कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ दिसून येते. दुसरे म्हणजे ज्या ठिकाणी अशी वाढ झालीय ती जागा सोडून शरीराच्या अन्य भागात जाऊन पसरण्याची क्षमता या पेशींमध्ये आढळते.
शास्त्रीय व्याख्येप्रमाणे, कर्करोग हा जनुकांचा आजार आहे. जनुक म्हणजे डीएनए सूत्राचा प्रमुख घटक असतो. अशी जनुके प्रथिने निर्माण करतात. सामान्यत: सुदृढ माणसाच्या शरीरातील संरक्षण व्यवस्था शरीरातील विकृत वाढ झालेल्या पेशींना त्वरित ओळखते आणि त्यांचे विभाजन होण्यापूर्वीच त्यांना नष्ट करते, पण काही उत्परिवर्तन झालेल्या विकृत पेशी रोगप्रतिकार शक्तीच्या नजरेतून वाचतात आणि त्या जिवंत राहिल्यामुळे कर्करोग बनतात.
आज आपल्याला महिलांमध्ये, पुरुषांमध्ये आणि लहान मुलांमध्ये कर्करोग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सप्टेंबर हा महिना बालकर्करोग महिना म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. याचा मूळ उद्देश समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि कर्करोग पीडितांसाठी निधी गोळा करणे हा असतो. अमेरिकन बालकर्करोग संस्थेने याला गो गोल्ड असे म्हटले जाते. जगामध्ये दररोज 18 वर्षाखालील 700 लहान मुलांमध्ये कर्करोगाचे निदान होत असते. विकसित देशांमध्ये जन्मदर 80 ते 90 टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे. विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये मात्र कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण तीन ते चार पटीने अधिक आहे.
या देशांमध्ये न्यूमोनिया, मलेरिया, अतिसार, सेप्सिस या आजारांचे प्रमाण अधिक असल्याने कर्करोगावर लक्ष्य केंद्रित केले जात नाही. तसेच उशिरा होणारे निदान, तज्ज्ञांची उपलब्धता, उपचाराचा खर्च ही देखील मूलभूत कारणे आहेत; परंतु आता या आजारांचे जसजसे प्रमाण कमी होत आहे तसतसे कर्करोग हा महत्त्वाचा विषय बनत चालला आहे.
बालकर्करोगावरील कारणे अजून सापडली नसली तरी काही कर्करोग हे बुर्किटचा लिम्फोमा आणि कापोसी सारकोमा या विषाणूंशी संबंधित आहेत. बालकर्करोगामध्ये प्रामुख्याने रक्ताचा कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर लिम्फोमा हे प्रमुख प्रमाणात दिसून येतात.
कर्करोगावरील उपचार पद्धतीसाठी वेगवेगळे तज्ञ एकत्र येऊन निर्णय घेत असतात. यामध्ये पेडियाट्रीक सर्जन, मेडिकल ऑकोलॉजिस्ट, रेडीएशन ऑकोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, समाजसेवक, मार्गदर्शक यांचा समावेश असतो. कर्करोगावर केमोथेरपी, सर्जरी व रेडीएशन थेरपी हे मूलभूत उपचार आहेत. हे उपचार कर्करोग कोणत्या प्रकारचा व पद्धतीचा आहे यावरून ठरवण्यात येते. आज कर्करोगावर स्टीम सेल थेरेपी आणि इम्यूनोथेरपी या नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
इम्यूनोथेरपीमध्ये व्यक्तीची प्रतिकार क्षमता वाढवून कॅन्सरशी लढा दिला जातो. आधुनिक उपचार पद्धती व काळजी घेतल्यामुळे कर्करोग झालेल्या बालकांचे जगण्याचे प्रमाण हे साधारणपणे 80 ते 90 टक्के झाले आहे. लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी असले तरी मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे त्याबद्दल जागरूकता व संशोधनाची गरज आहे. पालकांमध्ये आशा निर्माण करणे, उपचाराबद्दल माहिती व उपलब्धता असणे, योग्य वेळेत निदान होणे, कर्मचारी प्रशिक्षित करणे, खर्चासाठी सामाजिक संस्थाचा सहभाग यावर उपाययोजना केल्यास बालकर्करोग आटोक्यात येतील.