्या पिकलेल्या डाळिंबाचे चूर्ण 80 ग्रॅम, वंशलोचन 10 ग्रॅम, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे ही प्रत्येकी 20 ग्रॅम, ओवा, जिरे, धने, वेखंड, सुंठ, मिरे, पिंपळी इतकी सर्व औषधे 40 ग्रॅम प्रमाणे घेऊन सर्वांचे बारीक वस्त्रगाळ चूर्ण करावे. या चूर्णास दाडिमाष्टक म्हणतात. ते ऊन पाण्याबरोबर घेत जावे. याने चांगला गुण येतो.
जंत पडण्यासाठी – कोणी कोणी ही सर्व औषधे व मोचरस, डाळिंबाच्या रसात खलवून गोळ्या करतात व त्या 2 ग्रॅम प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ घेतात. यानेही जंत पडण्यास मदत होते. चांगला गुण येतो. ह्याच्या मुळाच्या सालीचे जंतावर चांगले औषध आहे. डाळिंबाच्या मुळावरील साल 10 ग्रॅम, 6 ग्रॅम वावडिंग व 6 ग्रॅम इंद्रजव घालून काढा करून द्यावा. जंत नाहीसे होतात.
अजीर्ण होत असेल तर – डाळिंब दीपक आहे. कोणत्याही तऱ्हेच्या अजीर्णात, ते त्रिदोषात्मक असले तरीही त्याच्यावर फार चांगला उपयोग होतो. उत्तम पिकलेल्या डाळिंबाचा रस 10 मि. ली. उत्तम जिरे 10 ग्रॅम, जुना गूळ 10 ग्रॅम एकत्र करून घेतले असता चांगला गुण येतो. थोड्याच दिवसात अजीर्ण अगदी नाहीसे होते.
रूचीवर – हे रूचकर असल्याने ज्वरातून उठल्यावर जर जीभेची चव गेली तर, किंवा कोणत्याही मनाला किळस आणणारा पदार्थ पाहुन, हुंगून किंवा खाऊन आलेल्या अरूचीवर डाळिंबासारखे उत्तम औषध नाही. पिकलेल्या डाळिंबाच्या 10 मि. लि. रसात 7।। ग्रॅम मध व 2।। ग्रॅम गाईचे तूप घालून सकाळ-संध्याकाळ घेतले असता चांगला गुण येतो. इतर औषधे पुष्कळ दिवस घेतले असता वीट येतो, तसे हे औषध रोज घेतले तरी पुन्हापुन्हा घ्यावेसेच वाटते.
अतिसारावर – सामान्यतः अतिसारावर डाळिंबाची साल 10 ग्रॅम, जुना गूळ 10 ग्रॅम व जिरे 5 ग्रॅम घालून घ्यावे. एक दोन दिवसातच गुण येतो. डाळिंब अतिसार नाशक आहे. अतिशय अजीर्ण झाल्यामुळे किंवा कोणत्याही अन्य कारणाने उत्पन्न झालेल्या अतिसारावर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण 1/2 ग्रॅम, जायफळ 1/2 ग्रॅम, केशर पाव ग्रॅम इतके चूर्ण करून किंचित् मधाबरोबर घ्यावे. घेतल्यावर फारतर एखादे वेळीसच शौचास जावे लागेल. पण मग लगेचच बर वाटेल.
काविळीवर उपयुक्त – कावीळ झाली असल्यास नखे पिवळी होतात, डोळे पिवळे होतात यावर चांगल्या उत्तम प्रतीच्या डाळिंबाचा 20 मि. ली. रस, खडीसाखर 10 ग्रॅम घालून तो सकाळ-संध्याकाळ घेत जावा. थोड्याच दिवसात कावीळ नाहीशी होते.
क्षय रोगावर – डाळिंब क्षयघ्न आहे. चांगल्या उत्तम पिकलेल्या स्वादिष्ट डाळिंबाचा रस 225 मि. लि. घेऊन त्यात पिंपळी चूर्ण 22 ग्रॅम, जिऱ्याचे चूर्ण 32 ग्रॅम, दालचिनीचे चूर्ण 40 ग्रॅम व त्यात 8 ग्रॅम चांगले केशर घालून उत्तम 175 ग्रॅम जुना गूळ घालावा. हे सर्व एकत्र आटवून त्यात 8 ग्रॅम वेलदोड्याचे चूर्ण घालावे. 4 ग्रॅम वजनाच्या गोळ्या बांधाव्यात व दररोज सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर एक पचेल अशी यथा शक्तिने घेत जावी.
डोळयातील फुलावर – डाळिंब नेत्रविकारावरही गुणकारी आहे. चांगल्या पाडाला लागलेल्या डाळिंबाची वाळलेली साल पक्क्या पिकलेल्या डाळिंबाच्या रसात उगाळून थोडी थोडी तांबड्या गुंजेवरची टरफले काढून त्यात उगाळावी व त्याचे फूल असलेल्या ठिकाणी अंजन करावे. फूल लवकरच जाते.
आवाजाच्या माधुर्यासाठी – हे स्वर्य आहे. अतिशय बोलल्यामुळे किंवा शेंदुरासारखे पदार्थ पोटात जाऊन स्वर बिघडला असल्यास, चांगले पिकलेले डाळिंब रोज एक खावे, गुण फार चांगला व लवकर येतो.
किडा चिरडून पुरळ आल्यास – हे विषघ्न आहे. कोळी अंगाखाली चिरडून किंवा अन्य विषाने अंगावर उठलेल्या पुरळास ह्याचा नुसता रस अंगास चोळावा, पुरळ नाहीसे होते. अशाप्रकारे डाळिंब हे अत्यंत उपयुक्त आणि औषधी आहे.