पुणे – भारत 2020 पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलं आहे. त्यात 25 ते 30 वर्ष वय असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात.
एकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणाऱ्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे. देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी 35 टक्के रुग्ण हे 45 पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.
सामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणाऱ्या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता.
हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही हृदयविकार वाढतो. मात्र ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते.
आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं.
हृदय बंद पडतं म्हणजे काय?
हृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात.
याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोडया भागांवर झाला असेल छोट्या प्रमाणातील हार्ट अटॅक येतो.
हृदयरोगाची लक्षणं झटका येण्याच्या अगोदरच दिसून येतात, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हृदरोगी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्याला हृदयाचा झटका आला आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होतो. भरपूर घाम येतो. मळमळतं. चक्कर येते. उलट्या होतात.
शरीराला कंप सुटतो. ही हृदयाच्या झटक्याची सामान्य लक्षणं आहेत. कधीकधी छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात. या वेदना छाती किंवा पोटाच्या मध्यभागी वा पाठीच्या मणक्यात होतात. तिथून त्या मानेत किंवा डाव्या ताकडे जाऊ शकतात. या वेदना मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्णाच्या शरीराचा रंग बदलतो. अचानक रक्तदाब कमी होऊन मृत्यूही येतो.
प्रथमोपचार
प्रथमोचार हे रुग्णावर झटकन झाले पाहिजेत. आणि ते झाले तर रुग्णाचे जीव वाचतात. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवं झोपवावं. त्याचे सर्व घट्ट कपडे सल करावेत. जर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्सिजन द्यावा. नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरब्रिटेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ऍस्प्रीन ढवळून द्यावं.
डॉक्टरांकडून केले जाणारे उपचार कोणते?
हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार आणि इस्पितळात भरती करणं गरजेचं असतं. हृदयाचा त्रास निर्माण झाल्याची काही मिनिटं, काही तास जरा संकटाचे असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधं दिली जातात. डॉक्टर रुग्णांची सूक्ष्म तपासणी करतात.
हृदयाची स्पंदनं मोजतात. रक्तदाब पाहतात. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो. ईसीजीमुळे हृदयाच्या ठोक्यांचा अंदाज येतो. या ठोक्यांमध्ये काही असामान्य लय आहे का ते दिसते. हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास तेही लक्षात येतं.
मात्र, प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येतं.
छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे. हृदयाच्या कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम काढला जातो.
हृदयाशी संबंधित आजार
– ऍनजायना पेक्टोरिस – हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं
– आर्टिरिओ स्क्लेरॉसिस – शुद्ध रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी होत त्या कडक होणं
– कार्डिऍक अरेस्ट – हृदयक्रिया बंद पडणं
– कॉरोनरी हार्ट डिसाज् – हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं
– व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज् – हृदयातील झडपेचा आजार
– मायोकार्डियल इनफाक्शन – हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता
छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडिमार. अँजिओग्राफी, अँजिओप्लॅस्टी आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं.
– डॉ. जयदीप महाजन