– डॉ. चिदानंद फाळके, नाशिक
दिवसभरातील कामे केल्यानंतर शरीराला थकवा येणे हे जरी स्वाभाविक असले तरी सध्या एक गोष्ट प्रामुख्याने बघण्यात आली ती म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींनी काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन, त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत आहे. कोविड’१९ ह्या विषाणूशी दोन हात करतांना आपल्या शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असते.
एकीकडे हा विषाणू आणि दुसरीकडे भरमसाठ प्रखर औषधांचा मारा यामुळे शरीरात होणाऱ्या सर्व अनियमित प्रक्रियांना सुरळीत करतांना शरीरातील नैसर्गिक पेशींची खूप हानी होत असते. असेही दिसून आले आहे की, कोरोनातून सहीसलामत सुटून आल्यावर अनेकांना थ्रोम्बोसिसमुळे हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला.
कोरोनानंतर येणाऱ्या थकव्यामुळे व्यक्तीस गळून गेल्यासारखे होते, आळस, चैतन्य, उत्साह नसतो, बेचैनी, झोपाळूपणा, अशक्तपणा, नैराश्य अशी लक्षणे जाणवतात. व्यक्तीच्या एकापेक्षा जास्त अंतःस्रावी ग्रंथी सुरळीत कार्य करत नाहीत. अशा परीस्थितीत शरीरातील ऊर्जा कमी होते म्हणजेच मानवी बायोबॅटरी डिस्चार्ज होते. निसर्गाच्या नियमांचा अवलंब केला तर पुन्हा उर्जावान होणे शक्य आहे. कसे ते बघूया :
आपले शरीर थकल्यावर सर्वप्रथम निसर्ग स्वतःच हिलींगद्वारे झालेल्या हानीला भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी शक्यतो घन आहार घेणे टाळावे, त्याऐवजी फळांचा रस, भाज्यांचा रस घेण्यास सुरुवात करावी यामुळे अन्न पचविण्यासाठी ऊर्जा कमी लागते आणि शेष ऊर्जा शरीर दुरुस्तीसाठी अर्थात नैसर्गिक हिलींगसाठी कामी येते. यासाठी सायंकाळी उशिरात उशिरा आठ वाजेच्या आत हलका आहार किंवा फळांचा, भाज्यांचा रस घ्यावा. सायंकाळी आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत, म्हणजेच १२ तास नैसर्गिक हिलींगसाठी शरीराला मिळतात आणि शरीर नैसर्गिकरित्या झालेली झीज भरून काढून बायोबॅटरी चार्ज करते.
घरगुती उपाय :
१. कोरोनातून बऱ्या झालेल्या परंतु प्रचंड थकवा जाणवणाऱ्यांनी सुरुवातीचे तीन दिवस मोठे सहा ग्लास संत्र्याचा रस न गाळता पिणे.आवळ्याचा ताजा रस मिळाल्यास लवकर गुण येतो. त्यानंतर पुढे महिनाभर कमीत कमी तीन मोठे ग्लास दररोज संत्र्याचा रस न गाळता पिणे.
२. आवळा चूर्ण तीनशे ग्रॅम घेऊन त्यात सुंठ चूर्ण शंभर ग्रॅम मिक्स करून ठेवा. दररोज एक कप पाण्यात एक चमचा हे चूर्ण टाकून सकाळ संध्याकाळ घेणे.
३. एक कांदा किसून त्यात पाव चमचा हळद टाका आता ह्या मिश्रणात पाव चमचा मध घाला आणि अर्धा चमचा शुद्ध गाईचे तूप टाकून एकत्र करून सलाड प्रमाणे खाणे.
४. सुंठ, काळी मिरी, पिंपळी हे समभाग घेऊन त्यांचे एकत्रित चूर्ण करून काचेच्या बाटलीत भरून ठेवा. दररोज एक चमचा चूर्ण गुळामध्ये मिक्स करून सकाळ, दुपार, संध्याकाळ घेणे.
आयुर्वेदिक :
१. महासुदर्शन चूर्ण : एक चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातून घेणे. हे मानसिक दौर्बल्य, बेचैनी, गळून जाणे तसेच आजारातील ताप गेल्यानंतरच्या अशक्तपणावर गुणकारी आहे.
२. पंचासव : बलारीष्ठ, दशमूलारीष्ठ, द्राक्षासव, लोहासव व कुमारी आसव ह्या पाच आसवांचे एकत्रित आसव म्हणजेच पंचासव. जेवणानंतर तीन चमचे पाण्यात तीन चमचे पंचासव टाकून घेणे.
बाराक्षर मिश्रण :
१. मानसिक थकवा जाणवत असल्यास बाराक्षर मिश्रण नंबर १६ प्रत्येकी चार – चार गोळ्या दिवसातून चार वेळेस घेणे.
२. शारीरिक थकवा जाणवत असल्यास बाराक्षर मिश्रण नंबर २७ प्रत्येकी चार – चार गोळ्या दिवसातून चार वेळेस घेणे.
ऍक्युप्रेशर :
१. दोन्ही हातांच्या करंगळीवरच्या दोन्ही पेरांवर दाब द्यावा. किमान दोन मिनिटे दाबा-सोडा अशा पद्धतीने दाब द्यावा. दिवसभरातून जेव्हा जमेल तेव्हा तीन चार वेळेस असे करावे, यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
२. उजव्या हाताच्या आतील बाजूवरील मनगट आणि कोपर यांच्या बरोबर मध्यावर दोन मिनिटे दाब द्यावा. दिवसातून तीन चार वेळा असे करावे, यामुळे शरीरातील बायो बॅटरी चार्ज होण्यास मदत होते.
३. सायंकाळी खुर्चीत बसून दोन्ही पायाखाली लाटणे ठेऊन तळपाय फिरवणे, यामुळे सर्व अंतःस्रावी ग्रंथी सुस्थितीत कार्य करू लागतील आणि शरीरात चैतन्य निर्माण होईल.
– डॉ. चिदानंद फाळके, एम. डी. (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) नाशिक