शारदा काकू बोलण्यासाठी येऊन बसल्या. आल्यापासूनच त्या खूप काळजीत वाटत होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे पतीसुद्धा आले होते. त्यांच्याही चेहऱ्यावर काळजी, भीती दिसत होतीच. पण काकूंपेक्षा ते बरेच शांत होते. त्यांनीच दोघांची ओळख करून दिली.
काका एका कंपनीत नोकरी करत होते. तर काकू गृहिणी होत्या. त्यांना दोन मुलं होती. पैकी त्यांच्या मोठ्या मुलासंदर्भात म्हणजे प्रकाशच्या संदर्भात बोलायला ते आले होते. प्रकाश नववीमध्ये शिकत होता आणि गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे जवळजवळ 7-8 महिन्यांपासून त्यांना प्रकाशमध्ये खूप बदल जाणवत होते. या काळात तो अगदीच शांत आणि गंभीर झाला होता. त्याच्या धाकट्या बहिणीचं आणि त्याचं नातं खूप छान आहे. दोघं खूप खेळतात, मस्ती करतात, तो तिची आणि आईचीसुद्धा खूप काळजी घेतो, बहिणीचा छान अभ्यास घेतो. तो स्वतः अभ्यासात हुशार आहे.
परीक्षेत त्याला नेहमी चांगले मार्क मिळतात. पण गेल्या काही काळापासून तो खूपच शांत झालाय, सारखा गोंधळलेला वाटतो. घरात आईशी, बहिणीशी नीट बोलतच नाही. त्यांच्याशी बोलणं टाळतो. कदाचित त्याच्या मनात कसलीतरी भीती बसली आहे का? असं आम्हाला सारखं वाटतं, हल्ली अभ्यासातही त्याचं लक्ष लागत नाहीये. सारखा आपल्या खोलीत एकटाच जाऊन बसतो.
काका हे बोलत असतानाच काकू मध्येच म्हणाल्या, “त्याला कोणी त्रास देत नसेल ना? कोणी मुलं रॅगिंग वगैरे करत नसतील ना? आमचा प्रकाश खूप साधा भोळा आहे हो. आम्ही खूप बोलायचा प्रयत्न केला त्याच्याशी पण तो नाही हो बोलत काहीच.’
एवढं बोलून त्यांना एकदम रडू आलं. त्यांना थोडं शांत केलं आणखी काही आवश्यक माहिती घेऊन त्यांना पुढील वेळी प्रकाशला घेऊन यायला सांगितले. ठरल्याप्रमाणे काका त्याला दोन दिवसांनी घेऊन आले.
काकांनी त्याची ओळख करून दिली आणि ते बाहेर जाऊन बसले. काका बाहेर गेल्यावर प्रकाशशी संवाद साधायला सुरुवात केली. पण या सत्रात प्रकाश काहीच बोलला नाही. मान खाली घालून जेवढे प्रश्न विचारले त्याची तुटक-तुटक उत्तरे दिली. नंतरच्याही काही सत्रात तो असाच शांत होता. ओळख झाल्यावर, विश्वास वाटायला लागल्यावर म्हणजे जवळजवळ 4-5 सत्रांनंतर प्रकाश हळूहळू बोलायला लागला. तो बोलेल ते कोणालाही समजणार नाही असं आश्वासन मिळाल्यावर तो मनातलं थोडं थोडं बोलायला लागला. त्याने त्याच्या मनात येणारे विचार सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून त्याला विचित्र वाटत होतं म्हणजे त्याला सारखं मुलींशी बोलावसं वाटायचं. एका मुलीकडे वर्गात सारखं बघावसं वाटायचं. तिच्याशी मैत्री करावीशी वाटायची. मुलं त्याला तिच्या नावावरून चिडवायची. मुली दिसल्या की मनात कसंतरीच होतं. अशा अनेक भावना, विचार त्याने अगदी मोकळेपणाने व्यक्त केले. आपल्या मनात येणारे हे विचार खूप वाईट आहेत. आपण खूप “वाईट मुलगा’ आहोत म्हणूनच आपल्या मनात असे विचार येतात असा त्याचा समज झाला होता. म्हणूनच मुलींपासून दूर राहण्याचा तो सतत प्रयत्न करत होता. “आपल्या मनात असे विचार येऊच कसे शकतात?’
या एकाच विचाराने तो सतत अस्वस्थ असायचा. आपण खूप वाईट आहोत या अपराधी भावनेने तो बेचैन झाला होता. त्याच्याशी चर्चा करताना त्याला स्वतःमध्ये होणारे बदल आणि त्याचे अर्थ आणि कारणं उमगत नसल्याने त्याच्या मनात ही अपराधी भावना निर्माण झाली होती. हे लक्षात आलं त्यामुळे पुढील सत्रांमध्ये त्याला त्याच्यातील होणाऱ्या बदलांची, मनात येणाऱ्या विचारांमागील कारणांची शास्त्रशुद्ध ओळख करून देण्यात आली. त्याच्या साऱ्या शंकांचे निरसन झाले. त्यामुळे या साऱ्यावरचे उपायही शोधता आले आणि मग आपण “वाईट मुलगा’ आहोत ही भावना त्याच्या मनातून आपोआपच दूर झाली आणि सगळं पूर्ववत छान झालं. अर्थातच यात त्याच्या आई-वडिलांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं.
(केसमधील नावे बदललेली आहेत.)
मानसी चांदोरीकर