पुणे – नेत्र हा अवयव प्रामुख्याने तेज या महाभुताने संघटित असून, नेत्राच्या विविध क्रियांचे वात, पित्त, कफ या दोषांद्वारे नियमन केले जाते. आयुर्वेदातील या तिघांचे संतुलन बिघडले, तर शारीरिक व्याधी बळावतात, हाच नियम नेत्र या अवयवालाही लागू होतो. डोळे जळजळणे, लाल होणे, उष्ण अश्रुस्राव होणे ही पित्ताची लक्षणे आहेत. डोळे चुरचुरणे, खुपणे, अक्षता व कोरडेपणा येणे, सततचा वाढता नंबर, पापण्या उघडझाप करण्यास त्रास होणे ही वाताची लक्षणे आहेत. तर डोळ्यांना खाज येणे, चिकट स्राव येणे, घाण येणे ही कफाची लक्षणे मानली जातात. इतर शारीरिक व्याधींच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नेत्रविकारां(ophthalmology)चे प्रमाणही मोठे आहे.
आयुर्वेद शास्त्राने या सर्व विकारांची चिकित्सा करताना जीवनशैली व दोषांचा विचार करून नेत्रासाठी स्थानिक कर्म म्हणजेच सात क्रियाकल्पांचे वर्णन केले आहे. नेत्राभोवती उडदाच्या पिठाचे पाळे तयार करून त्यात औषधी तूप, काढे टाकून त्यांच्या साहाय्याने चिकित्सा करणे, हे तर्पण व पुटपाक या क्रियाकल्पात अंतर्भूत होतो. यालाच नेत्रबस्ती असे म्हणतात.
डोळ्यात औषधीद्रव्याचा सुरमा लावणे म्हणजे अंजनकर्म होय. याद्वारे डोळ्यांना होणाऱ्या कफाचे विकार दूर होण्यास मदत होते आणि डोळे स्वच्छ राहतात. औषधी काढ्यांचे थेंब डोळ्यात सोडल्याने अथवा डोळ्यावर औषधी काढ्याची धार धरल्याने डोळ्यांच्या ठिकाणी असलेला लालीमा, खाज, टोचणी, स्राव येणे ही लक्षणे दूर होण्यास मदत होते.
बिडालक म्हणजे औषधी द्रव्यांचा पापण्यांभोवती लेप लावणे व पिंडीका म्हणजे औषधी द्रव्यांचा गोळा पुरचुंडी करून डोळ्यावर बांधणे होय. याद्वारे रक्तदृष्टीमुळे होणारे विविध विकार दूर केले जातात. सर्व क्रियाकल्पे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दृष्टीचे रक्षण करता येते. मोतीबिंदूसाठी मात्र आयुर्वेदाने केवळ शस्त्रकर्म हाच उपाय सांगितलेला आहे.
चिकित्सेबरोबरच दिनचर्या व ऋतुचर्येचे पालन केले, तर नेत्रविका(ophthalmology)रांपासून दूर राहता येते. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यावर मोगऱ्याची फुले ठेवणे, जेवणात गायीच्या तुपाचा वापर करणे, मध, खडीसाखर, सैंधवमीठ यांचा वापर करणे, पिकलेली केळी, द्राक्षे, मनुका, डाळिंब, खजूर यांचे पन्हे घेणे, सुका आवळा, मुगाचे पदार्थ, शेवगा, तिळाच्या तेलाने सर्वांग अभ्यंग करणे, जागरण टाळणे, संगणकासमोर कमी बसणे आदी पथ्य पाळली तर, डोळ्यांचे विकार टाळता येतात.
संगणकाचा अतिवापर करणाऱ्यांसाठी डोळ्यांची उघडझाप सतत करणे, दर 10-15 मिनिटांची काही सेकंद दृष्टी दुसरीकडे वळविणे, योग्य चष्मा लावणे व संगणक नजरेच्या थोडा खाली ठेवणे आवश्यक आहे. जेवणानंतर हात धुतल्यावर तळहात आपापसात घासून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांचे विकार कमी होण्यास मदत होते. (भावप्रकाश ग्रंथ) डोळ्यांसाठी दररोजची निगा आठवड्यातून एक वेळा अंजन केले पाहिजे. यामुळे डोळे निर्मळ राहतात.
रक्तमोक्षण, वमन, विरेचन, मनाचे समाधान, अंजन, नस्य, तळपायांची काळजी आणि घृतसेवन हे दृष्टी रक्षणाचे उपाय आहेत. (वाग्भट) आपल्या जीवनाबरोबरच आपल्या डोळ्यांचे कार्य संपते. पण नेत्रदान करून दोन अंध लोकांना दृष्टी देता येते. नेत्रदानाचा फॉर्म भरला नसला तर नेत्रदान करता येते. मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी लवकरात लवकर नेत्रपेढीला कळविले, तर तेथील तंत्रज्ञ डोळे नेण्यासाठी येतात. मृत्यूनंतर 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान झालेले कधीही चांगले असते. चष्मा असलेल्यांना, शस्त्रक्रिया केलेल्यांनासुद्धा नेत्रदान करता येते.
आपले जीवन संपल्यानंतरही कुणाच्या तरी दृष्टीची ज्योत आपण तेवत ठेवू शकतो, यासाठी आतापासूनच आयुर्वेदाच्या मदतीने नेत्रांची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या डोळे येणे, चिकट होणे, जळजळ होणे, आग होणे अशा प्रकारचे डोळ्याचे आजार उन्हाळ्यामध्ये शक्यतो उद्भवतात. हे आजार टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये उष्ण, तेलकट, तिखट पदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे. दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये. शक्यतो डोक्यावर टोपी आणि गॉगल वापरावा. पाणी भरपूर प्यायला हवे. लिंबू, कोकम, गुलकंद, वाळा यांचा वापर जास्त करणे अपेक्षित आहे. वाढत्या उन्हामुळे डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून 4-5 वेळा स्वच्छ करावेत.
वसंत ऋतूमध्ये झाडांची पानगळ सुरू होते. हळूहळू उन्हाचा कडाका सुरू होतो आणि डोळ्यांच्या तक्रारींनाही सुरुवात होते. उन्हाळ्यात प्रामुख्याने डोळ्यांना त्रास होणारे अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे अशा समस्या प्रामुख्याने जाणवतात. डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने उपचार करून घ्यावेत. नेत्रपटलास यूव्ही किरणांमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. त्यासाठी यूव्ही किरणांमुळे पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली तर उन्हामुळे होणारे डोळ्यांचा त्रास सहज टाळता येऊ शकतो.
उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, स्कार्प वापरणे, यूव्ही-ए व यूव्ही-बी या दोन्हीही किरणांपासून 99-100 टक्के संरक्षण करणारे आणि डोळे पूर्ण कव्हर करणारे सनग्लास वापरणे गरजेचे आहे. यूव्ही-किरणांपासून संरक्षण करणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा उपलब्ध आहेत. सनग्लास व कॉन्टॅक्ट लेन्स दोन्ही एकदम वापरणे योग्य ठरतात.
विशेषतः चार ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना उन्हाळ्याचा जास्त त्रास होतो. यामध्ये डोळ्यांना खूप खाज येते. डोळे लाल होतात. डोळ्यातून पाणी येते, तसेच डोळ्यातून पांढरा दोरीसारखा व्हाईट रापी डिस्चार्ज येणे या तक्रारी प्रामुख्याने जाणवतात. विशेष म्हणजे ऍलर्जी पुन्हा पुन्हा वसंत ऋतूमध्ये होत राहते म्हणून यास स्प्रिंग कॉन्टॅक्ट असे म्हणतात. नेत्रतज्ज्ञांना दाखवून औषधोपचार सुरू करणे अपेक्षित आहे. स्टेरिऑड (माइल्ड) आय डॉप जास्त ऍलर्जी असल्यास, ऍलर्जी प्रतिबंधक (ऍन्टी-ऍलेजिक) व ऍन्टी-व्हिटॅमिनिक आय ड्रॉप अर्टीफ्युल टीअर्स या औषधांबरोबरच सतत डोळे थंड पाण्याने धुवावेत.
डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. डोळे चुरचुरत असतील तर चोळू नयेत. डोळे थंड पाण्याने धुताना डोळे उघडे ठेवून धुवू नयेत. डोळे धुताना डोळे उघडे ठेवल्यामुळे डोळे चुरचुरतात. उष्मा वाढल्यामुळे डोळे कोरडे पडू लागतात. डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे असे त्रास त्यामुळे होऊ लागतात. त्यासाठी डोळे सतत थंड पाण्याने धुणे, कोल्ड कॉम्प्रेस, अर्टीफ्युअल टीअर्स ड्रॉप वापरणे योग्य ठरेल, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अतिनील किरणांमुळे मोतीबिंदू म्हणजे डोळ्यावर पांढरा पडदा येण्यासारखी समस्या उद्भवू शकते.
दृष्टी उत्तम असेल, तर सृष्टीसौंदर्याचा आनंद घेता येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यापासून दृष्टी संघटित झाली आहे. मात्र, त्यात बाधा आल्यास जीवन अंधकारमय होऊ शकते. दृष्टीला बाधा आणणाऱ्या घटकांचे आयुर्वेदाने विवरण करून त्यासाठी काही पथ्य व चिकित्सा…
– डॉ. शीतल जोशी