आजच्या घडीला अनेक तरुणांना संधिदाह किंवा संधिवाताची समस्या भेडसावत आहे. अनेकदा तर लहान मुलंही याला बळी पडतात. काय आहेत यामागची कारणं हे जाणून घेऊयात. पंचवीस वर्षीय सिद्धार्थ सिन्हा याला संधिदाह संधिवात असल्याचं नुकतंच निदान झालंय. साधारणपणे असं समजलं जातं की संधिवाताचा त्रास पन्नाशीनंतर होतो. त्यामुळे, हे निदान होणं हा त्याच्यासाठी मोठा धक्काच होता. ( ways to prevent arthritis )
संधिदाह संधिवात हा काही अनुवांशिक रोग नाही. संशोधकांचा दावा आहे की काही माणसांमध्ये अशी गुणसूत्रं असतात ज्यामुळे त्यांना हा आजार होण्याची शक्यता बळावते, मात्र ही गुणसूत्रं असलेल्यांना अचानकपणे संधिदाह संधिवात होत नाही. त्यासाठी काही एक तात्कालिक कारण ज्याला आपण ट्रिगरफ म्हणतो, ते कारणीभूत ठरतं.
संसर्गरोग, त्यातही ब-याचदा जीवाणूंचा संसर्ग किंवा वातावरणातील बदल अशा कारणांमुळे ही गुणसूत्रं सक्रिय होतात. या कारणांचा शरीराशी संपर्क झाला की आपली रोगप्रतिकारशक्ती अजब पद्धतीने वागू लागते. शरीराच्या सांध्यांना वाचवण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या घटकांची निर्मिती आपल्याच प्रतिकारशक्तीतर्फे केली जाते. यातूनच संधिदाह संधिवाताचा त्रास होतो. तसं पाहता संधिदाह संधिवाताचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो, मात्र बऱ्याचदा हा त्रास मध्यम वयात जाणवतो. भारतात या रोगाच्या प्रसाराचा दर 0.17 टक्के आहे. या आजाराचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असलं तरी वर दिलेल्या सिद्धार्थच्या प्रकरणावरून पुरुषांनाही हा त्रास होतो, हे स्पष्ट झालंच आहे.( ways to prevent arthritis )
संधिदाह संधिवातावर उपचार नाहीत, मात्र सांध्यांचं दुखणं कमी करून तुमच्या पायांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्रास कमी करणे हे या उपचारांचे उद्दिष्ट असतं. रुग्णाच्या गरजा आणि जीवनपद्धतीनुसार या उपचारांची आखणी केली जाते. संधिदाह संधिवाताचे उपचार ब-याचदा वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जातात. या तज्ज्ञांमध्ये ऱ्हयूमॅटोलॉजिस्ट, फिजिकल आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि आर्थोपेडिक सर्जनचा समावेश असतो.
लहान मुलांमधील संधिदाह संधिवात हा गुणसूत्रीयदृष्टया अधिक गुंतागुंतीचा मानला जातो. हा आजार बळावणे आणि त्याचा त्रास उद्भवणे यात अनेक महत्त्वाची गुणसूत्रं असतात. हा संधिवात 16 वष्रे वयाच्या आधीच होतो आणि साधारण सहा आठवडयांपर्यंत याचा त्रास राहतो, मात्र या आजाराचं मूळ कारण अद्याप कळलेलं नाही.( ways to prevent arthritis )
लक्षणं
संधिदाह संधिवातामध्ये मान, खांदे, कोपर, मनगट आणि हात, विशेषत: बोटांच्या सुरुवातीचे आणि मधले सांधे या भागांना त्रास होतो, मात्र बोटांच्या शेवटाकडे असलेल्या सांध्यांना त्रास होत नाही. शरीराच्या खालच्या भागात संधिदाह संधिवात पार्श्वभाग, ढोपर, टाच आणि तळपायाच्या खाली असलेल्या सांध्यांना होतो. संधिदाह संधिवात पाठीच्या खालच्या भागाला मात्र जरा सूट देतं. या आजारात कोणते सांधे त्रास देतात याबाबत एक ठरावीक समानता दिसते. म्हणजे, जर तुमच्या उजव्या हाताच्या बोटांचे सांधे दुखत असतील तर डाव्या हातालाही त्याच ठिकाणी दाह होण्याची शक्यता असते. इतर प्रकारच्या संधिवातांमध्ये वेदनेच्या बाबतीतील शरीराच्या दोन्ही बाजूंचीही एकरूपता दिसून येत नाही.( ways to prevent arthritis )
संधिदाह संधिवातामध्ये अनेक कारणांमुळे थकवा जाणवतो. सर्वसामान्यपणे थकव्याला कारणीभूत ठरणारं सायटोकिन्स नावाचं रसायन या दाहामुळे तयार होतं. संधिदाह संधिवाताचा त्रास असणा-यांमध्ये कदाचित काही प्रमाणात ऍनिमिया असण्याची शक्यता असते. यामुळेही थकवा जाणवतो आणि रात्री होणा-या वेदनेमुळे अस्वस्थ झोप हेसुद्धा थकव्याचं एक कारण असू शकतं. संधिदाह संधिवाताचा त्रास असलेली माणसं हळूहळू व्यायाम कमी करतात आणि त्यामुळे त्यांच्यातील ताकद कमी होऊ लागते आणि त्यांच्या थकव्याचं हे एक महत्त्वाचं कारण होऊन बसतं.
उपचार
संधिवाताच्या उपचारांमधील तातडीने करणा-या उपचारांमध्ये वेदना शमवणे आणि दाह कमी करणे, सांध्यांचं नुकसान थांबवणं किंवा त्यांचा वेग कमी करणं आणि सर्व क्रियांमध्ये सुधारणा करून रुग्णांचं हित साधणं या मुद्दयांचा समावेश असतो. या आजाराचं स्वरूप व्यक्तिगणिक बदलत जातं.( ways to prevent arthritis )
त्यामुळे उपचारपद्धती निवडतानाही प्रत्येक रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन, त्याचा/तिचा संधिवात किती प्रमाणात गंभीर आहे, जीवनपद्धती आणि आवडीनिवडी काय आहेत, या सगळयाचा विचार करायला हवा. ब-याचदा दोन किंवा अधिक उपचारपद्धती वापरल्या जात असतील तर प्रत्येकातून योग्य परिणाम साधला जाईल, हे पाहणं आवश्यक असतं. यातील काही उपचारपद्धती रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे या उपचारपद्धतीत सतत लक्ष ठेवणं गरजेचं असतं.