डॉ. राजेंद्र माने
दिवसभर काम काम आणि फक्त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्यरीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. असे काही उपाय –
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चीडचीड होते तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो. पाण्यात थोडेसे मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते. शॉवरखाली अंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे. जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
व्यायामामुळे रक्तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो. थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पाहा :
-दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
-शक्य झाल्यास एका जागी बसून एखादा प्राणायाम केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
-रंगांचासुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते.
-झोप पूर्ण न झाल्यास येऊ शकतात आत्महत्येचे विचार रात्री झोप न येण्याने ताण वाढून आत्महत्येचे विचार येतात व तसे प्रयत्नही केले जातात, असे नवीन अभ्यासात म्हटले आहे. मॅंचेस्टर व ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी आत्महत्येच्या प्रवृत्तीशी झोपेचा संबंध यावर 18 जणांच्या मुलाखती घेतल्या. झोपेच्या समस्येतून आत्महत्येशी संबंधित विचार तीन प्रकारे येतात. एकतर झोपेतून अचानक जाग येण्याने रुग्ण घाबरून तसे करू शकतो, त्यावेळी त्याच्याकडे ती कृती टाळण्यासाठी साधने नसतात. रात्री चांगली झोप येत नसेल तर आयुष्य कठीण बनते व त्यातून नैराश्य, नकारात्मक विचार, एकाग्रतेत बाधा व निष्क्रियता येते. झोपेमुळे आत्महत्या टळू शकतात, पण त्यामुळे दिवसा झोपण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे उलट रात्रीची झोप विस्कळीत होते. मानसिक आरोग्यासाठी, आत्महत्या टाळण्यासाठी व वर्तनात्मक सुधारणांसाठी झोप आवश्यक असते.
-जे लोक रात्री जागतात म्हणजे ज्यांना झोप लागत नाही त्यांची आत्महत्येची शक्यता जास्त असते, असे मॅंचेस्टर विद्यापीठाच्या डोना लिटलवूड यांनी सांगितले. जर्नल बीएमजे ओपन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
-चालण्याचा व्यायाम ह्रदयरुग्णांसाठी हितकर
वाढत्या विकासाबरोबर आपण चालणेही विसरलो आहोत. जवळपासही कुठे जायचे असेल तरीही आपल्याला रिक्षा, टॅक्सी किंवा स्वत:चे वाहन लागते. चालणे टाळल्यामुळे अनेक विकारांचा सामना करावा लागत आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे 50 टक्के विकार कमी होतात. 65 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी तर चालणे वरदानच आहे. अशा व्यक्तींनी दररोज चालले तर हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने घटू शकेल, असे हे संशोधन सांगते.
-65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या व्यक्तींना बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी जडतात. जसे हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, स्थूलता आदी. त्यासाठी त्यांच्या शरीराला चालना देणे आवश्यक आहे. जर चालण्याचा व्यायाम दररोज केला तर या विकारांचे निराकरण होऊ शकते. हृदयविकार तर चालण्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉंग्रेसने हे संशोधन केले आहे. संशोधकांनी 65 ते 74 या वयोगटातील 2465 पुरुष आणि महिलांवर हे संशोधन केले. या लोकांच्या शारीरिक कृतींवर लक्ष ठेवण्यात आले. जे लोक दररोज चालतात, त्यांच्यातील हृदयविकाराचा धोका टळलेला आढळल्याचे या संशोधकांनी सांगितले. दिवसातून किमान अर्धा ते एक तास चालणे गरजेचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.