हे दंडस्थितीतील आसन आहे. त्याचप्रमाणे आपण शयन आणि विपरित शयनस्थितीतही वृक्षासन करू शकतो. वृक्ष म्हणजे झाड. या आसनाची झाडाप्रमाणे कल्पना केलेली आहे. हे दंड स्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करण्याचे तोलात्मक आसन आहे. प्रथम दोन्ही पायांत थोडेसे अंतर घेऊन उभे राहावे. हाताच्या आधाराने डावा पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू वर घ्यावा व पायाचा तळवा उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवावा.
पाय स्थिर राहिल्यावर दोन्ही हात श्वास घेत बाजूने वर घ्यावे. नमस्कारस्थितीमध्ये असावे. दोन्ही कोपरे ताठ असावेत. दोन्ही दंड दोन्ही कानांना टेकलेले असावेत. साधारण 30 सेकंद ते एक मिनिटापर्यंत आसनस्थिती टिकविण्याचा प्रयत्न करता येतो. अशा पद्धतीने एकदा डावा पाय आणि एकदा उजवा पाय वर घेऊन आपण अर्ध वृक्षासन करू शकतो. ज्यावेळी आपण दोन्ही हात नमस्कारस्थितीत डोक्यावर घेतो आणि श्वास घेत पायांच्या टाचा वर उचलतो नजर एका बिंदूकडे स्थिर करतो त्यावेळी पूर्ण वृक्षासन होते. ( vrikshasana benefits )
अर्धवृक्षासन आणि पूर्ण वृक्षासन दोन्ही करायला सोपी वाटली तरी टिकवायला अवघड असतात. सुरुवातीला तोल सांभाळणे अवघड जाते. अशावेळी अर्धवृक्षासन करताना भिंतीच्या आधाराने या आसनाचा सराव करावा अथवा योग्य योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. आसन सोडताना सावकाश पाय जागेवर घ्यावेत. श्वास सोडत हात जागेवर घ्यावेत. पूर्ण वृक्षासनात आपण शंभर आकडे मोजून स्थिर राहू शकतो.
सर्व आसनांचा दररोज सराव झाल्यानंतर वर्ग संपविताना म्हणजेच प्राणायाम आणि आसने पूर्ण झाल्यावर शरीराचा ताण घालविण्यासाठी वृक्षासन केले जाते. अर्ध आणि पूर्ण अशी दोन्हीही वृक्षासने एकदिवसाआड करावीत. वृक्षासनाचे अनेक फायदे आहेत. उंची वाढविण्यासाठी 14 वर्षांच्या पुढील मुला मुलींना वृक्षासन रोज नियमित करवून घेतले असता योगप्रयोगांती त्यांची उंची वाढली असल्याचे सिद्ध झाले आहे म्हणून शाळेमध्ये हे आसन रोज घेतले जाणे गरजेचे आहे. या आसनाचे इतर फायदे असे. याच्यामुळे मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. चिडचिड कमी होते, आकलनक्षमता वाढण्यास मदत होते. हात वरच्या दिशेला ताणले असल्याने मुलांना उंची वाढविण्यासाठी तर हे आसन उपयुक्त आहेच. ( vrikshasana benefits )
पण आपले ताण तणाव घालवण्यासाठी, आपले हातापायांचे मजबुतीसाठी, उत्तम रक्ताभिसरणासाठी, नेत्रदोष जाण्यासाठी, शरीर आणि मनाचा समतोल राखण्यासाठी तसेच आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी वृक्षासन नियमित करावे. ज्येष्ठांची गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी दूर करणारे हे आसन आहे. एकंदर रोजच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने करण्यासाठी वृक्षासन हे रोज करायलाच हवे.