अनेकदा पाच वर्षांवरील मुलेही रात्री झोपल्यानंतर अंथरूण ओले ( child wet bed ) करतात. यामुळे पालकांची चिडचिड होते, पण मुलालाही वारंवार रागवले जाते. तेव्हा यामागची कारणे शोधून, त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
अंथरुणावर झोपले असता नकळत आपोआप मूत्रप्रवृत्ती होणे, यास शय्यामूत्र म्हणतात. साधारणत: नवजात अवस्थेतील बालकात ही प्रक्रिया पूर्णपणे अनैच्छिक असते; परंतु बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्यामध्ये शारीरिक व मानसिक पक्वता निर्माण होणे चालू होते.
याचबरोबर आपल्या पेशींवर नियंत्रण ठेवणे बाळाला अवगत होते.
बाळ जसे मोठे होऊ लागते तसे मूत्राला रोखून धरणे व योग्यवेळी मूत्रत्याग करणे या क्रिया बाळाला जमू लागतात. बाळ दोन वर्षांनंतर दिवसा व पाच वर्षांनंतर रात्री अंथरुणात मूत्रत्याग करणे पूर्ण थांबवता येते; परंतु पाच वर्षांनंतरसुद्धा बाळ अंथरुणात मूत्रत्याग करीत असेल तर ती विकृती आहे.
अंथरूण ओलं ( child wet bed ) यामागची कारणे
– बाळांमधील असुरक्षिततेची भावना, भय, चिडचिडेपणा, पालकांचा वा इतर व्यक्तिंचा धाक असणे, बाळाच्या पालनपोषणाबाबत पालकांचे असलेले अज्ञान, यामूळे मूत्रत्यागाच्या वेळा व सवयी बाळास लागत नाहीत.
– लहान बाळ साधारणत: प्रथम वर्षात मल, मूत्र त्याग करण्याअगोदर काहीतरी संकेत देतात. उदा. रडणे, ओरडणे, कन्हणे, इत्यादी. या संवेदना निर्माण होणे व जाणकार पालकांनी त्या समजावून घेणे महत्त्वाचे आहे. हा संकेत एकदा समजावून घेतल्यावर योग्यवेळी आई बाळाकडून मल, मूत्र त्याग करवून घेऊ शकते; परंतु काही माता हे संकेत नीट समजावून घेऊ शकत नाही. त्यामुळे बाळ अंथरुणातच मल, मूत्र त्याग करते.
– काही बाळांमध्ये आजारामुळे शय्यामूत्र होते. यामध्ये बाळाला जंत होणे हे एक कारण असू शकते. याबरोबरच मूत्रसंस्थेचे व्याधी, निरुद्धप्रकाश, मूत्राशय शिथिलता, इत्यादी कारणे असू शकतात.
– ज्या बाळामध्ये अशा प्रकारची विकृती दिसून येते. त्यांचे पालक बरेच चिंताग्रस्त होतात. खरे तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. अगदी थोडक्यात येणाऱ्या उपाययोजनांनी ही विकृती कायमस्वरूपी बंद करता येऊ शकते.
अंथरूण ओलं ( child wet bed ) : उपाययोजना
बाळाला औषधी व मानसिक चिकित्सा करणे गरजेचे आहे.
मानसिक चिकित्सा
-मानसिक चिकित्सा म्हणजे मानसिक कारणे दूर करणे होय. उदा. शिक्षणाचा अभाव, त्रुटीपूर्ण पालनपोषण, भय दूर करणे, इत्यादी.
-जर बाळास काही वाईट सवयी असतील उदा. सकाळी उशिरापर्यंत झोपणे, आळस तर या सवयी बंद करणे गरजेच्या आहे.
- बाळाला मध्यरात्री व सकाळी लवकर झोपेतून उठवून मूत्रत्याग करवावे. अशावेळी पालकांनी कंटाळा करून बाळाला उठवले नाही व सकाळी उठवण्याऐवजी बाळाला झोपवण्याचा प्रयत्न केला तर बाळ नक्कीच अंथरुणात मूत्रत्याग करतो. पुढे तशीच सवय लागते.
-बाळास काही शारीरिक दोष असल्यास त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चिकित्सा करावी. मानसिक कारणे दूर करताना बाळास विनाकारण रागावू नये, तिरस्कार करू नये, आपल्यामध्ये कोणता तरी मोठा दोष आहे, असे वाटू देऊ नये. त्याच्याशी प्रेमाने वागावे.
– सायंकाळनंतर बाळास द्रवपदार्थ कमी प्रमाणात द्यावेत.
- बाळ रात्री कोणत्यावेळी मूत्रत्याग करतो याचे निरीक्षण करून त्यावेळी अलार्म लावून बाळास झोपेतून उठवावे व मूत्रत्याग करवून घ्यावे.
औषधी चिकित्सा करताना काही.
आयुर्वेदिक योगांचा वापर करून घेतल्यास चांगला परिणाम दिसून येतो. यामध्ये दशमूळ क्वाथ, चंद्रप्रभावटी, अश्वगंधा चूर्ण, वमभस्म, शिलाजीत यांचा वापर करता येईल. वरील सर्व औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य मात्रेत द्यावीत.