डोळे आणि पापणी हे केवळ सौंदर्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहेत. या दोन्हींमध्ये असलेले दोष संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकू शकतात. त्यासाठीच ते वेळीच दूर करणे चांगले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केली जाणारी प्लॅस्टिक सर्जरी हा यासाठी उत्तम उपाय ठरतो.
पापणी हा डोळ्यांचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्यामुळे डोळ्यांत जाणारी घाण, धूळ यांना अटकाव होतो व त्यामुळे होणारी इजा टाळता येते. तसेच, डोळे हे ओलसर, पाणीदार राहण्याकरिता पापण्यांचा उपयोग होतो. आपला डोळा सतत उघडा राहिला, तर बाहेरच्या उष्णतेमुळे कोरडा होऊ शकतो.
डोळा हा आपल्या चेहऱ्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. एका संशोधनानुसार जेव्हा सामान्य माणूस दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा दहा टक्के वेळा त्याचे लक्ष समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे जाते. डोळ्यांचा कोणताही भाग विद्रूप असेल तर साहजिकच ती व्यक्तिमत्त्वातली मोठी त्रुटी ठरते.
शिवाय काही वेळा या विद्रूपतेमुळे डोळ्यांना त्रास होत असण्याचाही संभव असतो. अशा विरूपतेत ऍक्युलो प्लॅस्टिक सर्जरी (डोळ्यांची प्लॅस्टिक किंवा कॉस्मेटिक सर्जरी)ने डोळे व्यवस्थित करता येतात. यातच पापणीच्या विकारांचा किंवा विद्रूपतेचा समावेश होतो. पापणीचे विकार अनेक प्रकारचे असतात. पापणी खाली पडलेली असेल तर त्याला आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे व्यवस्थित करता येते. त्याला झीीेंळी असे म्हणतात.
हा प्रकार अनुवंशिक असू शकतो किंवा डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे होऊ शकतो. आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून या आजारामध्ये उत्तम रिझल्ट मिळवता येतो. या ऑपरेशनचे काही डाग किंवा खूणही चेहऱ्यावर राहत नाही. ऑपरेशननंतर दोन्ही डोळे समान आणि सुंदर दिसतात. ही शस्त्रक्रिया कोणत्याही वयात करून घेता येते.
पापणीच्या अन्य विकारामध्ये रूक्ट्रोपायोन म्हणजे पापणीच्या दिशा बाहेर असणे आणि सेन्ट्रोपीयोन म्हणजे पापण्याची दिशा आत असणे हे दोन प्रकार असतात. या दोन्ही आजारांमध्ये डोळ्यांना इजा होऊ शकते. या विकारांवरही शस्त्रक्रियेने मान करता येते. ही शस्त्रक्रिया अतिशय निर्धोक आणि संपूर्णपणे यशस्वी होणारी असते.
चेहऱ्याची नस (षरलळरी पर्शीींश) याची कमजोरी म्हणजे फेशियल पाल्सी. हा विकार वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. अकोस्टिक न्यूरोमा या ट्युमरच्या सर्जरीमध्ये चेहऱ्याची नस पूर्णपणे काढली जाते. त्यामुळे चेहऱ्याचा अर्धा भाग कमजोर होतो आणि पापणी बंद होत नाही. पापणी बंद झाली नाही, तर डोळा कोरडा पडतो आणि डोळ्याला इजा होऊ शकते.
या आजारामध्ये सोन्याची इम्फॉण्ट पापणीच्या आत शस्त्रक्रियेद्वारे ठेवली जाते. पापणीचे स्नायू शस्त्रक्रियेद्वारे मजबूत केले जातात आणि पापणीची नैसर्गिक उघड-झाप करणे रुग्णाला शक्य होते.
काही वेळा ऍक्सिडेंट किंवा कॅन्सरमुळे रुग्णाच्या डोळ्यांची पापणी काढली जाते.
त्यामध्ये एलआयडी शेअरिंग या शस्त्रक्रियेने कृत्रिम पापणी आणि तिचा नॅचरल लुक परत आणू शकतो. त्याशिवाय पापणीला होणारा कॅन्सर किंवा गाठ याचेही शस्त्रक्रियेने पूर्णपणे निवारण करू शकतो. रक्ताची गाठ (हिमान्जीओमा) या विकारात इंजेक्शनद्वारे ट्यूमर काढला जातो. ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी खूपच फायदेशीर असते आणि त्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग रहात नाही.
डोळ्याची प्लॅस्टिक सर्जरी ज्ञान आणि अनुभव असल्याशिवाय करता येत नाही. त्यासाठी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि अनुभवी अशा डॉक्टरांकडूनच करून घेतल्या पाहिजेत. त्याशिवाय कृत्रिम डोळे, लासूर, ट्युमर, तिरळेपणा, ऍलर्जिक आजार, आळशी डोळे अशा विकारांसाठीही कॉस्मेटिक सर्जरी करता येते.
सौंदर्यासाठी सर्जरी
पार्लरमध्ये जाऊन आपण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवितो. त्याच चेहऱ्याचा एक भाग म्हणजे डोळे असतात. बोलके डोळे हे चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच वाढवितात. आपण कोणाशीही बोलताना डोळ्यात बघून बोलतो. त्या वेळेस त्याच्या भावना या डोळ्यात दिसतात. अगदी लहान मुलाला रागावलेले व प्रेमाने बघितलेले सुद्धा डोळ्यातूनच कळते. असे हे बोलके डोळे चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच वाढवितात. परंतु हेच डोळे निस्तेज मलूल किंवा विद्रूप असतील तर त्या व्यक्तीला कमीपणा वाटत राहतो. आत्मविश्वास गमावतो. म्हणून या डोळ्यांचे सौंदर्य शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करून, जरूरीनुसार डोळे छोटे किंवा मोठे करून वाढविता येते.
जगातील डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण वाढतच आहे. सध्या जगात दर पाच सेकंदांनी एक व्यक्ती या प्रमाणात लोक डोळ्याच्या आजाराला बळी पडत आहेत. हे वाढत जाणारे प्रमाण ही धक्कादायक बाब आहे. या आजारांचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये लहान मुलांमधील अंधत्व, तिरळेपणा, चष्म्याचा नंबर, डोळे आळशी होणे, लहान मुलांमध्ये जन्मत: असणारा मोतिबिंदू हे प्रकार जास्त करून दिसतात.
कृत्रिम डोळे
काही व्यक्तींना जन्मत:च कॅन्सर किंवा ल्युकोमा या सारख्या आजारपणामुळे किंवा काहींना अक्सिडेंटमुळे डोळे गमवावे लागतात. अशा लोकांना कृत्रिम डोळे बसविता येतात. कृत्रिम डोळे हे ऍक्रिलिकने बनवले जातात. त्यांची हालचाल जिवंत डोळ्यांप्रमाणेच होते. तिरळेपणाचे व्यंग देखील ऑपरेशनच्या सहाय्याने खात्रीशीररीत्या दूर करता येते.