‘केळं’ हे एक असं फळ आहे की अल्प दरात पटकन कुठेही मिळू शकते, गरिबांनाही केळ्यांचा आस्वाद घेता येतो. सोलले की खाल्ले… इतके ते खायला सोपे फळ आहे. इतर फळांप्रमाणे धुवा, बी काढा, चिरा, असली काही भानगड नाही त्यामुळे केळं खाण्याचा कंटाळाही केला जात नाही. सहज निघणार साल आणि पौष्टिक “बी’ विरहित गर पटकन मिळू शकणारं एकमेव फळं आहे ते म्हणजे केळचं!
केळ्याचे लॅटिन नाव आहे “मुसा पॅराडिसीका’. केळीच्या बागा निसर्गसौंदर्यात भरच घालतात. केळीच्या हिरव्यागार पानांना तर धार्मिक महत्त्व आहे. केळीच्या पानांवर जेवण हा एक आनंद मिळवून देणारा प्रकार आहे व औषधी महत्त्वाचा आहे यात मधुमेहींचे शर्करा नियंत्रण होते. केरळला सर्वत्र या पानांवर इडली-वडा खातात व जेवतात देखील. निसर्गाशी अस सतत नाते जोडले जाते. केळाचे किती तरी प्रकार, जाती आहेत. सोनकेळी, वेलची केळी, शिवाय वसई, राजाळी, लोखंडी, बंगलोरची. केळात “बी’ असते पण कळेल न कळेल अशी. अलीकडे कृत्रिमरित्या पिकवलेल्या केळ्यात मात्र गाजरासारखा चक्क “बी’चा “दोरच’ निघतो. अशी ही व्यापारी फायद्यासाठी बाजारात आणलेली केळी गुणांनी कमी ठरतात.
नारळासारखेच केळ्याच्या रोपाचे फळ, फूल, खोड, कंद, पाने सगळेच अवयव उपयुक्त व औषधी आहेत.
एक केळे आपल्याला आधुनिक संशोधनानुसार “बी’ जीवनसत्त्व, “सी’ व्हिटॅमिन थोडे आणि सूक्ष्म प्रमाणात “अ’ जीवनसत्त्वही प्रदान करते. यात अंशत: लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियमही असते. तसेच 1.3% इतकी प्रथिनेही आहेत.
केळीची पाने औषधी गुणी असतात. भाजलेल्या जखमांवर या पानांचा ड्रेसिंगसारखा वापर होतो तो वेगळाच शिवाय हे “आगळे’ ड्रेसिंग नुसते जंतुसंसर्गापासून वाचवत नाही तर जखमेचा दाह कमी करून थंडावाही देते! भाजलेल्या ठिकाणी केळाचा गर कुस्करून लावला तरी चालतो. तसेच केळ्याचा गर हा एक उत्तम फेसपॅक आहे. मुरमे घालवून त्वचा नितळ करून चेहरा उजळतो. केळफूल म्हणजेच ग्रामीण भाषेत “कोका’. याची भाजी ही पौष्टिक, बलदायी आहे.
कच्च्या केळ्याचीही भाजी करतात. तसेच केळसालांचीही भाजी करतात. जी अपचन, अतिसार, विकारात उपयोगी ठरते. कच्चे फळ, वैद्यांच्या सल्लाने सेवन करावे. लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तूप व पिकून साल काळे झालेले केळे एकत्र कुस्करून खायला देतात.
ह्या लोकांनी केळे खाणे टाळावे…
“केळी’ ही चवीला मधुर, थंडपणा देणारी, पचायला जड व स्निग्धता उत्पन्न करणारी आहेत. म्हणूनच मधुमेही, पचनशक्ती मंदावलेल्या रुग्णांनी केळी खाणे हितावह नाही. तसेच कफाचा त्रास वरचेवर होणाऱ्या व्यक्तींनीही “केळी’ अल्प प्रमाणातच खावी. लहान मुलांसाठी “केळे’ हे उत्तम टॉनिक आहे. असे असले तरी वरीलप्रमाणे “कफ’ होणाऱ्या मुलांना मात्र सारखी केळी खायला देऊ नयेत. केळाने वजन वाढते. केळीच्या कोवळ्या खुंटाचा ज्यूस मूत्रल आहे. जो मधुमेहींची साखर नियंत्रित करतो. तमिळनाडूत केळी संशोधन केंद्र आहे. केळ्याचे लोणचे, केळीचे सरबत एवढेच नव्हे तर असाध्य रोगांवर केळीचा इलाज व प्रयोग चालू आहेत. केळीमध्ये अतिशय कमी सोडियम व मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो व स्ट्रोकची शक्यता कमी असते तसेच अधिक पोटॅशियममुळे स्थायूंना बळकटी मिळते जाड सालीमुळे केळी जंतुपासून बचाव करतात. केळे पचन संस्था निरोगी व बलशाली करते. पचन संस्थेतील प्रतिकार शक्यती वाढते व पचन संस्थेवर संसर्गजन्य विषाणूचा हल्ला झाला तर शरीराला प्रतिकार करता येतो म्हणूनच ज्याच्या अन्न पचनासंबंधी तक्रारी आहेत. त्यांनी केळे खाणे फायद्याचे असते. केळीने ऍसिडिटी कमी होते. वजन कमी करण्यासाठी केळी खावे. असे आयुर्वेदात म्हटले आहे. याला कारण म्हणजे जर केळ जेवणाआधी अर्धी किंवा एक तास अगोदर खाल्ले तर भूक आपोआपच कमी होते आणि जेवण जात नाही. त्यामुळे आपोआपच खाण्यावर नियंत्रण येते. केळे दह्याबरोबर खाणे हितकारी आहे ठराविक प्रमाणात केळ खाणे मधुमेहींनासुद्धा लाभदायक आहे.
अशा प्रकारे केळी उपयुक्त आहेत भरपेट आहार प्रदान करणारी आहेत एवढेच नव्हे तर वर्ण उजळवण्यासाठी आणि नितंळ कांतीसाठी पिकलेल केळ कुस्करून त्यामध्ये चंदनाची पावडर आणि मध घालून त्यांची पेस्ट बनवावी 20 मिनिटांनी चेहरा धुवावा अशा प्रकारे चेहऱ्यावरील रंध्र मोकळी होतात. शुक आणि निस्तेज त्वचेला उजाळा मिळतो.
त्यामुळे केळी ही एक उपयुक्त वनौषधी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुजाता गानू